पोळा सण..काल,आज आणि उद्या
‘पोळा, सण करी गोळा ‘ असे आपण म्हणतो ते खरेच आहे. सण ,उत्सव हे आपल्या संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहेत.आपले सर्व सण हे मराठी महिन्याच्या कोणत्या ना कोणत्या तरी तिथीला येत असतात. असा एकही महीना नाही की त्या महीन्यात कोणतातरी सण येत नाही. सर्व मराठी महीन्यात श्रावण महिना हा जास्त पवित्र समजला जातो. श्रावण महिण्याच्या अमावस्येला आपल्याकडे बैलांचा सण म्हणून ‘ पोळा ‘ साजरा केला जातो. भारतात हा सण सर्वत्र एकसारखा आणि एकाच दिवशी ,एकाच नावाने साजरा होत नाही. काही राज्यात याला पोंगल म्हणतात व तो वेगळ्या दिवशी साजरा होतो. महाराष्ट्रातही कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या सिमा भागात वेगळ्या दिवशी आणि वेगळ्या पद्धतीने पोळा सण साजरा केला जातो. शेतीच्या हंगामानुसार हा सण आपापल्या भागात वेगवेगळ्या वैशिष्ट्य्यानुसार साजरा होतो.
बालपण पुर्णपणे ग्रामीण भागात आणि शेतकरी कुटुंबात गेल्यामुळे पोळा सण आमच्या जिव्हाळ्याचा सण होता. पुर्वी शेती पुर्ण पणे बैलांच्या कष्टांवर अवलंबून होती. प्राचीन काळापासून आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. यंत्रांचा शिरकाव होण्याआधी शेती मशागतीची सर्व कामे बैलांमार्फत केली जायची. बैल हे शेतकऱ्याचे दैवत आहे . बैलांच्या कष्टांवर शेती पिकायची. शेतकरी कुटुंबाचे पालनपोषण शेतीवरील पिकावर अवलंबून असते. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो. नोकरीवाला असो की व्यापारी त्यालाही लागणारे अन्न शेतीतून पर्यायाने बैलांच्या कष्टांतूनच मिळते. आपली संस्कृती आपल्यावर उपकार करणाऱ्यांप्रती कृतज्ञ भावना व्यक्त करायला सांगते. पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा आपण त्याच भावनेपोटी करतो. बैलाला जन्म देणाऱ्या गायीला आपण माता मानतो. पवित्र मानतो. गायीची आपण पुजा करतो. आपल्या हिंदू संस्कृतीत आपल्या देवदेवतांनीसुद्धा गाय ( गोमाता ) आणि बैल ( नंदी ) यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. एक काळ असा होता की गोधन हेच सर्वात मोठे धन मानले जायचे.
पुर्वी पोळा सणाची लगबग सणाच्या खुप आधीच सुरू झालेली असायची. बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळा घासून पुसून स्वच्छ केल्या जायच्या. शेल ,माथोटी ,नाकात अडकवायची दोरी ,दोर नवीन विकत आणले जायचे. मी चौगावचा पोळा पाहीला तसा मोराण्याचाही पोळा अनुभवलेला आहे. पोळ्याच्या काही दिवस आधी आमच्या लहान मुलांचा पोळा सुरू झालेला असायचा. बैल बैल खेळणे आम्हा लहान मुलांचा बिनपैशाचा आणि भरपूर व्यायामाचा खेळ असायचा. बैलांची घुंगरमाळ एकाच्या गळ्यात घालायची .त्याच्या हाताला लांब दोरी बांधायची. एक मुलगा बैल बनायचा तर दुसरा बैल हाकणारा. दिवसभर आमची पळापळी सुरू असायची. बैल हाकणाऱ्याच्या हातात दोरी असायची. ती म्हणजे एक प्रकारची शेल. तो दोरी ओढून बैलाला थांबवायचा. बैल झालेला मुलगा उगीच फुरफुर करायचा. थांबत नसेल तर कधीं कधीं मारायचा सुद्धा. अर्थात हे सर्व नाटक असायचे. बैल हाकणाऱ्यापेक्षा बैलालाच जास्त मान असायचा. कारण त्याच्या गळ्यात मधूर आवाज करणाऱ्या घुंगरांची माळ असायची. आलटून पालटून बैल व हाकणारे बदलत रहायचे. काही वेळेला दोन बैल आणि एक हाकणारा असे पात्र असायचे. लहान मुले ही अनुकरणप्रिय असतात. मोठ्या माणसांचे पाहून पाहून ते त्यांचे अनुकरण करत जातात व त्यांतूनच शिकत जातात. दोन बैल झालेली मुले आणि एक हाकणारा असला की मग ती बैलगाडी समजायची. आम्ही आमच्या लुटुपुटुच्या खेळात बाजरी आणि ज्वारीच्या वाळलेल्या काड्यांपासून बैल तयार करायचो. त्यांच्या चिवट्या व काड्यांच्या आतील मवू भागापासून बैलगाडी तयार करायची व दिवसभर खेळंत बसायचे. शेतातील सर्व गोष्टी खेळाच्या रूपात लहान मुले खेळायची. माती , चिखल ,काड्या वापरून तयार केलेली खेळणी तयार करायला एक पैसाही खर्च येत नसे. धुळ , चिखल ,माती ,शेण याची आम्ही मुळीच पर्वा करत नसायचो. पोळ्याच्या आधी काही दिवस आणि पोळ्या नंतर काही दिवस आम्हां मुलांचा हा बैल बैल खेळ चालू रहायचा.
पोळ्याच्या दिवशी बैलांना गाडीला जुंपायचे नाही की कोणत्याही कामाला लावायचे नाही असा रिवाज होता. त्या दिवशी बैलांना पुर्ण आराम असायचा. शेतात ,बांधांवर भरपूर गवत माजलेले असायचे. ते कापून आणून बैलांना घरीच भरपूर खायला घालायचे. नदी वाहत रहायची. डोह भरलेले असायचे. दुपारी बैलांना नदीवरील डोहावर (डुखाड्यावर) न्यायचे. हे काम मोठ्या माणसांचे असायचे. आम्ही मुले एखाद्या लहान गोऱ्ह्याला घेऊन जायचो किंवा उगीच मोठ्यांबरोबर लुडबुड करायचो. कळायला लागले तेंव्हा पासून मी पोहायला शिकलो आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांना चांगले घासून पुसून धुवून काढले जायचे. एरव्ही शेण,मलमुत्राने भरलेले बैल त्यादिवशी नवरदेवा सारखे उत्साहीत झालेले वाटायचे. बैलाच्या मानेखालची लोंबणारी कातडी (पोळ) जेवढी चोळून काढावी तेवढे बैलाला सुख वाटायचे. दुपारनंतर बैलाला सजवायचे काम सुरू व्हायचे. लग्नाच्या आधी नवरदेव नवरीला सजवतात तसे बैलांना सजवायचे. बैलाचे शिंग वरुन वरुन थोडे चाकूने तासून काढायचे. बैलांना इजा होत नाही कारण शिंगाच्या वरील पेशी मृत असतात जसे आपल्या नखांचा पुढचा भाग. शिंगे तासून झाल्यावर शिंगांना हिंगुळ लावायचा. शिंगे लाल भडक रंगाने चमकायला लागायची. त्यानंतर शिंगांना रंगीबेरंगी बेगडाच्या पट्ट्या चिटकावयाच्या. मला या रंगीत बेगडाचे फार आकर्षण होते. न्हावी यायचा.तो बैलांच्या शेपटीचा व्यवस्थीत गोंडा कापून तयार करायचा. बैलाच्या गळ्यात घुंगरांची माळ घालायची. काही ठिकाणी तिला साज म्हणतात. काहीजण बैलांच्या अंगावर झूल घालायचे. बैलाच्या अंगावर हाताचे रंगीत ठसे उमटावयाचे. कपाळावर छोटे छोटे आरसे बसवलेले रंगीत बाशिंग बांधायचे. शेतकरी त्या दिवशी तहानभूक विसरलेला असायचा. काहीजण त्यादिवशी बैलांसाठी उपवास धरायचे. प्रत्येकाच्या घरासमोर सजलेले बैल दिसू लागायचे. सजवलेल्या बैलाला मारूतीच्या दर्शनाला घेऊन जायचे. बैलाला पळवत मंदिराला पाच फेऱ्या मारायच्या. मारुतीला नारळ फोडायचे. पुर्वी वेशीत आणि मंदिराजवळ आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जायचे. तोरण तोडण्याचा मान गावातील पाटील किंवा एखाद्या तालेवारचा असायचा. त्याचे बैल आधी मंदिराभोवती फिरणार मग इतरांचे.बैल . घरी आल्यावर घरधणीन बैलांची पुजा करायची.एका खाटेवर चादर अंथरुन त्यावर गहू पसरून ठेवायचे . बैलांना गहू खावू घालायचे. एक एक पुरणपोळी बैलाच्या तोंडांत देवून त्याला खावू घालायची. घरात देव्हाऱ्यापुढे गेरूने रंगवलेले मातीचे बैल ठेवायचे .
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ब्राम्हणाने दिलेल्या राख्या त्यांना माथोटी म्हणून बांधायच्या. घरातील मातीच्या बैलांची पुजा करायची. काही दिवसांनी हे मातीचे बैल आपल्या शेतांमध्ये टाकून यायचे. त्यामुळे शेतात चांगले पिक येते असा समज होता. घरात त्यादिवशी घरोघरी पुरणपोळीचे जेवण असे.
भारतात हिंदू धर्मात गाय व बैल यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. खान्देशात घरोघरी उपकारकर्त्या बैलांचे फोटो फ्रेम करून बैठकीत भिंतींवर लावलेले दिसतात. मोराण्याला एक ‘ओतारू’ यायचा. लोहाराकडे असतो तसा त्याच्याकडे भाता होता. घरातील जुने धातुचे भांडे त्याच्याकडे दिले की तो ते भांडे वितळवायचा. त्याच्याकडील साच्यात धातूचा रस ओतून घुंगरू तयार करायचा. चांभार या घुंगरांना चामडी वादीत ओवून माळ (साज)तयार करायचा. काहींना वाटले तर ओतारू देवांच्या मूर्ती सुद्धा बनवून द्यायचा. बैल कितीही म्हात्तारा झाला तरी शेतकरी आपल्या बैलाला कधीच कसायाला विकायचा नाही. आपल्या देशाचे जे नाणे आहे त्याच्यावर अशोक स्तंभाच्या खाली बैल आणि घोड्याचे चित्र चितारले आहे. बैल देशाची कृषीप्रधान संस्कृती दर्शवतो तर घोडा त्यावेळच्या दळणवळणातील घोड्याचे महत्त्व स्पष्ट करतो.
काळ बदलत गेला. बैलांच्या मिरवणुकीवरून गावागावांतील गटांतटांत भांडणे होवू लागली. लोकं मानपान देईनासे झाले. त्यामुळेही तेढ निर्माण होत गेली. प्रकरणे पोलीस कचेरीपर्यंत जावू लागली. अशा गावांमधे पोळ्याच्या दिवशी बैलांच्या मिरवणुकीवर बंदी आली.
चौगावला एका पोळ्याला अशीच हाणामारी झाली. दारूच्या नशेत असलेल्या लोकांनी एकमेकांची डोकी फोडली. त्यानंतर काही वर्षे पोळ्याच्या दिवशी बैलांच्या मिरवणूकीवर बंदी आली. दर पोळ्याला पोलीस बंदोबस्त राहू लागला. आठवीत असतानाचा असाच एक प्रसंग आठवतो. मी मोराण्याला मामांकडे शिकायला होतो. संध्याकाळी आमच्या घरासमोर बराच वेळ लोक बैलांच्या समोर धुंद होऊन नाचत होते. दशरथ मामा त्यांना समजून सांगायला गेला. मामा निर्व्यसणी होती. त्यांना अन्याय सहन होत नसे. घरासमोर चाललेला बराच वेळचा धिंगाणा त्यांना सहन झाला नाही. ते गर्दीत घुसून लोकांना काही तरी सांगायला गेले. पण धुंदीत मस्त झालेल्या काहींना ते आवडले नाही. एवढेसे गाव पण गावात दोन तीन गट तट होते. भाऊबंधकी जोरात होती. गर्दीत कुणीतरी डाव साधला. कुणीतरी मामांच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. रक्तबंबाळ होवून मामा खाली पडला. गर्दी पांगली , धावाधाव झाली. घरात रडबोंबल सुरू झाली. मोसम नदीला पूर आलेला होता. नदी ओलांडून नामपूरला दवाखान्यात जाणे शक्य झाले नाही. गावातील एक धडाडीचा माणूस अर्जुन लक्ष्मण शेवाळे याने रात्री बैलगाडी जुंपून अजंग वडेल वरून डॉक्टर आणला होता. तो दिवस आणि त्यानंतरचे काही दिवस आमच्या साठी फार कठीण गेले. माझे माझ्या मामावर फार प्रेम होते. त्या रात्री पोळ्याच्या सणाच्या दिवशी मी खुप रडलो होतो. मामा वाचतील की नाही अशी अवस्था झाली होती. मामाच्या डोक्यावरच्या जखमा काही दिवसांनी बऱ्या झाल्या पण मनावर झालेली जखम अजुनही तशीच भळभळते आहे असे वाटते. पोळा आला की या अप्रिय आठवणीही आपसूक जाग्या होतात.
आज बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. शेती यांत्रिक पद्धतीने केली जावू लागली तसे बैलांचे महत्त्व कमी होत चालले. बैलांच्या संख्येवरून श्रीमंती मोजण्याचा जमाना इतीहास जमा होवू लागला. खळ्यातील बैलांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली. भुसार पिके घेण्याऐवजी नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला. बैलांना पोसणे शेतकऱ्याला कठीण होवू लागले. बैलांची उपयुक्तता कमी होत गेली तसे गायींची संख्याही रोडावत गेली. गावठी गायीची जागा जास्त दूध देणाऱ्या जर्सी गायीने घेतली. शेतकरी व्यापारी वृत्तीचा होत गेला. आता पोळा सण पहिल्या सारखा उत्साहात साजरा होत नाही.बैलांची संख्या कमी होत चालली आहे.पुजेलाही बैल मिळेनासे झाले आहेत. मातीचे बैल मात्र स्मार्ट होत चालले आहेत. आजच्या पोळ्याचे चित्र पुर्वीच्या पार्श्र्वभूमीवर खुपच केवीलवाणी भासते.
काही वर्षांनी कदाचीत बैलं पहायलाही मिळणार नाहीत. मुलांना बैल चित्रांतून दाखवावे लागतील. ठिकठिकाणी बैलांचे पुतळे (स्टॅच्यू) दिसतील. लोकं तेथे आपले फोटो काढत जातील. भविष्यात पोळा कदाचित मातीच्या बैलांपुरताच मर्यादित होवून राहील. आम्ही लहानपणी अनुभवलेला पोळा पुढे कधीच बघायला मिळणार नाही . बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळा आम्ही आमच्या गळ्यात घालून जसे बैल बैल खेळलो तसे खेळ आता कधीच बघायला मिळणार नाहीत. बैलाबरोबर गायीचेही महत्त्व कमी होत जाईल. गावठी गायी जावून जास्त पैसे मिळवून देणाऱ्या म्हणजेच जास्त दूध देणाऱ्या संकरीत गायींचीच पैदास केली जाईल. तेहतीस कोटी देव जिच्यात वास करतात अशी आपली श्रद्धा आहे ती गाय आणि तिचा पुत्र म्हणजे शंकरजीचे वाहन धोक्यात आहे एवढे मात्र नक्की.
अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. पोळा आला की आजकाल मित्र एकमेकांची बैलावरून टिंगल टवाळी करतात. एखाद्याला बैल म्हणून चिडवतात. मित्रांनो , बैलांना कमी समजू नका. त्याची खिल्ली उडवू नका. त्याच्या कष्टावरच आजपर्यंत शेतकरी आणि पर्यायाने आपण सर्व जण पोट भरत आलो आहोत. आपल्या कैक पिढ्या बैलांच्या कष्टावरच पोसल्या गेल्या आहेत. कष्ट करणाऱ्या बैलाला आपण हीन ठरवतो व काहीच काम न करणाऱ्या व अंगावर झूल पांघरून केवळ मान डोलावणाऱ्या नंदीबैलाची मात्र पुजा करतो. कष्ट करणाऱ्यांचा आपण योग्य सन्मान करत नाहीत आणि ऐतखाऊ , दुसऱ्यांना लुबाडून मोठे झालेल्यांना डोक्यावर घेऊन मिरवतो. गाय ,बैल यांना आपल्या धर्मात फार मोठे महत्त्व आहे. आपण आपल्या धर्माचेही पावित्र्य जपू या.
आपणां सर्वांस पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
मोरे गोविंद बभुता सर
सेवानिवृत्त मुख्याध्यापक
सिन्नर (चौगांवकर)