कैफियत
वर्षभर ढोर कष्ट करणारे आम्ही
आज आमचा नवरदेव झालाय
कष्टातून उतराई व्हावं म्हणून
मालकानं नवा साज पांघरलाय
सदैव इमाने इतबारे काम करणारे
आज डोळ्यातून आनंदाश्रू ढाळतो
कृतज्ञता व्यक्त करीत सदैव आम्ही
मालकाशी एकनिष्ठ राहतो
आयुष्यभर राबविले जातो आम्ही
पण कधीच तक्रार करीत नाही
पण म्हातारपणी आमच्या वाट्याला
सन्मानाचं मरण कधीच येत नाही
आजचं जग प्रामाणीक राहीलं नाही
आहेत जू झुगारून उठाव करणारे
स्वत:च्या क्षणीक सुखासाठी
मालकाशी बेईमानी करणारे
पण आम्ही तसं करणार नाही
पाठीत वार करणार नाही
तुमचेच खायचे वांदे होतील
म्हणून आम्ही बंड करणार नाही
पण आम्ही एक तक्रार जरूर करणार आहे
उद्यापासून मालकाशी करार करणार आहे
कोणतंही नियमबाह्य काम करणार नाही
कराराशिवाय पुढे पाऊल पडणार नाही
झालं पोळा फुटला, चर्चा संपली
सर्व बैलं आपापल्या घरी गेले
उद्यापासून पुढील पोळ्यापर्यंत
पुन्हा तेच जगणं वाट्यास आले
नवनव्या आश्वासनाने बोळवण केली जाते
पण करार कधीच पाळल्या जात नाही
कारण आम्ही बैलं आहोत
बदलाचं वारं कानात शिरत नाही
औंदाबी तेच व्हणार की काय, कोण जाणे?
या खुट्याचे त्या खुट्याले बांधले जाणार
की काय,कोण जाणे?
पोळा जवळ आलाय
म्हणून म्हणतो .
बाकी तसं ईशेष काई नाई…
– अरुण विघ्ने