सेक्सटिंग हे ऑनलाईन जगताचं भीषण वास्तव..!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    * काहीतरी थ्रिल म्हणून सुरु झालेल्या खेळाचं विकृत रुप

    तुम्ही कधी ऐकलं आहे का सेक्सटिंग बद्दल..? सेक्सटिंग किंवा असं म्हणूया की, सेक्स टेक्सटिंग ज्याचा अर्थ आहे की, सेक्स किंवा तशा आशयाचे मेसेजेस आपल्या मोबाईलवरून दुस-या व्यक्तीला पाठवणे. आजकालच्या डिजीटल युगात सगळं शक्य आहे. अगदी आपल्या पार्टनरसोबत डिजीटल उपकरणांच्या मदतीने सेक्शुअल गप्पा मारणेही… सेक्सटिंगला खरंतर व्हर्च्युअल सेक्सक्रीडा असं म्हणण्यास हरकत नाही. अगदी कामातून वेळ काढूनही लोक सेक्सटिंग करायला विसरत नाहीत. आजकालच्या युवापिढीत सेक्सटिंगच चलन वाढत आहे.

    मोबाईल फोन, कॉम्प्युटर, टॅबलेट किंवा अन्य कोणत्याही डिजीटल डिव्हाईसने आपल्या पार्टनरशी केलेला सेक्स मेसेजेस, फोटो आणि व्हिडीओ पाठवणे किंवा मिळवण्याला सेक्सटिंग असं म्हणतात. जसं याच्या नावावरून स्पष्ट होतं की, सेक्सटिंग हा दोन शब्द म्हणजे सेक्स आणि टेक्स्ट मिळून तयार झालेला आहे. ज्याचा अर्थ सेक्सशी निगडीत मेसेजेस पाठवणे. आजकालच्या लोकांमध्ये सेक्सटिंग हा शब्द खूपच वेगाने लोकप्रिय होत आहे. ज्याप्रमाणे लोक आता सेक्सबाबत मोकळेपणाने बोलू लागले आहेत. त्याप्रमाणेच सेक्सटिंगच्या माध्यमातून लोक विना संकोच आपल्या सेक्सबाबतच्या इच्छाही जाहीर करत आहेत. सेक्सटिंगच्या माध्यमातून अधिकतर लोक नॉनव्हेज जोक्स किंवा सेक्सशी निगडीत जोक्स करून समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करतात.

    त्या दोघांमधल्या गप्पा सहजच सुरु झाल्या. सुरुवातीला तो फेसबुकवर चालतो तसला ‘हेल्दी फ्लर्टींग’चा प्रकार होता. त्यात तिलाही काही वावगं वाटलं नाही आणि त्यालाही… हळूहळू जनरल गप्पा पर्सनल व्हायला लागल्या. ती त्याच्या दिसण्याबद्दल, शरीराबद्दल उघड उघड बोलायला लागली. तिला त्याच्याशी बोलायला का आवडतं? कसं वाटतं? निरनिराळ्या संदर्भात त्याच्या सहवासाबद्दल तिला ओढ असते वैगरे वैगरे… ती इतक्या उघडपणे बोलायला लागेल याचा अंदाज नसल्याने तोही मग मिळालेल्या संधीचा फायदा घ्यायला लागला. तिला कोणत्या फ्लेवरचा सुरक्षाकवच आवडतो इथपासून कुठल्या रंगांच्या अंतर्वस्त्रात ती अधिक खुलून दिसू शकेल इथपर्यंत सगळ्याच गप्पा चॅटिंग बॉक्समध्ये व्हायला लागल्या.

    सुरुवातीला या सगळ्याची दोघांनाही गंमत वाटत होती. यात कुठेच शरीर सहभागी नसल्याने त्यांच्या मनातल्या व्यभिचाराशी संबंधित जाणिवांना ठेच पोचत नव्हती. मग एक दिवशी त्याने तिला नग्न बघण्याची मागणी केली. तोपर्यंत शरीराच्या मापांबद्दल इतकं चॅटिंग झालं होतं की, एकमेकांना बघण्याची उत्सुकता होतीच… तिनंही त्याची मागणी मान्य केली पण त्याचबरोबर त्यानंही नग्न होत व्हिडीओ चॅटिंग केलं पाहिजे असा आग्रह धरला. पहिल्या काहीशा अवघडलेल्या आणि भीतभीत झालेल्या व्हिडीओ कॉलिंग नंतर त्याची चटकच लागली. आपण हळूहळू कोणत्या दिशेने जातोय? याचा त्यांना अंदाजच येत नव्हता.

    वयाच्या एका विशिष्ठ वळणावर आयुष्यात काहीतरी थ्रिल पाहिजे म्हणून सुरु झालेला हा खेळ हळूहळू विकृत व्हायला लागला. वेळीअवेळी त्याच्या डिमांड्स सुरु झाल्या आणि तो आपल्या सारखंच इतरही स्त्रियांशी सेक्सटिंग करत असणार या विचाराने ती अस्वस्थ झाली. तिला मिळत असलेलं ‘प्लेजर’ तिला कदाचित शेअर करावं लागत असेल या विचाराने ती वेडीपिशी झाली. हे सगळं कसं डील करावं हेही तिला आणि त्याला समजत नव्हतं. गंमतीगमतीत सुरु झालेला खेळ कुठे जाऊन पोहचेल? याचा कुणालाच अंदाज येत नव्हता. चालू प्रकार पुढे तसाच चालू ठेवणं दोघांनाही शक्य नव्हतं. नवे पार्टनर्स शोधावेत का? असे विचार मनात येत होते. सेक्सटिंगच्या व्यसनात आपण अडकलोय हेही समजत होतं, तर दुसरीकडे लागलेली चटक सोडवत नव्हती.

    ही फक्त या दोघांची गोष्ट नाही. ही फक्त त्यांच्या आयुष्यात झालेली गडबड नाही, तर असे निरनिराळ्या वयोगटातले अनेक स्त्री-पुरुष यात अडकलेले असतात. सेक्सटिंग हे ऑनलाईन जगताच भीषण वास्तव आहे. त्यातून ब्लॅकमेलिंग पासून ते शेअर झालेले नग्न फोटो आणि व्हिडीओ पॉर्न साईट्सना विकण्यापर्यंत अनेक गोष्टी होतात किंवा केल्या जातात. टिएजर मुलांमध्ये सेक्सटिंगचं प्रमाण प्रचंड आहे. एकमेकांच्या लैंगिक भावना चालवणारे मेसेजेस, फोटो आणि व्हिडीओ एकमेकांना गंमत म्हणून, थ्रिल म्हणून, पिअर प्रेशरने पाठवणं ही खूप कॉमन गोष्ट व्हायला लागली आहे. यात दरवेळी फॉर्वर्डेड फोटो किंवा व्हिडीओज असतील असं नाही. तर स्वतःचेही फोटो आणि व्हिडीओ पाठवण्याचं प्रमाण मोठं आहे. शिवाय हा असला तरुण वयाचा उन्माद आहे असं मानण्याचेही दिवस आता राहिले नाहीत. चाळीशीच्या आतबाहेर असलेल्यांमध्ये देखिल सेक्सटिंगचं प्रमाण विलक्षण आहे.

    हे सगळे प्रकार पूर्वी नव्हते आणि आताच सुरु झाले आहेत, असंही आपण म्हणू शकत नाही. लँडलाईन फोन्स आले, त्यानंतर अशा ‘हॉट लाईन्स’ होत्याच… जिथे समोरची स्त्री पुरुषांशी लैंगिक भावनांना उत्तेजना देणारं बोलत असे. सेक्सटिंग याच ‘हॉट लाईन्स’चं आधुनिक आणि वेगवान रुप आहे. त्यामुळे इंटरनेटच्या क्रांतीनंतर या सगळ्या विकृत गोष्टी सुरु झाल्या वैगरे मानण्याचं कारण नाही. पूर्वी फक्त पुरुषांकरता आणि श्रवणापुरता मर्यादित असलेला हा मामला आता स्मार्टफोन सगळ्यांच्या हातात आल्याने जेण्डरलेस झाला आहे.

    पण सेक्सटिंगची गुंतागुंत दिसते तितकी सोपी आणि सरळ नाही. यात अडकलेली माणसं मग ती कुठल्याही वयोगटाची का असेना अनेक धोक्यांना आमंत्रण देत असतात. यात मानसिक, भावनिक हानी तर होऊच शकते. पण सायबर क्राईम्सच्या जाळ्यात माणसं अडकण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

    शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
    कमळवेल्ली,यवतमाळ
    भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

Leave a comment