सोमनाथ पगार ‘साहित्यरत्न’ प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराने सन्मानित
गौरव प्रकाशन
नाशिक (प्रतिनिधी): गीतकार, कवी, लेखक, युट्युबर, ब्लॉगर तसेच टेक्नोक्रॅट म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त असे नाशिक येथील प्रसिद्ध साहित्यिक ‘सोमनाथ पगार’ यांना प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र आयोजित ‘प्रजासत्ताक अमृत गौरव सोहळा २०२४’ अंतर्गत बहुचर्चित, मानाचा असा ‘साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४’ मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. साहित्यिक सोमनाथ पगार यांच्या साहित्यिक तसेच चित्रपट क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी बांद्रा, मुंबई येथील इतिहास प्रसिद्ध नॅशनल लायब्ररीच्या सभाग्रहात संपन्न झालेल्या या सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ.बाळासाहेब तोरस्कर, उद्घाटक, महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समितीचे उपाध्यक्ष डॉ.ख.र.माळवे तसेच प्रमुख पाहुणे राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकारचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.जी.डी.यादव, नासा शास्त्रज्ञ डॉ.हेरिक एंजल्स, दैनिक प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर, बी.पी.ई.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरीश सुर्वे, बी.पी.ई हायस्कूलचे मुख्याध्यापक भानुदास केसरे, नॅशनल लायब्ररीचे सचिव प्रमोद महाडिक, ग्रिन्डलेज फार्मास्युटिकल प्रा.ली.चे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर रामकृष्ण कोलवणकर, मल्टी नॅशनल कंपनीचे वित्त व्यवस्थापक राजेश कांबळे, वुमेन्स इंडिपेंडेन्सच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.नॅन्सी अल्बुकर्क तसेच मुख्य संयोजन समिती वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबईचे संस्थापक अध्यक्ष प्रा.नागेश हुलवळे, लेखन अन् मी साहित्य समूहाचे रमेश मारुती पाटील, सा.आम्ही मुंबईकर सा.वृत्तपत्राचे प्रमोद सूर्यवंशी, काव्ययोग काव्यसंस्था पुणेचे योगेश हरणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदान प्राप्त होऊन ठाणे येथील प्रसिद्ध अनघा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘वेदनेचे काटे’ या त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाद्वारे साहित्य क्षेत्रात दमदार पदार्पण करणाऱ्या सोमनाथ पगार यांचे रसिकांनी जोरदार स्वागत केले असून ‘साहित्य तीर्थ’ या नावाने लवकरच प्रकाशित होणार असणाऱ्या त्यांनी लिहलेल्या, विविध साहित्यिक कलाकृतींचा पुस्तक परिचय तसेच परीक्षण लिहून साहित्य क्षेत्रात त्यांनी समीक्षक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्याचबरोबर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या नाशिक येथील निगळ फिल्म्स प्रोडक्शन निर्मित ‘प्रधानमंत्री’ या चित्रपटाचे ते गीतकार असून ‘श्री.संत नारायणनंद काठे महाराज महिमा’ ही मराठी भक्ती गीते तर ‘ऐका हो ऐका माझ्या बळीराज्याची कथा’ ही मराठी शेतकरी गीते यासाठी त्यांनी गीतलेखन केले आहे.
‘माणूस गोगलगाय झाला’ हा त्यांचा कोरोना काळातील कवितांचा कवितासंग्रहही लवकरच प्रकाशित होत असून चारोळी संग्रह, कथासंग्रह, कादंबरी आदि साहित्य प्रकारात त्यांचे विपुल लिखाण चालु आहे.
या कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलाने होऊन शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले. तर प्रा.नागेश हुलवळे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करत आपल्या प्रास्तविकात समितीच्या कार्याचा आढावा घेत सांगितले कि, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून पुरस्कारासाठी प्रस्ताव प्राप्त झाले असून पुरस्कार म्हणजे पाठीवर थाप असते, पुरस्कारामुळे उर्जा मिळून त्यातून राष्ट्रहिताची कामे होऊन प्रगती होते.
याप्रसंगी पाहुण्याचा परिचय करून देत सत्कार करण्यात आले. पाहुण्यांचे मनोगत, पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होऊन पुरस्कार वितरण पार पडले.
प्रमुख पाहुणे राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकारचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.जी.डी.यादव आपल्या शालेय जीवनातील आठवणी विनोदी शैलीत सांगत त्यांनी स्वतः विद्यापीठ गीत लिहिलं असून शास्त्रज्ञ कविता सुद्धा लिहू शकतो. भारत सरकारने पीएचडी पर्यंतचे शिक्षण मोफत दिल्यास समाज सुशिक्षित होईल. त्याचबरोबर उद्योजकता वाढली पाहिजे, त्यासाठी सरकारने संशोधनासाठी निधी दिला पाहिजे. आम्ही देवळात शिकून प्रगती केली. त्यामुळे विद्वता असेल तर कुणीही कुणाला थांबवू शकत नाही. कठीण परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही. असे प्रेरणादायी भाषण करून उपस्थित सर्वाना मनमुराद हसविले. तर नासा शास्त्रज्ञ डॉ.हेरिक एंजल्स यांनी ‘तुम्ही सर्वांनी सीडी होऊन येणाऱ्या पिढीला घडवा’ असा मोलाचा सल्ला दिला. तसेच दैनिक प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर यांनी निवडणुकीत सत्तेची नशा उतरत असून मतदानाच्या ताकदीमुळे लोकशाही बळकट होते. असे राजीकीय विषयावर सखोल भाष्य केले. या सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ.बाळासाहेब तोरस्कर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पुरस्कार्थींचे अभिनंदन करत साहित्यिकाने आपली संवेदना जागी ठेवत त्याची लेखणी पेटून उठली पाहिजे. तसेच गावाची नाळ जपत साहित्यिक चळवळ जिवंत ठेवावी. याचबरोबर लेखक हा चांगला माणूस असला पाहिजे असे त्यांचे मार्गदर्शनपर भाषणही लाख मोलाचे ठरले.
पुरस्कार प्रेरणा देतात, यामुळे लिखाणाला बळ तर मिळतेच शिवाय आपल्या साहित्याचा दर्जा कळतो. या प्रेरणादायी पुरस्कारामुळे मला पुढील साहित्यिक वाटचालीस निच्छितच दिशा मिळून याहीपुढे अधिकाधिक दर्जेदार लिखाणास मदत होईल. असे मत यावेळी सोमनाथ पगार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केले.
या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन योगिता पाखले, योगेश गोतारणे व वैशाली पाखले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.नागेश हुलवळे यांनी मानले.
या यशाबद्दल कवी सोमनाथ पगार यांचे साहित्यिक, कला, मनोरंजन, सामाजिक, राजकीय इत्यादी सर्वच स्तरांतून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत असून संयोजन समितीसह सर्व मान्यवरांचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहे.