पुतळा ढासळणे हा निकृष्ठ बांधकामाचा पुरावाच.!
नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. ४ डिसेंबर२०२३ रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं.महाराजांचा पुतळा का पडला यावर आता राजकारण होत आहे..
शिवाची महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळल आहे. याबद्दल दुमत नाही .शिवप्रेमी म्हणून महाराष्ट्रातील तमाम लोकांनी याचा निषेध केला आहे..सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभरण्यात आला होता . ज्यावेळी काम सुरू होते त्यावेळी स्थानिक लोकांनी सुद्धा कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. पण त्यावेळी पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले. जे विरोध करत आहे करत आहेत ते आपल्या विरोधात आहे असा समज करुन घेत आहे. ४०० वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील उभारलेला पुतळा ढासळला हे फार मोठे दुर्दैव आहे. या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल झाले आहेत.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची हा पुतळा ३५ फुटांचा होता. मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय नौदलाने देखील आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. या पार्श्वभूमीवर नौदलाच्या वतीने ४डिसेंबर २०२३ चा नौदल दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर नौदल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला होता. पुतळ्याची किंमत २ कोटी ४० लाख ७१ हजार एवढी रुपये एवढी होती.
कल्याणचा तरूण शिल्पकार आणि मालवणचा सुपुत्र जयदीप आपटे यांनी हे शिल्प बनवलं आहे.
पुतळा का पडला यावर आता जोरदार राजकारण होत आहे.निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे हा पुतळा ढासळला,असे विरोधक बोलत आहे.गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पाऊस तसेच वाऱ्याचा वेगही अधिक होता. मुसळधार पावसाच्या वेळी वाऱ्याचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रति तास होता, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली.हेच कारण मुख्यमंत्री सांगत आहे.हा पुतळा या वाऱ्याला किंवा यापेक्षा जास्त वेगवान वाऱ्याला तोंड देऊ शकण्यासाठी सक्षम नव्हता म्हणून पुतळा ढासळला. या प्रकरणी सरकार आपला बचाव करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती. शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो, त्यांनीच या पुतळ्याची उभारणी केली होती. यासंदर्भात मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंत्राटीला काम देण्यात आले होते. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत, तर केतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. समुद्रकिनारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं पत्र लिहून नौदलाच्या निदर्शनास आणून दिले होते, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.
पुतळे उभारताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.नियोजन करण्याचे व पर्यावरणाचा विचार करण्याची गरज आहे.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उंच पुतळ्यानंतर देशात मोठे पुतळे उभारण्यास अधिक चालना मिळाली आहे. मात्र, असे उंच पुतळे उभारण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक आहे. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या पुतळ्याचे अवशेष समोर आले आहेत. त्यावरून हा पुतळा उभारण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला होता का, या पुतळ्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य, त्यासाठीचा निधी, पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्या ठिकाणाच्या वातावरणाचा अभ्यास झाला होता का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मोठा पुतळा उभारण्यासाठी सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी अपेक्षित असतो, याकडे या निमित्ताने लक्ष वेधण्यात येत आहे.
उंच पुतळा उभारताना आधी जागेचे निरीक्षण होणे आवश्यक असते. या जागेत खडक किती, मुरुम किती, माती आहे का याची तपासणी होणे आवश्यक असते. एखादा भाग भूकंपप्रवण असेल तर ती जमीन पुतळ्यासाठी स्वीकारली जात नाही. मात्र, तिथेच पुतळा उभारायचा असेल तर एखादे झाड जेवढे जमिनीवर असते तेवढीच त्याची मुळे खोल असतात त्याप्रमाणे खोली तयार करून त्याचा पाया घडवावा लागतो. उंच पुतळ्यासाठी स्टीलचा सांगाडा असणे आवश्यक असते, अशी तांत्रिक माहिती प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी दिली. निविदा पद्धतीने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम होण्याची शक्यता असते. कमी पैशांमध्ये काम करताना साहित्यही निकृष्ट दर्जाचे वापरले जाते. तसेच या निविदा पद्धतीमध्ये पैसेही खाल्ले जाण्याची शक्यता असते, अशीही तक्रार त्यांनी केली आहे.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६