समाजमनाच्या मातीत रुजलेले अक्षर बीज म्हणजे – अक्षरपेरणी
अक्षरवाड्मय प्रकाशन ही साहित्य प्रकाशन संस्था गेली अनेक वर्षापासून साहित्यिकांच्या सेवेत ऊन, वारा, पावसात अविरत उभी आहे, दर्जेदार साहित्यिकांच्या सोबतच दर्जेदार साहित्याला प्रकाशात आणून वाचकांना साहित्यिक मेजवानी देत आहे. याच मेजवानीचा परिपाक म्हणून अक्षर पेरणीने जुलै-ऑगष्ट २०२४ च्या अंकासाठी एक मुखपृष्ठ जारी केले आहे. या मुखपृष्ठावरील संदर्भ बघून काही निष्कर्ष निघतात का? अक्षरपेरणीने हे मुखपृष्ठ याच महिन्यासाठी का निवडले असावे, मुखपृष्ठ आणि अक्षरपेरणी यांचा काही संदर्भ आहे का? यातून मानवी जीवनाशी काही अर्थ लागतो का? या आणि अशा अनेक प्रश्नंची सरबती मनावर झाल्याने या मुखपृष्ठावर असे काय विशेष आहे की यावर दोन शब्द सहज लिहावेत असे मनात आले.
अक्षरपेरणी या अंकाच्या मुखपृष्ठावर वरचा पट्टा लाल रंगात दाखवला आहे, त्यात अक्षरपेरणी शीर्षकाचा आकार (ढाचा) वळणदार सळसळता पांढऱ्या रंगात दाखवला आहे, काळ्याशार जमिनीवर कपाशीचे रोपटे ओळीने उगवून आल्याचे दिसत असून त्यांच्यामध्ये एका पुरुषाची सावली दिसत आहे. कपाशीच्या प्रत्येक रोपाला पाच पाने आलेली आहेत. असे मुखपृष्ठ माझ्या पाहण्यात आले. या मुखपृष्ठावर एवढाच संदर्भ आहे.. पण हा संदर्भ खूप काही अर्थ देवून जातो.. म्हणून या मुखपृष्ठाचा आपण अभ्यास करणार आहोत.
अक्षरवाड्मयने हे मुखपृष्ठ याच महिन्यासाठी का निवडले असावे असा प्रश्न साहजिकच माझ्या मनात आला… त्यामागचे मूळ कारण असे की, ग्रामीण भागात मृग नक्षत्र लागले की शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु होते, उन्हाळ्यात शेतीची केलेली मशागत वाया जाऊ नये म्हणून बळीराजा अहोरात्र मेहनत घेऊन मृगवाफात शेतीत बी रुजवायला टाकत असतो, साधारण एक महिन्याच्या आसपास रुजलेले बी बाळसं धरून मातीवरची खपली काढून सूर्याला सामोरे जाण्यासाठी उगवून येते. जुलै महिन्यात पिकांची अशी वाढ झालेली दिसली की बळीराजा सुखावतो… त्यांच्या कष्टाचे चीज झाले म्हणून तो आनंदांत असतो. लाक्षणिक अर्थाने याचा गर्भित अर्थ असा आहे की, *माणसाला जर काही कमवायचे असेल तर आधी स्वतःला मातीत रुजून घ्यावे लागते. आपल्या रुजण्यातून परिवाराला सुखाचे दिवस येण्यासाठी कठीण प्रसंगाच्या मातीतून हाल अपेष्टांची खपली बाजूला सारून सूर्यासारख्या प्रखर वेदना देणाऱ्या संकटाना सामोरे जाण्याची हिम्मत ठेवून उभे राहता आले पाहिजे तरच मानवी जीवन सुखमय होते* असा गर्भित अर्थ मला यातून जाणवला आहे आणि म्हणूनच मुखपृष्ठचित्रकाराने अतिशय कल्पकतेने या महिन्यासाठी असे मुखपृष्ठ चितारले आहे.
अक्षरपेरणी या अंकाच्या मुखपृष्ठावर वरचा पट्टा लाल रंगात दाखवला आहे, त्यात अक्षरपेरणी शीर्षकाचा आकार (ढाचा) वळणदार, सळसळता पांढऱ्या रंगात दाखवला आहे याचाही अर्थ अतिशय व्यापक स्वरूपाचा आहे. शेती व्यवसायाचे मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या या मुखापृष्ठाकडे पाहिले की आयुष्याचे काही संदर्भ आपोआप उमगत जातात. मातीत राबताना घामाचे मोती निढळावरून दोन बोटाने पुसून मातीत मिसळावे लागतात. हे घामाचे पाणी नसून रक्ताचे पाणी असते. हा रक्ताचा लाल रंग मुखपृष्ठाच्या वरच्या बाजूला दाखवला आहे. रक्त मातीत मिसळल्याशिवाय मातीतून सोने उगवत नाही… कपाशी हे शेतकऱ्याचे पांढरे सोने आहे. म्हणून या मुखपृष्ठावर कपाशी उगवून आलेली दाखवली आहे आणि कपाशीचे असे उगवणे म्हणजेच सुखाची अनुभूती घेणे होय. अक्षरपेरणीच्या शीर्षकाचा आकार (ढाच्या) वळणदार, सळसळता दाखवला आहे, याचा अर्थ असा की, ज्या प्रमाणे कष्टाने रक्ताचे पाणी करून सोन्यासारखे पिक उगवलेले दिसते ही वाऱ्यासोबत आनंदाने डोलत राहते असेच पिक समाज मनाच्या मातीत शब्दांची पेरणी करून अक्षरपेरणी सारखा दर्जेदार अंक उगवून येतो आणि या अंकातील लिहिते हात जणू काही आनंदाने डोलत आहे असा गर्भित अर्थ या अक्षरपेरणी शीर्षकातून मला जाणवला आहे.
अक्षरपेरणी या अंकाच्या मुखपृष्ठावर जी रोपे उगवली आहेत ती ओळीने दिसत आहेत. कपाशी लावतांना अशी ओळीतच लावावी लागते. त्यामुळे झाडाची वाढ चागली होऊन बोंडे जास्त लागतात. तसेच दोन झाडात सारखे अंतर ठेवले आहे , माती भुसभुशीत आहे, काडी कचरा वेचून घेतला आहे, रान स्वच्छ आणि निर्मळ ठेवले आहे. हा सृष्टीचा नियमच आहे. हाच नियम मानवी जीवनातही लागू होतो. माणसाने आपले कर्तव्य कुणाच्याही अपेक्षाविना सुरळीत, असे ओळीत केले पाहिजे. समाजात वागताना असं सुटसुटीत राहिले पाहिजे, मन निर्मळ राहिले पाहिजे त्यामुळे कामात टापटीपपणा, सुंदरता येत असते आणि काम लवकर होते आणि त्या कामाचे फळ देखील चांगले मिळते. या गर्भित अर्थाने हा फोटो मुखपृष्ठावर घेतला असावा असे मला वाटते.
‘अक्षरपेरणी’ या अंकाच्या मुखपृष्ठावर एका पुरुषाची सावली दाखवली आहे.. हे छायाचित्र घेतानादेखील अतिशय विचारपूर्वक घेतलेले आहे यातून मला असा अर्थ गवसला की, मातीमध्ये राबताना शेतकरी स्वतःला झोकून देत असतो , आणि झोकून दिल्याशिवाय शेती पिकत नाही. जोपर्यंत शेतीत स्वतः कष्ट करीत नाही तोवर शेती होणार नाही. हे स्वतःला झोकून देणं म्हणजेच मातीत गाडून घेणे असते. शेतीवर सतत लक्ष ठेवावे लागते आपली सावली सतत या शेतीवर पडली पाहिजे तरच पिक चांगले येते. असा गर्भित अर्थ मला जाणवला आहे.
‘अक्षरपेरणी’ या अंकाच्या मुखपृष्ठावर कपाशीच्या प्रत्येक रोपाला पाच पाने आलेली आहेत. हे छायाचित्र घेतले त्यावेळी ही पाने कोवळी लुसलुसीत आहेत. या मुखपृष्ठावर हे छायाचित्र घेतल्यामुळे पाच पानांना एक वेगळेपण प्राप्त झाले आहे. हे मुखपृष्ठ शेतीशी निगडीत असल्याने शेतकऱ्यांसाठी मोलाच संदेश दिला आहे. शेतकऱ्याने शेती करतांना काळ, वेळ, पाणी, अर्थ, आणि संधी या पंचकर्माचे नियोजन केले पाहिजे.. पहिले कर्म म्हणजे काळ. आपण कोणत्या काळात हंगामात कोणते पिक घेतले पाहिजे याचे नियोजन केले पाहिजे याच नियोजनातून शेतीची मशागत ज्या त्या काळात ज्या त्या वेळी केली पाहिजे. शेतीसाठी पायाचा स्रोत काय आहे, केलेल्या पिकाला शेवटपर्यंत पाणी पुरेल का तरच ते पिक घेतले पाहिजे, शेतीत योग्य काळात, योग्य वेळेत पैशाचे आर्थिक नियोजन करून कामे केली पाहिजेत तरच आलेल्या चांगल्या पिकाला बाजारपेठेत विक्रीची संधी उपलब्ध होत असते. जर हे पाच नियोजन नसतील तर बाजारपेठेत मालाला किमत येत नाही हा अर्थ मला या पाच पानातून जाणवला आहे. सामाजिक जीवनात देखील माणसाने आयुष्यात पंचेन्द्रियाने जागृत राहून समाजसेवा केली पाहिजे असा गर्भित अर्थ एका झाडाच्या पाच पानातून अभिप्रेत होतो. अक्षरवाड्मयने अशीच पंचतत्वे वापरून अक्षरपेरणीचे रोपटे उभे केले आहे हा अर्थ यातून मला जाणवला आहे.
‘अक्षरपेरणी’ अंकाचे प्रकाशक बाळासाहेब घोंगडे यांनी अत्यंत अर्थपूर्ण आणि कल्पकतेने जुलै-ऑगस्ट महिन्याच्या अंकावर मुखपृष्ठ साकारले आहे आणि या अंकाचे प्रकाशन अक्षरवाड्मय प्रकाशन ,पुणे यांनी केले असून कवी लक्ष्मण खेडकर यांनी आपल्या कल्पकतेने हे छायाचित्र उपलब्ध करून दिले, बुध्दभूषण साळवे यांनी या अंकाची मांडणी अत्यंत सुबकपणे केली आहे. अक्षरांचे बीज समाजमनाच्या मातीत रुजवून साहित्याची अक्षरपेरणी करणाऱ्या हातांना पुढील अक्षर पेरणीसाठी खूप खूप शुभेच्छा …
मुखपृष्ठ परीक्षण –
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० *( तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)*
कलाकृतीचा परीचय :
कलाकृतीचे नाव- अक्षरपेरणी
साहित्य प्रकार – मासिक
प्रकाशक – बाळासाहेब घोंगडे
प्रकाशन – अक्षरवाड्मय प्रकाशन ,पुणे
छायाचित्र सहकार्य – कवी. लक्ष्मण खेडकर, पाथर्डी