शिंगंकाड्या पुंजाजी
पुंज्यानं झाकटीतच तमरेट घेऊन घरामांगचा नाला जोळ केला. दोन मिनीटात तरातरा तमरेट हलवत एका हातात बाभूयची दात घासायसाठी काडी व दुसऱ्या हातात भलामोठा लाकडाचा फाटा वढत वढत तो रस्त्यानं चालला होता. तेवढ्यात त्याले आपल्या घराच्या समोर वाडग्यात बुढीनं वाऊ घातलेल्या पऱ्याटीच्या इंधनाच्या कवट्यावर कुत्रं पाय वर करून मुततांना दिसलं.त्यांन दुरूनच हातात गोटा घेऊन “झऊ लेकाचा लाळ सायाचं तं,तथी आलं सती पळाले ” आलेलं कुत्रं त्याच्या अवाजानंच भो– पयालं. तापावर अंग शेकत बसलेल्या झिंगाजीनं त्याले “जरासक आंगगींग शेकसान की नाही पुंजाजीबुवा” म्हणत हाक मारली.”असं म्हणताच दोन मिनिटं तमरेट खाली ठेवत पुंजाजी घडीभर तथीसा थांबला.
“परसाकडे गेलो होतो दिसलं झोळपं हे,म्हटलं बुढीले सयपाक पाण्याले कामी पळते;कामा- धंद्याच्या गरबळीत बुढीले कायले तरास तीले”असं म्हणताच झिंगाजीनंही मंग न राहवत
“लयच गरबळ दिसून रायली तुमची आज तं”
पुंज्यानं घसा खाकरून
“हो राजेहो आज बजार आहे ना सोनखेडचा, दिवस डूबेलोक काहाले घरी येते माणूस एकदाचा गेला की,कसेही बजारहाटाले बुढाबुढीले कामी पळते दोन पैसे, आपल्या घरी काय ठेव आहे कोणाची घरी बसून आयतं खाले”
झिंगाजीनंही
“खरी गोठ हाये राजेहो तुमची” असं म्हणत पुंज्याले तापावर जरासाक कचरा आण्याचा इशारा करत
“जराशीक सासु आणा बरं तुमची” असं म्हटल्याबरोबर पुंज्यानं थंडीचा रोख पाहून आंग शेकाच्या उद्देशानं बाजुलाच असलेल्या कराडीवरची तुराटया- पऱ्हाटयाईची मुठ पेटवलेल्या तापात टाकली.आगीनं चांगलाच भडकला घेतला होता.
“लय कडक आहे राजेहो सासु तुमची तं”
असं झिंगाजीनं म्हणताच पुंजाजीले चांगलाच गदका चढला होता. व त्यांनंही मंग खुदकून गालात हासून
“अजून बांजीदेपणा गेला नाही राजेहो तुमचा”
असं मजाकीनं झिंगाजीले त्यानं म्हटलं.पुंजाजीही थंडीचं आंग शेकत घटकाभर थांबून साजरं कराकरा दात घासत होता. झिंगाजीही ताव्यावर भाजलेल्या गुलानं तोंड घासत तापावर मस्त पाय पसरून बसला होता. त्याच तोंड चांगलच रंगलं होतं.तशी म्हणाल तं आज थंडीही तशीच पळली होती. पुंज्यानं दात घासून झाल्यावर लगेच झिंगाजीनं तापावर ठेवलेल्या व आगीनं कायाठीक्कर पडलेल्या बटलोईतल तमरेटभर पाणी घेऊन घशात दोन बोटं टाकत तथीच गुराळे टाकत गुयणे टाकाले सुरूवात केली व तमरेट हालवत घराची वाट धरली.त्याच तमरेट ही पाहण्यालायक होतं . एन्डोसलफानची सगयी शिशी गयापासून कापलेली.व त्याले तारांचा हातात धरासाठी यू आकाराचा छिद्र पाळून केलेला आकोळा.शिशीचा बुळाशी पाणी टपकू नये म्हणून टाकलेला कायाभोर डांबराचा लेप व त्याच्यात ज्वारीचे दहावीस दाणे टाकलेले.ते दाणे पाण्यांन फुगले की लिकेज् बंद करायची ही ग्रामीण भागातील लोकांची भन्नाट कल्पना अफलातून होती.कमी पैशात जीवन जगायची रीत दररोज फुकटात उपलब्ध होणारी दात घासायची तापातली राखोंडी,तपेलयात गरम केलेलं पाणी. तेही सहज उपलब्ध होणाऱ्या जळाऊ लाकडांचा वापर करून. जास्त चोचले न करता आंघोळीसाठीही कपडे धुवायच्या साबणाचाच वापर करून आलेली वेळ मारून न्यायची साधीसोपी पद्धत.चपलेला पॉलीश ऐवजी चाकातील वंगनाचा नाही तं खोबरेल तेलाचा हात लावून चप्पल चमकवण्याची घरगुती पद्धत. आठवड्यापूर्वी मारवाडयाच्या दूकानातून आणलेलं टोपाज ब्लेड,कोणतही क्रीम न वापरता त्याच्या का-कू करत केलेल्या सात आठ दाढ्या,वखरानं परऱ्याटी वखरावी किंवा नांगरावी तरीही सुटलेली चार दोन झाडासारखी घशाटलेली गावाची चामडी व तिथं चार,दोन केसं उभे असलेली राकट त्वचा,एकच सदरा आलटून पालटून वापरलेला.फुटलेला आरसा त्यालेही काठाचा पत्ता नसायचा.हा आरशाचा फुटलेला तुकडा गाव खेड्यातून बऱ्याचदा समोरच्या दर्शनी भागातल्या भितीत बसवलेला राये.एकच कंगवा त्याचेही जागोजागचे दात पडलेले.असं अस्सल पण नेटकं ग्रामीण भागातील लोकांच जीवन तसंच पुंज्याचही होतं.एकच पोरगं तेही पोट भरण्यासाठी सासऱ्यांच्या अधारांनं सासुरवाडीले गेलेलं. मंग काय मोलमजूरीवर जीवन असलेला. पुंज्याचीही तशी या गोष्टीले ना नव्हती ना कुठे त्यानं विरोध दर्शवला नव्हता.
“पोट भरायसाठी तर कुठीनाकुठी जावं तर लागणारच.की कोणी आपल्याले आयतं घरी आणुन दिल”
आपलं काही देणं नाही,व त्याच काही आपल्याले घेणं नाही. तु तुह्या परंपचात खुष राय लेका” पाखरांची पिल्लं मोठी झाली की लगेच घरट्यातून ऊडून जातातच की,त्यात आपला काय केवा”
अशी पुंजाजीची समाधानी वृत्ती घरी दोघेच बुढाबुढी दुसऱ्याच्या वावरात धावायचे, खायचे. पुंज्याच नदीच्या कराडीवर गोदरीजोळ कुळाचं घर.समोर बाभूयची वाढलेल्या कावरल्या काट्या.जागोजागी पावसानं गयलेलं झोपडं.मेनकापडाचा थर दिलेलं,वरतून भिताडावर छावन्याईचा जाडा थर. मोठमोठ्या पांढऱ्या गळीच्या मातीच्या हात दोन हाताच्या जाडजूड भीती. तथीच रातचं खाली झोपणं,बाजूला सातऱ्या , वाकया ठेवायची मोठी घडोशी.बाजूला अंधारी कुबट सयपाक खोली,कुळाची न्हानी. त्याच्यात कंबरभर खड्डा खोदून रोयलेली कुंभाराजोळून आणलेली वापरायच्या पाण्याची नांद. त्यानं बुढीनं चुलीवर ठेवलेला बकरीच्या दुधाचा च्या फुटक्या कान तुटलेल्या कपात गटगटं उभ्यांनच घेतला.साजरं कचकचं अंग धूतलं व धोतराच्या सोगयाले पुसून कोरडं केलं. सुर्य वर आला तरी गोठलेल्या खोबरेल तेलाची शीशी त्यानं चुलीवर धरली.तोपर्यंत बुढीनं साजरी चूलीवर गरम भाकर व मस्त ताकातलं चून वरलं होतं. पुंज्यानं कोरभर भाकर ताटलीत मोडून पायाच्या टोंगयावर मोठा लाल कांदा फोडुन,मचमच तोंड वाजोत चुपचाप खाऊन घेतली. आंगनात येऊन तवेलीनं राजनातलं पाणी काढून डकडकं पोट भरून मस्त सट पिऊन टाकलं. दुपट्टयानं तोंड पूसत सायकल बाहीर काढली. तीले आईलपाणी,तेलपाणी केलं. जाड्या भरडया सुताच्या थैलीत बैलाईची शिंग फोडायची लाकडाची मूठ असलेली मोंगरी,कत्ता टाकला.किकरं वासला हातोडी,शिंग कापायची आरी,व सारी बारीक चिरीक कामा येणारी अवजारं आठोनीनं झोऱ्यात संग घेतली.शिंगाईची लेवल लावाले कानसं घेतली.हा त्याच्या आज्या पणज्या पासूनचा ढोरा,वासराईची शिंग ,खुरं काढण्याचा पिढीजात धंदा होता.तोच त्यांन आयुष्याच्या अखेरपर्यंत इमानइतबारे निभवला होता.इतर दिवशी मोलमजूरी करायची बजारहाट असला म्हणजे आपला परंपरागत चालत आलेला व्यवसाय करायचा असा त्याचा जोडधंदा होता.फार मोठी कमाई नसली तरी दिवसाला चारपाचशे रूपयाले मरण नसायचं. तेही चारपाच बैलजोड्या आल्या तर.बैलाचीजोडी दिडशे रुपये तर म्हैस दोनशे रुपये कामून की महैशीचे शिंग बैला पेक्षा काढायला भारी व मोठे असतात.हेच त्याच्या धंद्याचं तोंडी रेट-बोर्ड.
भाकर खालल्यावर आपलं धोपटीबेलनं घेऊन पुंजाजीनं सायकलवर टांग मारून खेडयाची वाट धरली.बजार बराच भरला होता.लोकाईनं नवनवीन जोड्या विकायले आणल्या होत्या तर काहींनी नवीन जोड्या खरेदी केल्या होत्या. पुंज्याची नेहमीची म्हणजे धर्मायाच्या हौदापासची जागा ठरलेलीच होती.खरेदी विक्रीच्या मागच्या बाजूले भरणाऱ्या बैल बजारात तो नींबाच्या सावलीत कानाले दुप्पट बांधून आपला मयका झोरा घेऊन उन्हातान्हात गिऱ्याईकांची वाट बघत किती तरी वाडखोळचा एकटाच बसायचा.हाटेलातल्या सन तेलातल्या निंघालेल्या गरम भज्याईकडे आशाळभूत नजरेनं पहायचा. खेड्यापाडयात त्याची वयखीही बरीच असल्यानं व कामही साफसुफ असल्यानं गावोगावी, खेडोपाडी त्याले पेशल बलावनं असायचं. लोकं प्रेमानं चहा, नाश्ताही खाऊ घालत.तोही मोठ्या आनंदाने सोबत जाई.कधीकधी तं नांगरलेल्या आडवळणाच्या वावरातून सायकल चालवत घेऊन जातांना त्याची चांगलीच कसरत व्हायची.आलेल्या पैशात तेल,तिखट,मीठ आपला प्रपंच चालवायचा.एखादा मारका बैल असला की हातापायाले जखमही व्हायची .शिंग काढतांना कोण्या शिंगाला कुठपर्यंत जीवाई आहे हे तो नखांच्या टिचकीनं न पायता ही वाजूवून सांगायचा.शिंग टणटण वाजलं तर पोकय व ढबढब वाजलं तं जीवई असं पक्कं गणित त्याच होतं. आजपर्यंत कोणाच्याही जनावरांचे शिंग काढतांना त्याच्या कडून रगत आलं नव्हतं की जीवई लागली नव्हती हेच पुंज्याच्या धंदयाच गेंशीग होतं.पोयाच्या दिवशी तं त्याचा खरा सिझन असायचा. कोणाच्या बैलाईचे शिंग काढ, कोण्या ढोराईचे खुरं काढ.असा त्याचा ठरलेला कार्यक्रम चालायचा. त्याच्या हातची जनावरांची काढलेली शिंग तलवारीच्या पात्यासारखी चमचम चमकायची.तेलाचा हात लावला की मस्त काचासारखी चोपळी दिसायची.खटल्याईवाले त्याले निरोप देऊन बलाऊन घेत.चार दोन पैसे खिशात घालत. कधीकधी तर मणभर ज्वारी मोठ्या प्रेमानं संग बांधून देत. पोळ्याच्या, सणासुदीच्या दिवशी खटल्याईत पुरणाची पोई,भजे,कुरोळया पोटभर खायला भेटत.पण हल्ली मात्र पुंज्या बऱ्याच दिवसांनी दिसल्यावर थकलेला व रापलेला दिसायचा.बऱ्याच वेळ मारुतीच्या पारावर त्याची बैठक आता दिसायची. तशी परिस्थितीही पयल्या सारखी रायली नव्हती.हल्ली यांत्रिक पद्धतीने शेती असल्यानं बैलजोड्या लोकाईनं जवळपास मोळीतच म्हणजे जवळजवळ ईकल्या होत्या. त्यामुळे पाहिजे तशी पयल्यासारखी पुंज्याची आता कमाईही होत नव्हती.बुढी चार दोन शेतकऱ्यांच्या वावरात निंदायले जाऊन मजूरी करायची. पुंज्याचही आली मजूरीले तर जायचं नाहीतर मारुतीच्या पारावर बसायचं.दुसरं काय करणार आपल्या बापजादयाईनं दुसऱ्याच्या माना मोळून पैसा कमावणं आपल्याले शिकोलं नाही. त्यामुळे पुंज्या कष्टानं मिळालेल्या चटणी,भाकरीतच खुष होता. भर जवानी पासून सुरू असलेल्या या मेहनतीच्या धंद्यानं तोही आता थकला होता.उतारवयात थकलेल्या माणसाकडून कीतीक दिवस काम होणार. हल्ली आता कामंही पयल्या सारख व्हायचं नाही.सायकल चालतांना पुंज्याले धाप लागायची ,थकवा यायचा.फार तर एखादं दुसरं काम हातात यायचं. आता बैलांच्या पायाले पाचरा बसवण्यासाठीही मशीन आली होती.शिंग सोलायसाठी इलेक्ट्ररीकवर चालणारे वा बॅटरी वर चालणारे ग्रांईंडर निघाले होते. त्यालेही हे नवीन आधुनिकीकरण पाहून
“सुखाची कुठी दुःखात टाकता” ईनाकारण ईव्याचा खीवा करणं,काम काय साऱ्या जींदगानीभरच हाये” सरणार थोडी हाये”
त्यामुळे बापजादयाईन पासून चालत आलेला पुंज्याचा परंपरागत धंदा आता जवळजवळ कालबाह्यच म्हणजे संपुष्टातच आला होता.
कथालेखन
-विजय जयसिंगपुरे अमरावती
भ्रमणध्वनी -९८५०४४७६१९