स्वातंत्र्य कधी आम्हाला मिळेल काय ?
१५ ऑगस्ट राष्ट्रीय महोत्सव म्हणजे काय? या दिवसाचे महत्त्व कोणाला माहित नाही असे या भारतात तरी शोधून कोणीच सापडणार नाही.! ते तर सर्वांना माहीतच आहे १९४७ साली आपला भारत देश स्वतंत्र झाला, असे कोणीही नाही ज्या व्यक्तीला हे माहीत नसेल, परंतु तुम्हाला खरंच असे वाटते का, की आपला देश स्वतंत्र झाला आहे, आम्हा मुलींना तरी असे अजून तरी तसे अजिबातच वाटत नाही…!
मुलींनी स्वप्न पाहणे वाईट आहे का? व ते स्वप्न अस्तित्वात आणणे हा गुन्हा आहे का ? स्वप्न पाहणे गुन्हा आहे असेच मला तरी वाटते, प्रत्येक मुलगी घराबाहेर पडण्या अगोदर सतरा वेळा विचार करते मग ती बाहेर पडते त्यात पण एखादा माणूस तिच्याकडे पाहत असला तर ती तिचा अवतार नीट आहे का ते पाहते, कपडे छोटे वाटत आहे का ? घातलेले कपडे खूप फिट आहे का? केस नीटनेटके आहेत का? कुठे काही लागलं आहे का? हे ती बघते परंतु तिच्या वेशभूषेत नव्हे तर त्या माणसाच्याच मनात वाईट विचार सुरू असतात, त्या मुलीचा काही दोष नसतो, तिचे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून न राहवं म्हणून प्रयत्न चालू असतात, कुण्या पुरुषाची वाईट नजर तिच्यावर पडून नये म्हणून ती स्वतःचा अवतार नीट ठेवते, सकाळी शाळेला किंवा कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडतानी पहिले कपडे नीट आहे ना? ते ती पाहते, रस्त्याने जाताना मान खाली घालून आपल्या दिशेने जात असते.
सायंकाळी घरात आल्यानंतर रात्री लवकर बाहेर पडत नाही, साधं मैत्रिणीच्या घरी जरी जायचं असलं तरी चार-पाच वेळा विचार करावा लागतो, रात्रीचं तर विषयच येत नाही, बाहेर जायचं म्हटलं तर किती कारणे सांगायची ? नेहमी मुलींनाच का हा त्रास? मुलींनी जर काही स्वप्न पाहिले तर ते स्वप्न पूर्ण करण्या अगोदर का विचार करावा? व जरी ते स्वप्न पूर्ण केले तर त्या क्षेत्रात आम्ही मुली सुरक्षित आहोत का? स्वातंत्र्य म्हणजे काय असतं? हे तर आम्हा मुलींना माहीतच नाही, मुलांनी तर फक्त एक गोष्ट मागितली किंवा काही करण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना त्याच्या दुप्पट मिळते व त्यांची मागणी देखील लगेच पूर्ण होते, पण आम्ही एक गोष्ट मागू शकत नाही कारण आमच्यावर तेवढा दबाव असतो.
स्वतःच्या पायावर उभे राहण्याची सुद्धा भीती वाटते, नकळत कोणी काही केलं तर! काही कठीण परिस्थिती अशी आली, ज्याला सामोरे जाता येत नाही तेव्हा कोणी मदत करेल का? खूप प्रश्न असे आहेत ज्याने स्वातंत्र्य सुद्धा आपल्यासाठी मिळालेच नाही असे वाटते, खूपदा बातम्यामध्ये, टीव्हीवर, मोबाईलवर दाखवले गेले आहे की काही ठिकाणी मुलीवर रेप होत आहे, काही ठिकाणी मुलींना पळून नेले जात आहे आणि काही ठिकाणी मुलींची विक्री होत आहे, मणिपूर, कोलकता, उत्तर प्रदेश, बदलापूर अश्या असंख्य घटना बातम्यांमध्ये बघितल्यावर मनाला एक प्रश्न पडतो, का बरं मुलींनाच हा त्रास?
का बरं मुली आत्महत्या करतात? याचे कारण तर हेच आहे ना की मुलींना स्वातंत्र नाही, परंतु जरी मुलींनी आत्महत्या केली तरी समाज खऱ्या कारणाचा शोध न घेता मुलीवरच आरोप लावला जातो की त्या मुलीचे बाहेर काहीतरी असेल! घरच्यांनी मारले असेल! भांडण झाले असेल, का तुम्ही ठरवत आहे? काय झालं असेल? ते समाज का खरं कारण लपवत आहे ? का मुलींना असे वाटते की मी एक मुलगा असायला पाहिजे होते ! या जगात कोठेही जा पण या मुलींवरचा दबाव काही संपत नाही, जर मुलींना तुम्ही सांगत आहे की राहणीमान, बोलणं, चालणं, व्यवस्थतपणे पाहिजे, आपले कपडे चांगले ठेवावे, हे तुम्ही चांगलेच सांगत आहे परंतु एकदा मुलांना जर तुम्ही म्हणाले की मुलींचा आदर करा, मुलींना मदत करा, तुम्ही का मुलांना विचारत नाही की एवढ्या रात्रीचा कुठे चालला? जर मुलं सुधारली तर मुलींना देखील स्वातंत्र्य नक्कीच प्राप्त होईल !
मुलींना आपण दबावांखाली ठेवतो त्याचे कारण तर मुलेच आहे, आम्ही मुली रात्री बाहेर पडत नाही याचे कारण तर मुलेच आहे ना? जर मुलींची छेड काढणारा मुलगा रात्री बाहेर फिरत नसेल तर मुली रात्री बाहेर यायला का बरे घाबरतील? या मुलींची तर एकच इच्छा असते ना ! स्वातंत्र्य आम्हालाही मिळायला पाहिजे! स्वातंत्र्य म्हणजे काय ? हे समजणे हा तर मुलींचा हक्क आहे, या समाजात रात्री बाहेर यायला न घाबरता समाजात वर मान करून जगण्याची तिलाही मुभा असावी तीही एक मुलगी आहे, एखादा मुलगा बघत असेल तर न घाबरता त्याला बोलण्याची आम्हा मुलींमध्ये ताकद नाही असे नाही पण या दबावाखाली येऊन सर्व ताकद देखील दाबली गेली आहे, या दबावातून सुटून आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त करायचे आहे ते स्वातंत्र्य कधी आम्हाला मिळेल काय?
– सानिका विष्णू वाघ
इयत्ता – नववी,वाजे विद्यालय, सिन्नर.