शासनाची प्रत्येक योजना गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – खासदार डॉ. अनिल बोंडे
- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा अमरावती येथे वचनपूर्ती सोहळा थाटात संपन्न
- जिल्ह्यात ३ लक्ष ९५ हजार पात्र महिलांचे अर्ज मंजूर
- महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आणि समाधान
गौरव प्रकाशन अमरावती, (प्रतिनिधी : महिलांना आत्मनिर्भय व स्वावलंबी बनविण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्य शासनाने सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्यातील १ कोटी ४७ लाख बहिणींना मुख्यमंत्री महोदयांच्या रुपाने त्यांचा ‘भाऊराया’ भेटला आहे. शासनाची प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. ज्या पात्र बहिणींचा अर्ज अद्याप अर्ज भरायचा राहिलेला आहे, त्या बहिणींना अन्य महिलांनी सहकार्य करण्याचे आवाहन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे केले .
नियोजन भवन येथे आज ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या राज्यस्तरीय शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे या योजनेचा वचनपूर्ती सोहळा थाटात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रवी राणा, आमदार प्रतापदादा अडसड, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा योजनेचे नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
खासदार डॉ. बोंडे म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासन राबवित आहे. अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ४ लक्ष लाभार्थ्यांपैकी ३ लक्ष ९५ हजार लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत . उर्वरित ५ हजार अर्जावर येत्या दोन दिवसात कार्यवाही होईल. नवीन अर्जाची नोंदणी सुरू आहे. बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा झाला आहे. उर्वरित पात्र महिलांच्या खात्यात लवकरच निधी जमा होईल. पात्र महिलांचे संयुक्त खाते असल्यासही निधी जमा होईल. ज्या महिलांचे खाते आधार लिंक नाही, त्यांनी तात्काळ आधार लिंक करून घ्यावे. जेणेकरून त्यांचा निधी लवकरात लवकर खात्यावर जमा होईल. ज्या पात्र महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरायला विलंब झाला त्यांनाही ही योजना लागू झाली तेव्हापासून या योजनेचा लाभ मिळेल.
खासदार डॉ. बोंडे पुढे म्हणाले की, मुलींच्या शिक्षणावर विशेष भर द्या. राज्य शासन ‘मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना’ या वर्षीपासून राबवित आहे. या योजनेंतर्गत मेडीकल, इंजिनिअरींगसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क रक्कमेच्या ५० टक्के ऐवजी १०० टक्के शुल्क माफीचा लाभ मंजूर करण्यात येत आहे. यासाठी मुलींच्या शिक्षणावर विशेष भर द्या. तसेच मुलींसाठी अग्निवीर योजना सुरू असून याचा लाभ मुलींनी घ्यावा. याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये जेष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची आणि दर्शनाची संधी देण्यात येत आहे. या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ घेण्याच्या आवाहन त्यांनी यावेळी केले .