मानवी जीवनाचा अर्थ सांगणारी कलाकृती – ‘बाकी काही नाही’
पुणे जिल्ह्यातील शिवणे येथील कवी, गझलकार किरण वेताळ यांचा नुकताच प्रकाशित झालेला “बाकी काही नाही” हा वृत्तबद्ध कवितांचा संग्रह वाचनात आला. अतिशय सुंदर असे मुखपृष्ठ असलेल्या या कलाकृतीकडे पाहून मनात विचारांची गर्दी केली.. किती आणि कोणते संदर्भ या मुखपृष्ठातून शोधावे असे झाले. मुखपृष्ठावर फार काही अर्थ लागतील असे चित्र नाही, पण बारकाईने पाहिले तर मानवी जीवनाचा अर्थ यातून मला गवसला आहे. या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर विविध रंगाचा वर्तुळाकार चिमणी पक्षाचा खोपा दाखवला आहे, या खोप्यात कमळाच्या आकाराचे फुल असून त्यात चिमणी पक्षाचे लहान पिल्लू दाखवले आहे. खोप्याच्या खाली “बाकी काही नाही” हे कलाकृतीचे शीर्षक आहे आणि त्याच्याखाली एक विविध रंगाचा पक्षी उडतांना दाखवला आहे. इतकेच संदर्भ या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर आलेले आहेत. यातून मानवी जीवनाचा अर्थ विषद केला आहे, आपण या मुखपृष्ठातून कवी मनाचा या सृष्टीशी वास्तविक जीवनाशी कसा संबंध येतो ते पाहू.
विधात्याने ही सृष्टी, हा निसर्ग तयार केलेला आहे, एखाद्या चित्रकाराने पांढऱ्याशुभ्र कागदावर विविध रंगाने एखादे रंगीत चित्र काढावे तसे विविध रंगाची उधळण करून या सृष्टीत रंग भरला आहे. या सृष्टीचा उपभोग घेताना जेवढा अधिकार मानवाला आहे तेव्हढाच पशुपक्षांना देखील आहे. या भूतलावरील सर्व प्राणीमात्रांना या निसर्गाचा उपभोग घेता येईल अशी व्यवस्था विधात्याने करून ठेवली आहे. म्हणूनच मुखपृष्ठावर दाखवलेला विविध रंगी खोपा म्हणजेच ही सृष्टी आहे असा अर्थ मला जाणवला, मानवी जीवनात अन्न, वस्र आणि निवारा या तीन मुलभूत गरजा मानल्या गेल्या आहेत. ज्याने चोच बनवली तो पोटाची भूक भागेल इतके सुखाचे चार दाणे देतोच, आपल्याला फक्त अंग झाकायला कपडे आणि दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी जमिनीला पाठ लावून सुखाची झोप घेण्यासाठी या सृष्टीतलावर छोटासा निवारा करावा लागतो बस इतकंच आयुष्यात “बाकी काही नाही”. या अर्थाने हा विविध रंगी खोपा दाखवला आहे.
“बाकी काही नाही” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर कमळाच्या आकाराचे फुल असून त्यात चिमणी पक्षाचे लहान पिल्लू दाखवले आहे याचा अर्थ असा आहे की, आपल्या परिवारासाठी तयार केलेला खोपा त्या खोप्यात आपला परिवार सुखात रहावा या सुखाचे प्रतिक म्हणून कमळाचे फुल दाखवले आहे. कमळाच्या फुलाला एक वैश्विक अर्थ आहे. बऱ्याचदा कमळाच्या फुलात पुराणातील देवदेवता बसलेले अथवा उभे असलेले चित्र आपणास बघायला मिळतात, आपल्या घरात देखील तो वैश्विकपणा, तो स्वर्गीय सुखाचा आनंद मिळावा, आपले घर कमळफुलासारखे विधात्याचे निवासस्थान असावे, बस “बाकी काही नाही” या अर्थाने या मुखपृष्ठावर कमळाच्या आकाराचे फुल असून त्यात चिमणी पक्षाचे लहान पिल्लू दाखवले आहे.
मानव स्वतःच्या परिवारासाठी प्रचंड कष्ट करून माया जमवत असतो, जीवनात स्वतःचे घर असावे, आपला परिवार या घरात सुखाने राहील यासाठी आजन्म धडपड करीत असतो. या धडपडीतून जो आनंद मिळेल तो आनंद इतरांना देता घेता आला पाहिजे. अनेकदा या धडपडीत स्वतःसाठी जगणे राहून जाते. सतत अन्नाच्या शोधात माणसाला भटकंती करावी लागते. कालचा दिवस सुखात गेला तसा आजचा दिवस आनंदात जावा म्हणून टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी पायपीट चालू असते. दिवसभर कष्ट करून परिवाराच्या मुखात सुखाचे दोन घास मिळावे म्हणून माणूस दूरवर अन्नाच्या शोधात वणवण भटकत असतो आणि संध्याकाळी आपल्या परिवारासाठी अन्नाची सोय करून येत असतो याचे प्रतिक म्हणून या मुखपृष्ठावर एक पक्षी आपल्या खोप्याकडे जातांना दाखवला आहे.
“बाकी काही नाही” या कलाकृतीच्या मुखापृष्ठाकडे पाहिले की वेगळाच अनुभव येतो. सृष्टीच्या मोहमायाच्या चक्रात एक सामान्य व्यक्ती भौतिक सुखाच्या हव्यासापोटी गुरफटून जातो, त्याला बाहेर पडता येत नाही. ज्याप्रमाणे भुंगा कमळाच्या फुलात मकरंद चाखण्यासाठी जातो पण नाजूक पाकळ्या त्याला कैद करून घेतात, कठीणातील कठीण लाकूड पोखरून काढणारा भुंगा देखील कमळाच्या नाजूक पाकळ्यात मोहाने अडकून बसतो त्याचप्रमाणे मी मी म्हणणारा सामान्य माणूस मोह, माया, धन, दौलत, स्वार्थाच्या जीवनचक्रात असा अडकून जातो की, त्याला यातून बाहेर पडताच येत नाही आणि मग मदतीची अपेक्षा करीत असतो. अशाच एका सामान्य माणसाचे प्रतिक म्हणून या वलयांकित मोहमायाच्या चक्रात पक्षी अडकून बसला असल्याचे दाखवले आहे बाकी काही नाही असे वाटते..
जग स्वार्थाने बरबटले आहे, समाजात नात्यांना कमी नाही, सगे सोयरे , नातलग हे फक्त आणि फक्त स्वार्थासाठी आपल्याला गोड गोड बोलून जवळ करतात आणि स्वार्थ साधून घेतात. अशा संधीसाधू लोकांपासून सावध रहावे. आपल्याला जाळ्यात ओढून कुठल्यातरी संकटात टाकतील आणि दुरून मजा बघतील. भोळ्या लोकांना धूर्त लोकं अडचणीत टाकत असतात , कदाचित अशाही अर्थाने मुखपृष्ठावरील वलयांकित जाळ्यात पक्षी अडकलेला दाखवला असेल “बाकी काही नाही” असे मला वाटते आणि म्हणूच गझलकार किरण वेताळ आपल्या शीर्षक गझलेत अशा भोळ्या लोकांना उद्देशून म्हणतात की –
“सगे सोयरे लोक आपले समजू नकोस भोळे, गळा कापतिल ते केसाने “बाकी काही नाही”
गझलकार किरण वेताळ यांच्या “बाकी काही नाही” या काव्यसंग्रहात विविध गणवृत्त, मात्रावृत्त कविता, छंद, गझलियत, गझलेचे तंत्र सर्व बाबी काळजीपूर्वक सांभाळून कविता आणि गझल अशा एकूण सत्त्यान्नव रचनांचा समावेश केला आहे. यातील नेते, कार्यकर्ता, पोटापुरते, स्वातंत्र्य, या रचना राजकारणी आणि राजकारणाचा समाचार घेताना दिसतात तर “ऐक माणसा, मैत्री, मानवा आसक्त, थांबला तो संपला, तुला जन्म प्यारा, या रचना मानव समाजाला जागृत करण्यासाठी एक वेगळा संदेश देतात. मन तुझ्यात गुंतले, तुझ्या इश्काचा भलताच तोरा, देहात चांदणे फुलते, जगणे तुझ्याचसाठी ,भेट, भान तू हरपूनी, ऋतू यौवनाचा, अशा अनेक रचनांमधून प्रेमाविष्कार प्रकट केला आहे.
“बाकी काही नाही” या कलाकृतीचे नुकतेच २७ जुलै २०२४ रोजी पुण्याच्या एस.एम जोशी सभागृहात पुण्याच्या सकाळ प्रकाशन संस्थेने प्रा.डॉ अविनाश सांगोलेकर यांच्या शुभहस्ते प्रकाशन केले आहे. या कलाकृतीच्या मुखपृष्ठाला सारद मजकूर, पुणे यांनी आपल्या कुंचल्याने अतिशय कल्पकतेने सजवले आहे. या संग्रहाचे वाचक स्वागत करतील आणि या कलाकृतीला साहित्यिक मूल्य देवून संग्रही ठेवतील अशा सुंदर कलाकृतीची भर साहित्यात पडली आहे. कवी गझलकार किरण वेताळ यांना पुढील दर्जेदार साहित्य कलाकृती निर्मितीसाठी खूप खूप शुभेच्छा. तूर्तास इतकेच …
मुखपृष्ठ परीक्षण :
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
परीक्षण
कलाकृती – “बाकी काही नाही”
साहित्य प्रकार – कवितासंग्रह
कवी – किरण वेताळ, पुणे
कवीचा संपर्क – ९०११० २०६२६
मुखपृष्ठचित्रकार – सारद मजकूर, पुणे
प्रकाशक- सकाळ प्रकाशन