तुझा विजय झाला
विनेश…
निराश होण्याचं कारण नाही
तू जिंकली आहेस मनं
अपवाद सोडले तर
असंख्य भारत वासियांची
तू जिंकली आहेस मनं
तुझ्यासारख्या परिस्थितीशी
झुंजणाऱ्या असंख्य आया बहिणींची
तू शिकवलं आहेस
झुंजार वृत्ती आणि चिकाटी
तू शिकवलं आहेस
बलशाली शरीर कसं कमवायचं
तू शिकवलं आहेस
अन्यायाला वाचा फोडणं
तू शिकवलं आहेस
अन्यायाच्या विरोधात लढणं
विनेश…
तू शिकवलं आहेस
बलवत्तर वृत्ती आणि प्रवृत्तीला
धाडस आणि चिकाटीने
निकराने पराभूत करणं
तू धूळ चारली आहेस
तुझ्यासारख्या असंख्य जणींवर
पडणाऱ्या वखवखलेल्या नजरांना
तू धूळ चारली आहेस
वासनेच्या आहारी जाऊन
मस्तवालपणा करणाऱ्या स्पर्शांना
म्हणून म्हणतो विनेश…
असू दे काहीही
छळ कपट तुला नमवण्यात
पण तू अजिबात
तुझ्या मनावर घेऊ नकोस
हे जीवन आहे
आणि जीवनात असे
असंख्य प्रसंग आले असतील
वर्तमानात समोर आहे
आणि भविष्यात सुध्दा येतील
त्यामुळे नाउमेद होण्याची गरज नाही
नाउमेद त्यांनी व्हावं
ज्यांनी तुला कमी लेखलं
खजिल ते होतील
ज्यांनी तुला खजिल
करण्याचा आटोकाट प्रयत्न केला
असंख्य देश वासियांसाठी
तू तिच विनेश आहे
जी आधी होती
आधी सुध्दा तू गळ्यातील ताईत होती
आणि आजही आहेच
त्यामुळे अख्खा भारत देश
तुझ्या सोबत होता आहे आणि
भविष्यात राहिल सुध्दा
म्हणून आज जरी
तू पायउतार झालीस
तरी भविष्य तुझं उज्ज्वल आहे
हे कदापिही विसरू नकोस
एका सुवर्ण पदकापासून
दूर राहिली म्हणून काय झालं
चुका सुधारून आणखी
नव्या जोमाने कामाला लाग
आणि तुला कमजोर समजणाऱ्यांच्या
नाकावर टिच्चून खेचून आणं
गमावलेलं गोल्ड मेडल
कारण तुला फार मोठा
वारसा मिळाला आहे
माॅ जिजाऊंचा
झुंजार वृत्तीने लढणाऱ्या
ताराबाईंचा
तुझ्या हाती लेखणी
दिली त्या सावित्री माईचा
म्हणून शेवटच्या क्षणी जरी
तुझा विजय दूर गेला असेल
तरी तुझ्या हिमतीवर
तुझ्या ताकदीवर
तुझ्या करारीपणावर
तुझ्या जिद्द आणि चिकाटीवर
मनापासून प्रेम करणारा
तुझा चाहतावर्ग
तुझा विजय झाला
हेच समजतो
म्हणून तुझा विजय झाला
तुझा विजय झाला
तुझा विजय झाला
– पी के पवार
सोनाळा बुलढाणा
९४२१४९०७३१