अंध विद्यालयाच्या वर्धापन दिनी शहर पोलीस उपायुक्त गणेशजी शिंदे यांचा सत्कार
अंध विद्यालयाच्या वर्धापन दिनी शहर पोलीस उपायुक्त गणेशजी शिंदे यांचा सत्कार
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : स्थानिक डॉ.नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाचा ५८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत संस्थेत करण्यात आले होते. शहरातील डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ इंगोले हे डॉ. गोविंद कासट मित्रमंडळीच्या सहकार्याने विद्यालयात अनेकविध समाजसेवी व अभ्यासोपयोगी उपक्रम संस्थेत विद्यार्थ्यांकरिता राबवित असतात. वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमात विद्यालयातील जवळपास दीडशे अंध विद्यार्थ्यांकरिता कराओके गीत गायन मनोरंजनाचा कार्यक्रम अंध विद्यालय, सुप्रसिद्ध रघुवीर व संगीत साधना कराओके क्लबचे संचालक चंद्रकांत पोपट व डॉ. गोविंद कासट मित्रमंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
आपल्या अत्यंत व्यस्ततेतून शहर पोलीस उपायुक्त श्री गणेशजी शिंदे यांनीही धावती भेट या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला दिली होती. यावेळी अंध विद्यालय, संगीत साधना व मित्रमंडळीच्या वतीने श्री गणेशजी शिंदे यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन यथोचित सन्मान व सत्कार यावेळी करण्यात आला.
आपल्या मनोगतातून श्री शिंदे यांनी संगीत साधना कराओके क्लबचे मनःपूर्वक कौतुक केले. अंध विद्यार्थ्यांच्या मनोरंजनाकरिता तेही संस्थेच्या वर्धापन दिनी असा कार्यक्रम घेणे, त्या कार्यक्रमात समाजातील अनेक व्यक्तींचा सहभाग असणे, स्वतः विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग यांना संधी उपलब्ध करून देणे, संगीत साधनाच्याही कलावंतांनी अशा या सामाजिक कार्यक्रमाला एवढा वेळ देणे खरोखरच या सर्व गोष्टी अतिशय कौतुकास्पद व स्तुत्य आहेत, मी अशा अनेक कार्यक्रमांना मनापासून हजेरी लावतो, तो मी माझ्या पदाचा, कार्याचा, खाकीचा सन्मान समजतो. अशा या प्रेरणादायी सामाजिक कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले व येथील निखळ मनोरंजनाचा आनंद घेता आला. याचे मला मनापासून समाधान वाटले. आमच्या पोलीस खात्यातीलही अनेक मंडळी आपली धावपळीची नोकरी करून त्यांचा गायनाचा छंद जोपासतात. ही खरोखरच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. मी गात नाही, परंतु गाणे ऐकायला मला नक्कीच आवडते. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कासट, रघुवीर चे चंद्रकांत पोपट, प्राचार्य नवनाथ इंगोले, दिनेश मोदी ( अमेरिका) सन्माननीय गणेशजी शिंदे, प्रवीणजी मालपाणी, धनंजय नाकील, कैलास तिवारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्व. दौलतभाई देसाई मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक जीवन गोरे यांनी केले.
कराओके गीत गायनाच्या मनोरंजनाच्या या कार्यक्रमात कलाकारांनी एक से बढकर एक गीतांची प्रस्तुती देऊन उपस्थित विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. विद्यार्थ्यांना गाणे म्हणणारा दिसत नसला तरी, गाण्याचा ठेका व लय संगीत ऐकून विद्यार्थी आपला आनंद यावेळी व्यक्त करत होते.
कार्यक्रमात उषाकिरण विजेकर, सीमा थुले, कैलास तिवारी, चंद्रकांत पोपट, कोमल जसापारा, दीपक धानोरकर, दिनेशजी मोदी, मनीष सहारे, जीवन गोरे, वैशाली गोरे, अक्षरा खोब्रागडे, प्रवीण अवसरमोल, पंकज मुदगल, अजय भोजने, जसप्रीत कौर,बबलू ठाकूर, राधेश्याम चंदेल, दिलीप सदार, रंजीत गुढेकर, राजेश किल्लेकर, नवनाथ इंगोले, नरेंद्र तायडे यांनी आपल्या गीतांची प्रस्तुती विद्यार्थ्यांसमक्ष दिली,
शेवटी चलते चलते मेरे ये गीत.. या सामूहिक गीताने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. उपस्थित सर्वांना रघुवीर ची मिठाईवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.