स्त्रीच्या वाट्याला आलेल्या दुःख, वेदनाचे प्रतिक – बाभूळफुलं
नांदगांव जि नाशिक येथील प्रथितयश कवयित्री प्रतिभा खैरनार यांचा बाभूळफुलं हा कथासंग्रह नुकताच वाचनात आला. स्त्रीच्या वाट्याला आलेले दुःख, वेदना, सल आयुष्यभर मनाला सलत असते, बाभूळफुलाने स्वतःच्या आयुष्याचा पालापाचोळा करून मधमाशीला पिवळा देह मकरंद चाखण्यासाठी अर्पण करावा ही त्यागी वृत्ती स्री मनाने जपली आहे. दुःखाला ह्रदयाशी कवटाळून आयुष्यात आनंदाची उधळण करून स्री जीवन जगत असते. या कलाकृतीच्या मुखपृष्ठाला पाहताच मनात विचारांची कालवाकालव सुरु झाली. अतिशय गर्भित अर्थाने आणि स्री जीवनाच्या वेदनांचे प्रतिक असलेले मुखपृष्ठ कल्पकतेने या कलाकृतीवर घेतले आहे.
बाभूळफुलं या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर एका स्रीचा चेहरा दाखवला आहे, नाकाच्या शेंड्यापासून पासून वर कपाळापर्यंत बाभळीच्या काट्यांची फांदी दाखवली आहे, या फांदीला कोवळी पाने आणि लहानमोठे बारा पिवळी फुले आणि चार काटे आहेत, कपाळावर कुंकवाच्या जागी पिवळे ठसठशीत गोल फुल ठेवले आहे. स्रीचा एक डोळा पूर्ण झाकला असून एका डोळ्यात काळ्या बुबुळात अनामिक भीती दाखवली आहे. अशा प्रकारचे मुखपृष्ठ या कलाकृतीवर साकारले आहे. या मुखपृष्ठातून अतिशय गर्भित अर्थ मला जाणवला आहे. आपण या मुखपृष्ठावरील वरील संदर्भांचा विचार करणार आहोत.
बाभूळफुलं या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर एका स्रीचा चेहरा दाखवला आहे याचा अर्थ असा की, बाभूळफुलं ही कलाकृती स्री प्रधान आहे, लेखिका एक स्री असल्याने त्यांनी स्रीच्या वेदना, दुःख, मनाची सल यातून मांडली आहे. या कथासंग्रहातील सर्व कथा स्रीपात्राच्या भोवती घुटमळतांना दिसून येतात. वरवर जरी सुखाची पिवळी फुले दिसत असली तरी आतून परिस्थितीचे, संकटांचे, दुःखाचे काटे टोचत असावेत आणि या काट्यांत वावरणा-या स्रीचा चेहरा मुखपृष्ठावर दाखवला असावा. असे मला वाटते.
बाभूळफुलं या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील स्रीच्या नाकाच्या शेंड्यापासून वर कपाळापर्यंत बाभळीच्या काट्यांची फांदी दाखवली आहे, या फांदीला कोवळी पाने आणि लहानमोठे बारा पिवळी फुले आणि चार काटे आहेत तर कपाळावर कुंकवाच्या जागी पिवळे ठसठशीत गोल फुल ठेवले आहे. अतिशय गर्भितार्थाने या संदर्भाचा उलगडा झाला आहे असे मला वाटते. लहानपणी मुलगी आईबापाच्या लाडात वाढलेली असते, तिला कोवळ्या हिरव्या पालवी सारखे जपलेले असते, आईबापाला माहिती असते की, हा हिरवपणा कधी चुरगळल्या जाईल ते सांगता येत नाही म्हणून तिला काही काटेरी बंधने घालून दिलेली असतात ही कोवळी पाने म्हणजेच मुलीचे बालपण आहे तर काटे हे तिचे बंधन आहे. “तारूण्य हे धगधगत्या चुलीवर ठेवलेल्या दुधासारखं असतं, केव्हा ऊतू जाईल सांगता येत नाही, म्हणून जपावं लागतं, ध्यान ठेवावं लागतं” सुलभाला हवेली बाहेर जाण्यासाठी मनाई केली तेव्हा तीला आईने सांगितलेले ऐकूण सुलभाला स्री असल्याचे विलक्षण दुःख होते हे “बकुळ” कथेतून लेखिकेने मांडले आहे. जसेजसे वय वाढत जाईल तसे काटे वाढत जातात, कुठपर्यंत तर जोवर तिला हळद लागत नाही तोवर… ही हळद म्हणजेच मुखपृष्ठावरील स्रीच्या कपाळावर कुंकवाच्या जागी ठेवलेला पिवळा ठसठशीत गोल फुलाचा ठिपका. एकदा हळद लागली की, मुलगी आईबापाचे घर सोडून परक्याच्या घरचे धन होते, नशीबावर काटेरी फांदी घेऊन पिवळ्या फुलांची उधळण करून भंडारा उधळावा तसे स्री तिच्या आयुष्याचा भंडारा उधळत असते. पिवळे बाभूळ फुल स्वतःच्या देहाचा चोळामोळा करून मधमाशीला मकरंद चाखण्यासाठी आपला देह अर्पण करत असते तसे स्री ही अंगाला हळद लागली की सासरी स्वतःच्या देहाची पर्वा न करता सासरच्या माणसांसाठी आनंदाची उधळण करून मनातल्या इच्छांचा त्याग करीत असते हा त्यागाचा गर्भित अर्थ मला यातून जाणवला आहे.
बाभूळ फुलं या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील स्रीच्या कपाळावर जी बाभळीच्या काट्यांची फांदी दाखवली आहे या काटेरी फांदीला लहानमोठे बारा पिवळी फुले आणि चार काटे आहेत, यालाही एक गर्भित अर्थ आहे. स्रीच्या वाट्याला आलेल्या वेदना या एका दिवसाच्या नाहीत तर बाराही महिने तिच्या नशिबी काही ना काही वेदना आहेतच. पिवळी हळद धुवून अंगावर हिरव्या रंगाचे वस्रालंकार स्रीला शोभून दिसावे तसे फुले हिरवी होत जातांना मासिकधर्माचे चार दिवस देखील काट्यासारखे वाटावे म्हणून मुखपृष्ठावर चार काटे आणि बारा लहानमोठी फुले दाखवली असावीत…. ही फुले शेवटी शेवटी लहान झालेली दाखवली याचा अर्थ स्रीच्या नशिबातील सौभाग्याचे लेणं कुंकू जावून ती स्वयंसिद्धा (विधवा) होते अशावेळी समाजात वावरतांना, आयुष्य जगतांना डोळ्यात संकटांचा काळाकुट्ट अंधार होतो म्हणूनच मुखपृष्ठावरील स्रीच्या डोळ्यात अंधार दाखवला असावा, तिला भविष्याची चिंता लागते आणि या चिंतेतूनच तीला जगण्याची अनामिक भीती वाटू लागते आणि म्हणूनच मुखपृष्ठावरील स्रीच्या डोळ्यात निरखून पाहिले तर एक अनामिक भीती दिसते ती भीती म्हणजेच तिला असलेली चिता असावी, असा अर्थ मला यातून जाणवला आहे. म्हणूनच “सौभाग्यालंकार फक्त देहालाच हवे होते, त्यांची मनाशी सांगड घातली की जीवघेणा त्रास… विधवा शब्दाचा अर्थ फक्त नव-याशीच नसतो. तो जिव्हाळ्यानं जपलेल्या अलंकाराशीही असतोच. लग्न एका व्यक्तीसोबत नाही तर या अलंकारा सोबतही होत.” “नशीबाला दोष देत बसून रहायचे नाही तर आलेल्या काट्यांसारख्या संकटांना हसतमुखाने सामोरे जायचे हा साधा नियम या संग्रहातील “रांडव” या कथेतून लेखिकेने दिला आहे.
बाभूळ फुलं कथासंग्रहातील सर्व कथा स्री वेदनांनी भरलेला जलकुंभ आहे. कौशी, रांडव, रिकामा हंडा, कळा, मातृत्व या कथा स्रीच्या वास्तव जीवनातील दुःख, वेदना, कष्ट भरलेल्या कथा आहेत. वास्तविक जीवनात स्त्रीला येणारे अनुभव एकुण १५ विविध कथांच्या माध्यमातून लेखिकेने मांडले आहेत. बाभूळ फुल या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी आपल्या कल्पकतेने रंगविले असून पुण्याचे परिस पब्लिकेशन्स ॲण्ड मिडीया या संस्थेने कलाकृतीला प्रकाशित केले आहे. प्रसिद्ध कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी पाठराखण करून काव्यसंग्रहाला उभारी दिली असून वाचकांनी कलाकृतीचे स्वागत तर केलेच आहे आणि यातूनच कलाकृतीला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. लेखिका प्रतिभा खैरनार यांना पुढील प्रभावी, प्रवाही लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा….
मुखपृष्ठ परीक्षण :
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृती – बाभूळ फुलं
साहित्य प्रकार – कथासंग्रह
लेखिका – प्रतिभा खैरनार, नांदगांव
लेखिकेचा संपर्क – ७२१९५ ५१६१४
मुखपृष्ठचित्रकार – अरविंद शेलार, कोळपेवाडी
प्रकाशक- परिस पब्लिकेशन्स ॲण्ड मिडीया, पुणे