जलनायक – नाना ते गृहमंत्री शंकररावजी चव्हाण साहेब
शंकरराव चव्हाणानी महाराष्ट्राचा दुष्काळ, सिंचनाचा अभाव, पाणी प्रश्न ओळखला. त्यावर अभ्यास केला. जर सिंचन सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही तर महाराष्ट्राचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. हे जाणून पोट तिडकीने कार्य केले. छोट्या छोट्या कारणास्तव अनेक धरणाना अडचणी होत्या, त्या दूर करून या धरणाचे बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतल्यानेच आज महाराष्ट्रात जे काही पाणी दिसते ते नानामुळेच.
महाराष्ट्र राज्याच्या हिताचा निर्णय घेताना दूरदृष्टी आणि विचार याचा समन्वय साधणारे हे महाराष्ट्रातील एक मोठे नेते होते, याची प्रचिती अनेक धरणांची मंजूरी देताना दिसून येते. नकाशे व सविस्तर सर्व्हे रिपोर्ट स्वत: तपासून बारीक सारीक चुका सुधारायला लावून कार्य करून घेत असल्यानेच त्यांच्या निर्णयात विरोधकाना सुध्दा काही मिळत नव्हते. अधिकाऱ्यांना पाठबळ देवून प्रकल्प उभे केले. अधिकारी व लोकनेते यांना नेहमीच सोबत घेवून काम करण्याची पध्दत नानाची होती. दूरदृष्टीचा, त्याच्या धरण निर्मितीचा आज महाराष्ट्राच्या जनतेला जो फायदा होत आहे त्यासाठी त्यांना भगिरथ म्हटल्या गेले.
आदरणीय नानाचे कारकिर्दीत महाराष्ट्रात ३२ मोठी धरणे नियोजित कौशल्याने निर्माण झालीत, आज ती महाराष्ट्राची शान तर आहेच, पण अनेकाची ती धरणे तहान भागवत आहे. शेतक-यांना सिंचनाकरीता व उद्योगासाठी पाणी पुरवीत आहे. या धरणातून आज जी वीज निर्माण होत आहे त्यामुळे विजेची टंचाई कमी होवून उद्योग-धंद्याच्या कामांना गती मिळाली. उद्योग धंद्यामुळे परिसरातील तरूणाना, गरजवंताच्या हाताला काम मिळाले. महाराष्ट्राचा विकास गतीमान झाला तो शंकरराव चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीकोनातूनच. एक एक धरण आज डौलाने उभे असून महाराष्ट्राचे वैभव वाढवित आहे.
राज्याच्या जलसिंचनाची घडी बसविण्यासाठी शंकररावची इच्छा शक्ती आणि कार्य शक्ती एवढी अफाट होती की त्यांनी जायकवाडी प्रकल्प, औरंगाबाद. विष्णुपुरी प्रकल्प, नांदेड. पैनगंगा प्रकल्प, इसापूर प्रकल्प, यवतमाळ. येलदरी प्रकल्प, परभणी. पूर्णा प्रकल्प, हिंगोली. सिद्धेश्वर प्रकल्प, हिंगोली. माजलगाव प्रकल्प, बीड. मांजरा प्रकल्प, उस्मानाबाद-बीड गोसीखुर्द प्रकल्प, भंडारा. उजनी भीमा प्रकल्प, सोलापूर. वारणा प्रकल्प, कोल्हापूर. दूधगंगा प्रकल्प, कोल्हापूर. कुकडी प्रकल्प, पुणे. उर्ध्व वर्धा प्रकल्प, अमरावती. निम्न वर्धा प्रकल्प वर्धा. मनार प्रकल्प, नांदेड. भातसा प्रकल्प, ठाणे. सूर्या प्रकल्प, ठाणे. निम्न दुधना प्रकल्प, परभणी. तेरणा प्रकल्प उस्मानाबाद. पूस प्रकल्प. यवतमाळ. काटेपूर्णा प्रकल्प, अकोला. नळगंगा प्रकल्प, बुलढाणा. तोतलाडोह पेंच प्रकल्प नागपूर. इटियाडोह प्रकल्प, भंडारा. पवना प्रकल्प, पुणे. घोड प्रकल्प पुणे, तिल्लारी प्रकल्प, कोल्हापूर/सिंधुदुर्ग. कृष्णा-कोयना प्रकल्प, सातारा. चासकमान प्रकल्प, पुणे. गोदावरी एक्सप्रेस कालवा नाशिक-औरंगाबाद. लेंडी प्रकल्प, नांदेड. बाभळी बंधारा, नांदेड अश्या अनेक मोठ्या धरणांची उभारणी केली. आज या धरणाची जल क्षमता पाहता व याच धरणातून महाराष्ट्रातील जनतेची तहान भागवली जाते, सोबतच लाखो हेक्टर सिंचनामुळे बळीराजा सुखावला. उद्योग धंदे आलेत, बेरोजगारी कमी झाली, यामुळे निश्चितच त्यांच्या कार्याची उंची लक्षात येते.
जलक्षेत्रात समन्यायी पाणीवाटपाचे धोरण उराशी बाळगून नेहमीच शाश्वत विकासाची कास धरून कार्य करण्यास पाटबंधारे विभाग त्यांनी एक दिशा दिली. साहेबानी समतोल विकासाच्या हेतूने दुष्काळग्रस्त भागात लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणून हरित क्रांतीला चालना दिली. महाराष्ट्रातील जलसिंचन निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे, म्हणूनच त्यांना महाराष्ट्राच्या जलक्रांतीचे जनक असेही संबोधले गेले तर ‘आधुनिक भगीरथ’ म्हणून देखील आदराने त्यांना म्हणटल्या गेले.
सिंचना अभावी होत असलेल्या आत्महत्या, शेतकरी बांधवांचे होत असलेले हाल थांबवायचे असेल, त्यांना समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त व्हावे असे वाटत असेल तर सिंचनाशिवाय दुसरा उपाय नाही म्हणून नेहमीच त्यांनी याकडे स्वत: लक्ष घालून शेतक-यांना प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी जल चळवळ रुजवली.
पाण्याशिवाय विकास नाही हा ध्यास असलेले लोकनेते स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी जल क्षेत्रात घेतलेल्या अथक व अभ्यासपूर्ण परिश्रमांमुळे त्यांच्या कार्य कालावधीत महाराष्ट्र राज्यात जलक्षेत्रात भरीव कामगिरी केली, हे सर्वश्रूत आहे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या घोषणेनुसार जलक्षेत्रासाठी कार्य केले. आजही पाणी अडवा – पाणी जिरवा यानुसार कार्य होतांना दिसत आहे.
शुद्ध चारित्र्य, सचोटी, वक्तशीरपणा, शिस्त आणि घेतलेल्या कामात पूर्ण झोकून देऊन काम करणे हे नानासाहेबाचे गुणविशेष होते. या त्यांच्या सवयीमुळे हेडमास्तर म्हणून साहेबाचा उल्लेख आदरपूर्वक होत असे. हेडमास्तर जर चांगला असेल तर मास्तर चांगले असतील आणि विद्यार्थी पण चांगले घडतील. आज या उलट परीस्थिती आहे. हेडमास्तर, चव्हाण साहेबांन सारखा हेडमास्तर पाहायला मिळणे दुरापास्त झाले आहे. मास्तराचे बाबतीत तर विचारूच नका.
राजकारणात सलग ५० वर्षे काम केले. अनेक वर्ष सत्तेत राहिलेत पण ना सत्तेच्या मोहात ते अडकले, ना कधी ते सत्तेसाठी लाचार झालेत. ना सत्तेच्या मागे लागले, त्यामुळेच सत्ता त्यांच्या अंगाला चिकटली नाही. मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, कपड्यावर भष्टाचाराचा चिखल लागला नाही, कि शितोडा उडविण्याची हिम्मत कोणाची झाली नाही. ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. साहेब नेहमीच मान उंचावून जगले. ताठ मानेने चालले. हा त्यांचा आदर्श प्रत्येक राजका-यांनी समोर ठेवून राजकारण केले तर भष्टाचार काय पण त्याचा भ सुध्दा भेडसावणार नाही.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री राहीलेले, देशांचे गृहमंत्रीपद भूषविलेले स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांनी राज्याची विधान परिषद आणि विधानसभा तसेच संसदेच्या राज्यसभा, लोकसभा अशा चारही सभागृहांचे सन्माननीय सदस्य म्हणून काम केले. महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा असलेले माजी मुख्यमंत्री, लोकनेते स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांची कारकीर्द अविस्मरणीय आणि स्पृहणीय अशीच आहे.
‘सत्ता ही बहुजन हितार्थ राबवावी’ हा हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी दिलेला कानमंत्र आदरणीय साहेबांनी अखेरपर्यंत व्रतासारखा सांभाळला. आज मात्र यात जल क्षेत्रात या व्रताची उणिव भासत आहे. साहेबान सारखी पारख दुस-यांना नाही असेच म्हणावे लागेल.
अपार दूरदृष्टी, शून्यातून विश्व निर्माण करण्याचे समर्थ कर्तृत्व, लोकाभिमुख कामात पूर्ण झोकून देऊन काम, उत्तम प्रशासन, निष्कलंक चारित्र्य, वैचारिक समन्वय साधण्याची वृत्ती, अजोड कर्तव्यनिष्ठा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वेधक वैशिष्टये होय. माझ्या सारख्या जलक्षेत्रात काम करणा-या अभ्यासकांना साहेबांचे व्यक्तिमत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व सदैव प्रेरणा देत आलेत. यातून गेल्या 32-33 वर्षापासून जल क्षेत्रात मी जे कार्य करीत आहे. जलजागृती करीत आहे. दररोजचा संदेश जो एक लाख लोकांना पर्यन्त पोहोचविल्या जात आहे. जल प्रबोधनासाठी जे कार्य चालू आहे, यासोबतच जनतेचा पैसा अनाठायी अनियमितता रूपी भष्ट्राचारात जावू नये म्हणून जीवावर उदार होवून त्याचे विरोधात सातत्यपूर्ण लढा देवून आज पर्यन्त मी जलसंपदातील 22-23 हजार करोड वाचविले. हे बळ आले ते नानासाहेबाच्या कार्यप्रणालीच्या पगड्यामुळेच.
विदर्भाची लाईफ लाईन म्हणून मी २०१४ ला वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाची मागणी केली होती. प. विदर्भातील जनतेच्या सिंचनासाठी, विज निर्मितीसाठी, उद्योग धंद्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी हा प्रकल्प होणे आवश्यक आहे. २०१४ ला केलेली मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस यांनी तात्काळ मान्य करून यावर अहवाल बनविण्याचे कार्य चालू असतानाच सरकार गेले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावर हा प्रकल्प करू, लवकरच प्रमा देवू असे म्हणता म्हणता ते गेलेत. आज परत देवेंद्रजी येताच मंत्रालयात बैठकांचा स्पीड पाहता, मान्यतेच्या दारात प्रकल्प उभा आहे.
यासर्व कार्यामुळे साहेबांच्या जन्मतिथीच्या पूर्व संध्येला म्हणजे १३ जुलै २०२१ ला माझा, डॉ.. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार देवून महाराष्ट्र शासनाने गौरव केला. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट तर आहेच पण पुढील कार्यासाठी मला मिळालेले हे बळ व माझ्या कार्याचा गौरव मी समजतो. अश्या या महान व्यक्तीमत्वाची आज जयंती आहे. त्याच्या जयंतीदिनी साहेबाना विनम्र अभिवादन.
डॉ. प्रवीण महाजन, जल अभ्यासक,
डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कारर्थी, महाराष्ट्र शासन.