शिक्षणमहर्षी – कै.दादा पाटील केदार
गावातील लेक गावातच शिकली पाहिजे परगावात लेकींना शिक्षणासाठी पाठवले जात नाही त्यामुळे आपल्या गावातील लेकी सातवीच्या पुढे शाळा शिकत नाही, गावातील मुलं सायकलवर व काही पायी पायी शेजारील नांदूर शिंगोटे गावात जाऊन शिकत आहे, पण मुलींच्या शिक्षणाचे काय? हा प्रश्न उभा राहिला होता दोडी बुद्रुक येथील तरुण तडफदार नेतृत्व दादा पाटील केदार यांना, आपल्या गावात हायस्कूल सुरू करायचे असे त्यांनी मनाशी ठरवले आणि जे ठरवले ते करायचेच असं हे व्यक्तिमत्व, लागलीच आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी त्यांचा हा मानस बोलून दाखवला त्याकाळी त्यांचे सहकारी म्हणून नामदेव सदाशिव नागरे, शंकर सखाराम आव्हाड, एकनाथ केदार, शंकर पुंजा केदार, जानकूशेठ शिवराम आव्हाड, आनंदा शेठ कांगणे, कुटे गुरुजी असे अजून बरेच सहकारी होते.
लेकिंच्या शिक्षणाची सल त्यांच्या मनात सलतच होती, मग ते नाशिकला भारत बुक डेपो येथे गेले तिथून अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र घेतले व धर्मादाय आयुक्त नाशिक येथे शिक्षणसंस्था सुरू करण्याचा अर्ज केला, साल होते 1980. शिक्षण संस्था सुरू व्हावी याचा पाठपुरावा करण्यासाठी दादा पाटील केदार यांनी स्वर्गीय तुकाराम दिघोळे साहेब, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, शिक्षण मंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख, महसूल मंत्री अशोक चव्हाण यांच्या भेटी घेऊन संस्थेची परवानगी मिळवून विनाअनुदानित तत्त्वावर गावात शाळेची स्थापना केली आणि संस्थेला नाव दिले ते गावात महादेव मंदिरात राहत असलेले व त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, ब्रह्मानंद स्वामी महाराज यांचे *श्री ब्रह्मानंद प्रसारक मंडळ* या संस्थेची 1980 मध्ये स्थापना केली आणि 1981 मध्ये दोडी बुद्रुक येथील सोसायटीच्या गोडवूनमध्ये आठवीचा पहिला वर्ग सुरू केला व शाळेला नाव दिले ‘श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल दोडी बुद्रुक.’
शाळेची तर स्थापना केली मात्र आता शिकवायला शिक्षक पाहिजे, शिक्षक मिळणे म्हणजे त्याकाळी जिक्रीचे काम होते, कारण बी.एस.सी. बी एड झालेले शिक्षक अनुदानित शाळेत फुल पगारावर रुजू होत होते तेव्हा लगेच नोकरी मिळत होती मग येथे या विनाअनुदानित शाळेवर काम कोण करणार? मग दादा पाटील केदार यांनी अकोला तालुक्यातील विटा या गावी सहकाऱ्यांना सोबत घेऊन स्वतःहा जाऊन स्वर्गीय वाकचौरे सरांना पटवून देऊन त्यांची प्रथम शिक्षक म्हणून नेमणूक केली त्यांच्याबरोबर अजून एका शिक्षकाची नेमणूक केली ते म्हणजे डोंगरे सर व एक शिपाई म्हणून नियुक्ती केली ते शांताराम जाधव, तेव्हा तीनशे रुपये पगार त्यांना ठरवण्यात आला मग 1981 ला आठवी, 1982 ला नववी सुरू झाली व 1983 ला दहावीचा वर्ग सुरू झाला. अशा पद्धतीने शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली.
दादा पाटील केदार यांना, गोडावून मध्ये किती दिवस शाळा भरवणार? हा प्रश्न सतावत होता, मग शाळेसाठी इमारत बांधली पाहिजे असं त्यांनी ठरविले, त्यांनी शासनाची जागा असलेल्या व त्या जागेत वाघ परिवारांचे पिढ्या न पिढ्या खळे असलेल्या जागेत शाळा बांधायची असा निर्णय त्यांनी घेतला मग त्या ठिकाणाची सर्वप्रथम खळे हलविण्यात आले, जागा खाली करण्यात आली, जागा खाली करताना एखादा अर्धा विरोध देखील झाला पण गावाच्या विकासासाठी शाळा बांधण्यासाठी त्यांनी त्याप्रसंगी कडक भूमिका घेत जागा खाली केल्या. त्यावेळचे गावचे सरपंच कारभारी पंढरीनाथ आव्हाड यांनी जागा खाली करण्याच्या कामात दादा पाटील यांना मदत केली.
ग्रामपंचायत मधून निधी मंजूर करून दोन खोल्यांसाठी अनुदान प्राप्त केले पण या दोन खोल्या बांधताना त्यांनी चाणक्य बुद्धी वापरून दोन खोल्यांच्या मध्ये एक खोलीचे अंतर ठेवून स्वतंत्र दोन खोल्या बांधल्या त्यानंतर पंचायत समितीचे अधिकारी आले व खोल्या मान्य झाल्या, आता मात्र त्यांनी दोन खोल्या स्वतंत्र का बांधल्या ते सर्वांनाच समजले ते असे की त्यातील उरलेल्या दगड वाळू याच्यातूनच दोन खोल्यांच्या मध्ये ठेवलेल्या जागेत पुढची व मागची भिंत बांधून वरती पत्र टाकले व कुठलीही सरकारी मदत नसताना तिसरी खोली त्यांनी तयार केली म्हणजेच दोन खोल्यांच्या निधीतून तीन खोल्या शाळेसाठी त्यांनी उभ्या केल्या त्यानंतर जेव्हा पंचायत समितीचे अधिकारी आले तेव्हा ते फक्त बघतच राहिले की किती हा हुशार माणूस आहे त्यांनी दादा पाटील केदार यांना शाब्बासकी दिली, आठवी नववी व दहावी तीनही वर्गासाठी शाळेच्या तीन खोल्या आता तयार झाल्या आणि शाळा गोडावून मधून शाळेच्या आवारात स्थलांतरित झाली खऱ्या अर्थाने जे शाळेचे रूप असतं ते आता शाळेला आलं होतं, झंडा ऊँचा रहे हमारा तो तो उंच तिरंगी झेंडा शाळेसमोर लावण्यात आला आणि शाळा सुरू झाली.
दादा पाटील केदार यांनी सुरुवातीच्या काळात पदर खर्चाने शिक्षकांना पगार दिले, पगार करण्यासाठी पैसे कमी पडले तर प्रसंगी स्वतःची मालमत्ता विकण्याचीही त्यांची मनाची तयारी होती, त्यानंतर लोक वर्गणीतून पगार केले, त्यांनी स्वतःचा व्यवसाय किराणा दुकान, रेशन दुकान, आडत दुकान सांभाळून हे समाजसेवेचे व्रत अंगिकारले होते, शाळेत शिक्षक व शिपाई भरती झाली पण कागदपत्र लिहायला क्लार्क पाहिजे असं त्यांना वाटू लागले मग निमगाव येथील गावात शिकलेला मुलगा म्हणून त्यांनी फकिरा सानप यांना क्लार्क या पदावर नेमले. पण थोड्या दिवसात गरिबीची परिस्थिती असल्याने घरात अडचण निर्माण झाल्याने पगार कमी असल्याने ते शाळा सोडून गेले मग त्या ठिकाणी बाळू विंचू यांची नेमणूक केली, शिक्षण चांगले मिळावे विद्यार्थ्यांना कडक शिस्त लागावी म्हणून शाळेत गावातील एकही शिक्षक घ्यायचा नाही हा अलिखित नियम त्यांनी केला व स्वतःच्या कुटुंबातील एकही व्यक्ती शाळेत नोकरीला घ्यायची नाही हाही नियम त्यांनी स्वतःसाठी बांधून घेतला.
आपण आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, गाव कसं चांगलं होईल या विचाराने त्यांनी कामाला सुरुवात केलेली होती शाळा चालवणे म्हणजे सोपं काम नाही अगदी शिकवायला सुरुवात करताना फळ्यावरील खडूपासून ते निकालापर्यंत लागणाऱ्या प्रत्येक वस्तूला पैसे लागत होते, मग आता संस्थेसाठी तर पैसा उभा करावाच लागेल त्यासाठी मग त्यांनी प्रयत्न सुरू केले. दोडीतून थेट ते मुंबईला जायचे आणि मुंबई सेंट्रल इथून हमाल व नोकरीला असणाऱ्या दोडी गावच्या लोकांकडून वर्गणी गोळा करून पैसा घेऊन यायचे आणि शाळेसाठी त्या पैशाचा वापर करायचे शाळेचे सभासद व्हा असा आग्रह ते गावकऱ्यांना करायचे म्हणजे त्या पैशातूनही शाळा चालू शकेल पण त्याकाळी गरिबीची परिस्थिती असल्याने गावातील लोक जास्त सभासदही लवकर कोणी होत नव्हते व ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या मनात असेही यायचे की ही संस्था चालते की नाही उगाच आपले सभासद होऊन पैसे वाया जायचे.
गावकऱ्यांसाठी सरकारी योजनेतून काही पैसा आला तर तो पैसा शाळेसाठी वर्ग करून खर्च करत होते, शाळेला अनुदान मिळावे यासाठी नाशिक पुणे महामार्गावर प्रसंगी आंदोलनही करत होते, शाळा मोठी होत होती, गावातल्या मुलींचे माध्यमिक शिक्षण गावातच घ्यायला सुरुवात झाली होती, जो शाळा सुरू करण्याचा उद्देश होता तो त्यांचा सफल झाला होता . एक स्वप्नपूर्ती त्यांची झाली होती.
गडाख नाना आमदार असताना दादा पाटील केदार यांची सिन्नर तालुक्याच्या सभापतीपदी तालुक्याच्या ठिकाणी निवड त्यांनी केली, सरपंच म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास सभापती या पदापर्यंत आला होता. 1972 च्या दुष्काळात सरपंच असताना त्यांनी रोजगार हमी योजनेतून दोडी ते खंबाळे या रस्त्याचे काम सुरू केले त्यातून लोकांना दुष्काळात रोजगार निर्माण करून दिला व लोकांचा रोजी रोटीचा प्रश्न मिटवला. दहा किलोमीटरच्या आत बँक तेव्हा होत नव्हती पण आपल्या गावात बँक असलीच पाहिजे हा मनाशी निश्चय करून दादापाटील केदार यांनी गावात जिल्हा बँकेची शाखा आणली व गावकऱ्यांचे आर्थिक व्यवहार त्या बँकेत होऊ लागले आणि गावात आर्थिक सुलभता निर्माण झाली. जिल्हा परिषदेची मराठी शाळेची इमारत त्यांनी बांधली त्या इमारतीचे उद्घाटन देशाच्या प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले, एका खेडेगावात प्रधानमंत्री येणे म्हणजे अभिमानाचीच बाब होती.
गावात छोटा सरकारी दवाखाना होता पण गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी गावात सरकारी ग्रामीण रुग्णालय पाहिजे, असं त्यांना वाटू लागले , सिन्नर तालुक्यात ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले पण ते देवपूर या गावी मंजूर झाले ही बातमी त्यांना गावात दवाखान्यात गाडीवर ड्रायव्हर ची नोकरी करत असलेल्या गावातील बाबू दगडू आव्हाड यांनी दिली, ही वार्ता समजताच दादा पाटील केदार यांनी बाबू दगडू आव्हाड यांच्या ओळखीतून व त्यांच्या स्वतःच्या मंत्रालयातील दबावाने ग्रामीण रुग्णालय दोडी येथे मंजूर केले, शासनास पटवून दिले की दोडी बुद्रुक हे गाव नाशिक पुणे या महामार्गावरती आहे महामार्गावरती अपघात होतात व अपघात झाल्यानंतर त्यांच्या वर उपचार करण्यासाठी दोडी येथेच ग्रामीण रुग्णालय योग्य आहे हे शासनाच्या अधिकाऱ्यांनाही पटलं आणि त्यांनी दोडी गावात ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं, तेथेही ग्रामीण रुग्णांसाठी जागा खाली करण्यास कारभारी पंढरीनाथ आव्हाड यांची मदत झाली, ग्रामीण रुग्णालयातून पंचक्रोशीतील लोकांची आरोग्याची सोय झाली.
गावातील जाम नदीवर दगडी बंधारा बांधून त्यावर छोटे कालवे काढले व शेतीसाठी पाण्याचे नियोजन केले, गावाच्या कडेला नवीन बारव (विहीर ) खोदली, पाण्याची टाकी बांधली व गावात गल्ली गल्लीत सार्वजनिक नळ सुरू केले, अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली पहिली बारव व ही दादा पाटील केदार यांनी बांधलेली दुसरी बारव यांच्या साह्याने गावाला पाणीपुरवठा सुरू झाला. गावात बाजार समितीच्या माध्यमातून कांदा मार्केट सुरू केले, कांदा मार्केट साठी परवानगी आणताना खूप तसदी झाली कारण तिथेही तोच नियम होता दहा किलोमीटरच्या आत जर कांदा मार्केट असेल तर कांदा मार्केट मंजूर होत नाही तेथेही शासनाच्या अधिकाऱ्यांना दादा पाटील केदार यांनी पटवून दिले की तितका माल दोडी गावात आहे आणि कांदा मार्केटला परवानगी मिळवली, कांदा मार्केट साठी लागणारी जागा ब्राह्मण समाजातील व्यक्तीकडून मिळवली व गावातला शेतीमाल गावातच विकला जाऊ लागला त्यात प्रामुख्याने सुरुवातीच्या काळात भुईमुगाच्या शेंगा व कांदा हे दोन पिके विकली जाऊ लागली.
दादा पाटील केदार जितके समाजासाठी करत होते तितकेच स्वतःच्या कुटुंबासाठी देखील करत होते त्यांनी त्यांच्या आईला आजरपणात अंथरुणावर पडल्यानंतर जवळपास पंधरा वर्षे सांभाळले, जशी लहानपणी आईने त्यांची काळजी घेतली तशीच त्यांनी आईच्या म्हातारपणात आईचीही काळजी घेतली, आईचीही आई होता आलं पाहिजे हे त्यांनी अनुकरणातून दाखवून दिले, त्यांचे भाऊ पांडूशेठ केदार, राणू केदार, नारायण केदार हे त्यांना गावकऱ्यांसोबतच समाजकार्यात मोलाचे सहकार्य करत होते त्यांच्या घरी कोणीही पाहुणा किंवा गावातील व्यक्ती जावो त्या व्यक्तीला ते जेवण केल्याशिवाय कधीही जाऊ देत नव्हते, यालाच तर संस्कार म्हणतात हे संस्कार त्यांच्या पूर्ण कुटुंबावरच झालेले होते, माणुसकी त्यांच्यात अतोनात भरलेली होती. माणुसकीचे दुसरे नाव म्हणजे दादा पाटील केदार.
दादा पाटील केदार यांना संपूर्ण गावाचा पाठिंबा होता दादा पाटील जे बोलतील त्याला गाव कधीच विरोध करत नव्हता कारण गावाला एक पूर्ण विश्वास होता दादा पाटील जे काही करताहेत ते फक्त आणि फक्त गाव आणि गावासाठीच करत आहेत, गावातील सर्व सहकारी त्यांच्या शब्दाच्या पुढे कधीही जात नव्हते आणि म्हणूनच त्यांना गावाचा विकास खऱ्या अर्थाने करता आला. रोजगार, पाणीपुरवठा,आरोग्य, शिक्षण, रस्ते या मूलभूत गोष्टीवर त्यांनी काम केले पण खऱ्या अर्थाने त्यांचे नाव अजरामर झाले ते त्यांच्या शैक्षणिक कार्याने शिक्षणाची गंगा त्यांनी गावात आणली आणि त्या गंगेत शिक्षण घेऊन गावातील तरुण-तरुणी मोठमोठे अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर व प्रगतशील शेतकरी झाले आणि म्हणूनच शिक्षणमहर्षी म्हणून दादा पाटील केदार यांची ओळख पंचक्रोशीत तयार झाली. शिक्षणात केलेली योग्य गुंतवणूक, जगातील सर्वोत्तम व्याज देणारी बँक असते हे त्यांना तेव्हाच कळाले होते.
चांगल्या लोकांनाच आयुष्य कमी असतं असं म्हणतात म्हणूनच की काय संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील आयुष्य कमीच मिळाले तसं दादापाटील केदार यांनाही आयुष्य कमी मिळाले अजून जर त्यांना आयुष्य मिळाले असते तर ते आमदार, खासदार, मंत्री होऊन गावाचा अजून त्यांनी कायापालट केला असता हे मात्र नक्की पण 1988 ह्या वर्षी त्यांचे आयुष्य संपले, देव लवकरच त्यांना घेऊन गेला, त्यांनी उभ्या केलेल्या शाळेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले त्यांना जाऊन आज 36 वर्ष झाली आज त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा होतोय शिक्षण महर्षी दादा पाटील केदार यांना वृक्षमित्र फाउंडेशनकडून व समस्त वृक्षमित्रांकडून विनम्र अभिवादन.
– वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ
अध्यक्ष, वृक्षमित्र फाऊंडेशन व
वृक्षमित्र साहित्य परिषद,सिन्नर.
(७०२०३०३७३८)