महानायक : वसंतराव नाईक
ज्या समाजाला इंग्रजाच्याच्या काळात एका ठिकाणी फार काळ थांबता येत नव्हतं. ज्या समाजात अंधश्रधा,वाईट रुढी,परंपरा यांचं साम्राज्य होतं.ज्या समाजात काला अक्षर भैंस बराबर होतं.पोटासाठी रानोमाळ भटकणारा समाज. कपाळावर चोर गुन्हेगार म्हणुन ठसा उमटवलेला समाज.ना नावाची ना गावाची ओळख असेलला समाज.नातलगांची एकदा ताटातूट झाली तर पुन्हा भेट होईल की नाही याची खात्री नसलेला समाज.त्यासाठी एकमेकांच्या गळ्यात पडून गाण्यातून रडणारा समाज म्हणजे गोरमाटी (बंजारा) समाज.
शांततेच प्रतिक म्हणून पांढरा ध्वज स्विकारुन शांततेच्या काळात ,लढाईच्या काळात राजा महाराजांना धान्यांची रसद पुरविणारा गोरमाटी समाज तेवढाच शूर विर आहे.यांच्याकडे आदरातिथ्य आहे.दुसऱ्यांना सन्माने वागवण्याची वृत्ती आहे.दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती यांच्या नसानसात भिनलेली आहे ;पण समोरचा जर विश्वासघातकी निघाला तर त्याला तोडण्याची हिंमत यांच्यात आहे.गोरमाटी समाजा शब्दांचा पक्का आहे.तो दिलेल्या शब्दांसाठी जीव देवू शकतो व दगेबाजाचा जीव घेवूही शकतो.
जुन्या काळात गोरमाटी समाजात सेवालाल महाराज यांच्यासारखे अनेक क्रांतीकारक योद्धे होवून गेलेले आहेत.त्याच्यापरिने त्यांनी समाजासाठी हयातभर कार्य करत राहीले.समाजासाठी देह झिझवत राहीले.याच समाजात वसंतरावजी नाईक यांचा जन्म झाला.भटक्या चोर गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या समाजात जन्म घेवून त्यांनी समाजाचं उध्दार केले. समाजाला दिशा व अधिकची उर्जा यांच्यामुळे मिळाली.जंगलाताला समाज अधुनिक जगाच्याजवळ त्यांच्यामुळे आला. त्यांच्यामुळेच शिक्षणाची गंगा समाजात वाहती झाली.
वसंतराव नाईक यांच्या जन्म १ जुलै १९१३ रोजी झाला. त्यांच्या वडिलाचे नाव फुलसिंग राठोड व आईचे नाव हुन्नाबाई होते.त्यांच्या आजोबांचे नाव चतुरसिंग राठोड. नाईकसाहेब यांचे आईवडील,आजोबा हे सगळं कुटुम्ब निरक्षर होते.चतुरसिंग राठोड यांनी तांडा वसवला.गहुली तांडयाला स्थिरता दिली.आजुबाजूची जमीन कसायला सुरवात केली.तांडयाची नायकी त्यांच्याकडे होती म्हणून त्यांनी राठोड ऐवजी नाईक हे आडनाव समाजात धारन केलेले आहे.
फुलसिंग राठोड यांना राजूसिंग व हाजूसिंग ही दोन मुलं. राजूसिंग मोठा तर हाजूसिंग धाकटा.फुलसिंग राठोड जरी निरक्षर होते तरी त्यांनी शिक्षणाचे महत्व जाणलेले होते. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना शिक्षण देण्याचे ठरविले.धाकटा हाजूसिंग आता शाळेत जावू लागला.त्या काळात शाळा जवळ नव्हत्याचं. तांड्यातले लोक तर शिक्षणापासून कोसो दूर होते.तशाही परिस्थितीत हजूसिंग शाळेत जावू लागला. त्याचं पाहिली एका गावात.दुसरी दुसऱ्या गावात.तिसरी तिसऱ्या गावात तर चौथी चौथ्या गावात व पाचवी पाचव्या गावात म्हणजेच त्याचं पाहिली ते पाचवीचं शिक्षण जवळपास वेगवेगळ्या पाच गावाच्या शाळेत झाले. शिक्षणासाठी भटकंती सुरू होती ;पण त्यांनी शाळा सोडली नाही.शिक्षणात खंड पडू दिलं नाही.लहानपणापासूनच ते जिद्दी होते, कष्टाळू होते.
नाईक साहेब शिकत राहीले.शिकत राहीले.शेवटी त्यांनी वकीलाचा अभ्यासक्रम पूर्ण केले.नाईकसाहेब प्रेमळ होते. सुस्वभावी होते.विनयशील होते.सुसंकृत होते. गरीबांना, शेतकऱ्यांना मदत करणारे होते त्याचं मन वसंत ऋतूप्रमाणे आनंदी व सदाबहार होतं.ते निर्मळ मनाचे होते.शिक्षणातही हूशार होते.लांडीलबाडी त्यांच्या शब्दकोषात नव्हते.दिलेले शब्द ते कधीच मोडत नसत.वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमरावतीला पंजाबराव देशमुख यांच्याकडे वकीलीचे धडे घेतले.तेथून वकिलीचे धडे घेतल्यानंतर ते पुसदला वकिली सुरू केली.वकिलीचे धडे घेतल्यानंतर त्यांनी गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी मोफत न्यायीक मदत करत राहीले. वेळप्रसंगी ते त्यांना आर्थिक मदतही करत असत.
त्यांनी पैसे कमविण्यासाठी कधीच वकिली केली नाही तर ते नेहमीच सत्याची बाजू घेवून गोरगरिब दीनदुबळयांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिलीचा उपयोग केला.कॉलेज जीवनात निवडणूक हरणारे नाईकसाहेब पुसद नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून निवडूून आले. नगराध्यक्ष झाले.ज्या माणसांची बौद्धीक , सांस्कृतिक ,शैक्षणिक उंच्ची कमी दर्जाची असते ते नेहमीच मी खुप उच्च दर्जाचा आहे असे सिध्द करण्याचा, दाखविण्याचा प्रयत्न करतात.येथे साहेबांकडे कुठल्याही बाबीचं प्रदर्शन करण्याची गरज नव्हती.त्यांच्याकडे आपोआप पद,सत्ता चालत आली. त्याचा उपयोग साहेबांनी समाज सेवेसाठी केला. रंजल्यागांजल्यासाठी केला. साहेबांमुळे त्यांना मिळालेल्या पदाची उंची,दर्जा यात वाढ झाली.नगरसेवकापासून सुरु झालेला प्रवास उपमंत्री,राज्यमंत्री ते थेट मुख्यमंत्रीपदापर्यत पोहचला.साहेबांमुळे या पदाची उंची वाढली.
नाईकसाहेब १९६३ ते १९७५ असे तब्बल विक्रमी एक तपापेक्षा जादा काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले . त्यापूर्वी ते कृषीमंत्री, महसूलमंत्री म्हणून काम केले ;पण त्यांना कधीचा “ग”ची बाधा झाली नाही.त्यांनी तसं होवू दिलं नाही.त्यांच्या तोंडून कधी शिवराळ भाषा निघाली नाही.त्यांच्या पक्षांच्या नेत्यांना किंवा विरोधकांना कधीच वाईट शब्दांनी हिनवले नाही.राजकारणात कधीच सर्कसमधील किंवा जंगलातील प्राण्यांना येवू दिले नाही.मराठवाडयाची मुलूक मैदानी तोफ भाई केशवरावजी धोंडगेसारख्या आक्रमक,सडेतोड, पोटतिडकिने प्रश्न मांडणाऱ्या सदस्यांचं ते नेहमीच आदर करत.त्याचं कौतुक करित असत.त्यांना बोलण्यासाठी सभागृहात अधिकचा वेळ देत.आजकालचे राजकारणी आपल्याच सहकार्यांना कसे वेगवेगळे प्राणी बनवत आहेत हे आपण पहात आहोत.त्या काळी राजकारणात राजकीय मतभेद होतं ;पण त्यांच्यात मनभेद नव्हतं.आजच्यासारखं वैयक्तीक व्देष,मत्सर नव्हतं. गच्चाळ भाषेच वापर कोणीही करत नव्हते.
नाईकसाहेब हे शेतकऱ्यांचे वाली होते. त्यांच्यासाठी ते प्रेरणास्थान होते.शेतकरी व शेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता.ते निसर्गावर निःसिम प्रेम करणारे होते.शेतकरी सुखी झाला पाहिजे यासाठी ते जीवनभर कार्य करत राहिले. त्यांच्या प्रयत्नानेच महाराष्ट्रात हरीत क्रांती घडून आली.शेतकऱ्यांना शेतात नवनवीन प्रयोग करण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली. त्यांनी स्वत:च्या शेतात नवनवीन प्रयोग केले.
नाईकसाहेब मुख्यमंत्री असताना १९७२ साली भयान दुष्काळ पडला.लोकांना जेवायला मिळत नव्हते.अन्नधान्यांची प्रचंड तूट होती. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वन वन भटकावे लागले.जनावरांनाही चारा पाणी उपलब्ध नव्हते. एका एका गावात शेकडो जनावरे मृत्युमुखी पडत होती.राज्यात हहांकार माजला होता ;पण तशाही भयंकर परिस्थितीत नाईकसाहेब डगमगले नाहीत.सर्व संकटाला त्यांनी धैर्याने तोड दिले. संकट काळात त्यांनी लोकांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहीले. व महाराष्ट्राला संकटातून सहीसलामत बाहेर काढले. अन्नधान्यात स्वंयपूर्ण बनविले. त्यांनी त्याकाळी ग्रामीण भागातील लोकांना काम उपलब्ध करुन दिले.हताला रोजगार दिला.कामावरील लोकांना पौष्टीक सुकडी का सुगडी खाण्यास दिली .
आजचे शासन गरीब लोकांना अन्नधान्याचे मोफत वाटप करत आहे. त्या वाटपाचं उधो उधो करुन सत्तेसाठी स्वतःची पोळी भाजून घेत आहे.गरीब लोकांना मोफत अन्नधान्य वाटून त्यांच्यावर उपकार केल्याची भाषा वापरत आहेत.त्यांना हिटलरच्या कोंबडयाप्रमाणे लाचार बनवत आहे.गरीबाची काम करण्याची उर्मी व शक्ती येथील राजकारणी बरबाद करत आहेत. त्यांना आळशी बनवत आहेत. नाईकसाहेबांनी गरीबांना मदत केली. त्यांना अन्नधान्य वाटले ;पण लाचार बनविले नाही. त्यांच्याकडून समाजापयोगी काम करुन घेतले. नवीन रस्ते तयार करून घेतले.बहुतेक त्याच रस्त्यांवर आजचे राजकारणी डांबर/सिंमेट टाकून तो रस्ता आम्ही बनवला अशी स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत.नाईक साहेबांसारखे लोकांना काम द्या व त्यांना अन्नधान्य मोफत वाटा.
रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्यास काम उपलब्ध करुन द्या.गोरगरीबांला लाचार न बनविता अधार देवून स्वाभिमानी बनवा. नाईकसाहेब हे रोजगार हमी योजनेचे जनक आहेत.नंतर ही योजना राष्ट्रीय पातळीवर ही स्विकारली गेलेली आहे.
नाईकसाहेब शिक्षण घेताना त्यांना आलेल्या आडचणींचा अनुभव घेतलेला होता. त्यांची जशी शिक्षण घेताना फरफट झालेली होती तशी गत समाजातीत मुलांची होवू नये म्हणून त्यांनी भटक्या विमुक्तासाठी आश्रमशाळा काढल्या.त्यातून हजारो गरीब विद्यार्थी शिक्षण घेवून उच्चपदस्थ बनले.घार फिरते आकाशी चित्त तिचे पिल्यापाशी.तशीच नजर , तळमळ साहेबांची समाजाविषयी होती.त्यांचा एक किस्सा वयस्क माणसं सांगतात.एकदा ते नांदेड जिल्ह्यातील ता.मुखेड येथे आले होते.तेथील सभेला जास्तीत जास्त बंजारा समाज उपस्थित होता.त्यानी तेथे गोरमाटी भाषेतूनच भाषण केले. त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की,”तुम्ही फक्त कागदी घोडा नाचवून माझ्याकडे पाठवा.मी तूम्हाला खऱ्याखुऱ्या घोडयाच्या पाठीवर मावेल तेवंढ पाठवून देतो.”उच्च पदावर पोहचल्यानंतर तो व्यक्ती बहुधा समाजाला विसरतो ;पण नाईकसाहेब त्यांच्या समाजाला कधीच विसरले नाहीत.त्यांनी भटक्या विमुक्तासाठी आरक्षण मिळवून दिले.शेतकऱ्यांना बारमाही उत्पन्न घेता यावे यासाठी त्यांच्या काळात अनेक धरणांची निर्मिती झालेली आहे. नाईकसाहेब गोरमाटीसाठी नायक नाहीत ते महानायक आहेत.
राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड -६
९९२२६५२४०७.