“निष्कलंक व स्वाभिमानी शिक्षकाची सेवानिवृत्ती”
माय आणि बाप दोघेही शिकलेले नसताना, कुठलाही शिक्षणाचा गंध नसताना आपली मुलं शिकली पाहिजे आणि शिकून मोठी झाली पाहिजे, आपली गरिबी हटली पाहिजे आणि गरीबी हटवायचे असेल तर एकच पर्याय आहे तो म्हणजे शिक्षण, आणि तेच शिक्षण नानाबाईने व वाळीबा सांगळे यांनी आपल्या सहाही मुलांना दिले सहापैकी पाच मुले नोकरी करत आहेत तर एक मुलगा शेती करतोय.
मोह येथे 2 जून 1966 रोजी नानाबाईला मुलगा झाला त्या मुलाचे नाव नानाबाईने अशोक ठेवले बालपणीचा काळ सुखाचा तो काळ संपला आणि प्राथमिक शिक्षण सुरुवात झाले, अशोकचे प्राथमिक शिक्षण दोडी येथे जिल्हा परिषद शाळेत झाले, सानप गुरुजी, भालेराव गुरुजी, कुलकर्णी गुरुजी, शेळके गुरुजी, यांनी अशोक चा शिक्षणाचा पाया भक्कमपणे रचला, सर्वांगीण शिक्षण बाल वयात मिळाले, दहा ते पाच जिल्हा परिषद शाळा असल्याकारणाने खेळ, शिक्षण आणि छंद सर्वच शाळेत जोपासले गेले. सरांचा आवडता खेळ म्हणजे खो खो आणि कबड्डी आणि छंद वाचन आणि समाजसेवा.
गावात कैलासवासी दादा पाटील केदार यांनी विनाअनुदानित तत्त्वावर गावातील महादेव मंदिरात वास्तव्यास असलेले व गावाचे श्रध्दास्थान असलेले ब्रम्हचारी श्री ब्रह्मनंद स्वामी महाराज यांच्या नावाने श्री ब्रम्हनंद न्यू इंग्लिश स्कूल हर माध्यमिक विद्यालय सुरू केल्यामुळे माध्यमिक शिक्षण गावातच घेता आले. या विद्यालयात कैलासवासी वाकचौरे सर व पाटेकर सर परश्रामी मॅडम, पानसरे सर या शिक्षकांचे अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन लाभले, आठवी पासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल दोडी बुद्रुक येथे पूर्ण केले, त्याकाळी शाळा सोसायटीच्या गोडाऊनमध्ये भरत होती, सुरुवातीला बसण्यासाठी बेंच देखील नव्हते, जमिनीवरच बसून शिक्षण सुरू होते, पण जे जे ल जमिनीवर बसतात ते ते फार मोठ्या उंचीवर पोहोचतात असं म्हटलं जातं, तसंच काहीसं अशोकच्या बाबतीत पण झाले, इयत्ता दहावीत अशोक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांकाने पास झाला. दोडी गावच्या विद्यालयातील पहिल्या बॅचचा पहिला आलेला विद्यार्थी म्हणजे अशोक वाळीबा सांगळे, शाळेच्या कायमस्वरूपी बोर्डवर अशोकचे नाव प्रथम क्रमांकाने टाकण्यात आले आणि अशोकच्या यशाची घोडदौड खऱ्या अर्थाने सुरू झाली.
गावात त्यावेळी ज्युनिअर कॉलेज नसल्याने पुढील शिक्षण अकरावी व बारावी एलफिस्टन कॉलेज मुंबई येथे पूर्ण केले त्यानंतर बी.एस.सी. गणित विषयात मालपाणी संगमनेर कॉलेज येथे केले आणि पुढील बीएड शिक्षण गोखले एज्युकेशन परेल येथे घेतले. इच्छा असूनही आर्थिक परिस्थिती नसल्याने इंजिनिअरिंग चे शिक्षण घेता आले नाही आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.
अशोकची नोकरीची पहिली सुरुवात 9 ऑगस्ट 1994 रोजी व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय निऱ्हाळे येथे झाली आणि अशोकचा विद्यार्थी दशेतून शिक्षक दशेत प्रवेश झाला, सर ही पदवी मिळाली, सुरुवातीला तीन वर्ष सायकलवर दोडी ते निऱ्हाळे जवळपास 15 किलोमीटर अंतर जाऊन येऊन केले. सलग 11 वर्ष निऱ्हाळे येथे शिक्षण सेवा केली, त्यानंतर 18 वर्ष सिन्नर तालुक्यातील दातली येथे शिक्षण सेवा केली, सध्या माध्यमिक विद्यामंदिर ब्राह्मणवाडे येथे मुख्याध्यापक या पदावरून आज सेवानिवृत्त होत आहेत.
शिक्षण क्षेत्रात ज्या विषयाने मुलांना धडधड भरतअसते तो विषय म्हणजे गणित, सरांनी जवळपास 30 वर्ष तोच गणित विषय शाळेत शिकवला, गणित विषयाची पहिल्यापासूनच सरांना प्रचंड आवड होती इयत्ता दहावीतही सरांना गणितामध्ये 150 पैकी 150 मार्क्स मिळाले होते, त्यामुळे शिकवताना गणित या विषयावर सरांची प्रचंड कमांड होती, अवघड विषय सोपा कसा करून शिकवायचा यात त्यांचा हातखंड होता, त्यामुळेच निऱ्हाळयासारख्या छोट्याशा दुष्काळी गावात विद्यार्थ्यांना कुठलीही खाजगी शिकवणी नसतानाही एक विद्यार्थी सिन्नर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आणि ह्या विद्यार्थ्यांला गणित विषयात 150 पैकी 150 मार्क मिळाले होते, सरांची शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांना खूप आवडत असे, सरांचा स्वभाव शिस्तप्रिय होता, हसा खेळा पण शिस्त पाळा हा नियम त्यांनी तीस वर्षे पाळला त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये सरांबद्दल भीतीयुक्त आदर होता, आपली शैक्षणिक सेवा प्रामाणिकपणे करत असताना त्यांनी समाजसेवा पण अतिशय प्रामाणिक केली, विविध शाळावंर सरांनी सतत विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून गुणवत्ता वाढीसाठी सतत अध्ययन करत राहिले.
सामाजिक शैक्षणिक जीवनात शिक्षकांच्या उन्नतीसाठी टी एस दिघोळे सेकंडरी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची पी. डी. विंचू यांच्या संकल्पनेने व सर्व शिक्षकांच्या साथीने संस्थेची स्थापना केली व संस्था नावारुपास आणली त्या संस्थेवर सलग 24 वर्ष संचालक म्हणून काम केले तसेच त्या संस्थेचे दहा वर्ष चेअरमन देखील होते.
श्री ब्रह्मानंद स्वामी ग्रामीण पतसंस्था येथे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले, श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणत शाळेच्या तसेच गावाच्या विकासासाठी माजी विद्यार्थी सुरेश शेळके, शाम उगले, संजय आव्हाड आदी विद्यार्थ्यांना सोबत घेत माजी विद्यार्थी बहुउद्देशीय संस्था अधिकृत नोंदणी करून स्थापन केली व या संस्थेचे गावाच्या विकासामध्ये मोठे योगदान देखील आहे. गाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी उत्कर्ष भारती ऍग्रो प्रोडूसर कंपनीची दशरथ आव्हाड ( संस्थापक अध्यक्ष ) व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने स्थापना केली त्यात अशोक सर संचालक आहेत. तसेच सिन्नर तालुका सेकंडरी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना श्री आर जे थोरात सर, पगार सर, विजय थोरात सर, या सर्वांच्या सहकार्याने स्थापना केली व अशोक सर सलग वीस वर्षे संचालक म्हणून तेथे कार्यरत आहेत.
ज्या शाळेत आपण शिकलो त्याच शाळेच्या म्हणजे श्री ब्रह्मानंद स्वामी प्रसारक मंडळ दोडी बुद्रुक या संस्थेच्या विश्वस्त म्हणून सध्या सर काम पाहत आहेत, ही संस्था आज श्री पांडूशेठ केदार यांच्या अध्यक्षतेखाली गुणवत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात नावाजलेल्या संस्थेपैकी एक आहे.
कोणतीही व्यक्ती मोठी होते तेव्हा त्या व्यक्तीला घरची साथ खूप महत्त्वाची असते, अशोक सरांना देखील त्यांची धर्मपत्नी व अर्धांगिनी अलका यांची मोलाची साथ लाभली आहे तसेच संपूर्ण कुटुंबाचे देखील साथ लाभली आहे आजही त्यांचे सहा भावांचे कुटुंब एकत्र आहे, सर्व भावांचे मुलं विविध पदावर कार्यरत आहेत भावांची मुलही त्यांनी चांगल्या प्रकारे शिकवली म्हणूनच हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या नामांकित कंपनीत त्यांचा पुतण्या रामदास सांगळे व्यवस्थापक या पदावर काम करत आहे, त्यांना एक मुलगा अंकुश व एक मुलगी आकांक्षा आहे, सध्या ते दोघेही नोकरी करत आहेत, त्यांचा स्वभावच इतरांना मदत करण्याचा आहे आणि त्यामुळेच परिसरातील त्यांच्या वयापेक्षा लहान मोठे व समवयस्क असा त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे.
ज्या आईने म्हणजे नानाबाईने शिक्षणाचे महत्त्व ओळखलं त्या आईचं स्वप्न सरांनी साकार केलं शिक्षणासाठी सरांना रोजाने कामाला जायला लागायचे त्याचे खऱ्या अर्थाने सरांनी चीज केले.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याचा प्रत्येय आला, शिक्षणाने सरांची गरिबी हटवली, चांगले दिवस आले, आदर्श शिक्षक म्हणजे नेमकं दुसरं तिसरं काय असते हो ? विद्यार्थी घडविले, कुटुंब घडविले, समाज घडविला, सर एका वर्षासाठी नाहीतर सलग तीस वर्ष आदर्श शिक्षक आहेत आज सर सेवा निवृत्त होत आहेत संपूर्ण नोकरी ही सरांनी स्वाभिमानी वृत्तीने पूर्ण केली ते शेवटपर्यंत निष्कलंक राहिले आणि त्यांनी एक आदर्श समाजामध्ये निर्माण केला, शांत व संयमी स्वभावाने सरांनी सर्वांची मनं जिंकली, सरांना भावी वाटचालीस वृक्षमित्र फाउंडेशन कडून वृक्षमय शुभेच्छा, आता सरांनी पूर्ण वेळ समाजसेवेचे काम करावे व त्यांच्या हातून जास्तीत जास्त अजून समाजसेवा घडावी याच त्यांना मनःपूर्वक सदिच्छा.
आता आयुष्याच्या या नव्या वळणावर
दिसणाऱ्या नव्या निळ्या क्षितिजावर
सूर्य तुमचा तेजाने जोमाने तळपणार
आयुष्य तुमचे झगमग खुलणार
आनंदी आनंदाने तुम्ही राहणार
समाजास तुम्ही वेळ देणार
मित्र आप्तेष्टांना मनसोक्त भेटणार
सेवानिवृत्त तुम्ही आज होणार.
आपुलकीने रोजच्या जोडलेल्या
सहकाऱ्यांना मात्र तुम्ही मुकणार
आठवणींचा महापूर मात्र आज येणार
ओलेचिंब अश्रू आज दाटणार….
आदर्श मिळो साऱ्यांना
तुमची वाचून कहाणी
क्षण निवृत्तीचा येता
आलं डोळ्यात पाणी
तुमच्या यशाची गाणी
घुमत राहो कानोकानी…..
– वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ
अध्यक्ष, वृक्षमित्र फाऊंडेशन व
वृक्षमित्र साहित्य परिषद,सिन्नर
(७०२०३०३७३८)