आधी ‘नीट’ला नीट समजून घ्या… मगच ‘नीट’चा नीटपणे विचार करा !
‘नीट’ची स्वप्ने रंगवण्यापूर्वी एकत्र बसून’नीट’चे मृगजळ नीट समजून घ्या!
नीट मध्ये जेमतेम मार्क मिळालेल्या विद्यार्थी व पालकांपासून पाचशे मार्का पर्यंत पोहोचलेल्या अनेकांची घोर निराशा झालेली सापडते. तर 600 पेक्षा जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थी व पालकांची सरकारी एमबीबीएस कॉलेज मिळणार की नाही याची अस्वस्थता प्रचंड वाढली आहे. याच वेळी पाच जून पासून सर्वच वृत्तपत्रात विविध क्लासेसच्या जाहिराती ठळकपणे येत आहेत. टीव्हीवर नीट रिपीट करण्यासाठी वेगळ्या बॅचेसचे आवाहन सतत दाखवले जात आहे. या गदारोळात मूळ विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते. ते कोणते यावर सविस्तर माहिती जाणकार पालकांना मिळावी एवढाच या लेखाचा हेतू. यंदा दहावीचे निकाल लागले आहेत. अनेक पालकांनी नीट साठीचे क्लासेस सुरू केलेले आहेत. बारावीचे व नीट चे निकालानंतर पुन्हा नीट देण्याचा विचार करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी मोठी आहे.
*नीट मधून काय मिळते?
साडेपाच वर्षे शिकून एमबीबीएस नंतरची वाटचाल काय असते? त्यासाठीचा खर्च काय असतो? पहिल्या पदवीनंतर दुसरी नीट वाट पाहत असते,तर सुपर स्पेशालिस्ट बनण्यासाठी अजून एक तिसरी नीट द्यावी लागते याची कसलीही माहिती न घेता जे पालक विद्यार्थी या रस्त्याला जातात त्यांचे पदरी प्रत्येक टप्प्यावर घोर निराशा येते. परदेशात मेडिकल पदवीला शिकायला जाणाऱ्यांची संख्या दरवर्षी सुमारे 30 ते 35000 पर्यंत जाऊन पोहोचली आहे.यातील बहुसंख्य विद्यार्थी छोट्या छोट्या गावातून जातात. कझाकिस्तान ,अझरबैजान अशा क्वचितच किंवा न ऐकलेल्या देशातही हजारभर मुले शिकताना आढळतात.शिकून परत आल्यावर त्यांना येथील नेक्स्ट ही कठीण परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. ती तीन-तीन वेळा देणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. याची कोणतीही कल्पना पालकांना तिकडे मुला मुलींना पाठवताना नसते. शिकून आल्यावर परीक्षा देऊ, ती पास होतील एवढेच ते सांगतात.
*पालकांनी काय विचार करावा?
●एम बी बी एस साठी सरकारी कॉलेजमध्ये उपलब्ध जागा किती?
आपल्या कॅटेगरीसाठीच्या त्यातील जागा किती? हे दोन आकडे स्पष्टपणे कोणालाही उपलब्ध असतात. सरकारी महाविद्यालयातील एमबीबीएस एकूण जागांचा आकडा यंदाचा 3390 इतकाच आहे. 50 टक्के आरक्षण गेल्यानंतरचा आकडा कोणीही शोधू शकतो. सरकारी अनुदानित महाविद्यालयांचा आकडा आहे 764. विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये 3170 जागा आहेत.
● डेंटिस्ट बनण्यासाठी सरकारी व खाजगी मिळून 2675 जागा उपलब्ध असतात. त्यातील सरकारी म्हणजेच कमी फीच्या फक्त 211 जागा आहेत.
● आयुर्वेदातील म्हणजेच बीएएमएस साठी 7857 जागा आहेत.
● होमिओपथी म्हणजेच बीएचएमएस साठी 4594 जागा आहेत.
याचा नीट अर्थ ,नीट मध्ये पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राज्यातील अवघ्या 22 833 इतक्याच जागा आहेत. सामान्य पालकांना न परवडणाऱ्या अशा विनाअनुदानित संस्थात 16,655 जागा यातच मोडतात. याचा अर्थ म्हणजे मध्यमवर्गीयांना परवडतील अशा जागांची संख्या एकूण 6178 एवढीच भरते. तीही तीन्ही प्रकारच्या वैद्यकीय शाखातील उपलब्ध जागांची एकत्रित संख्या आहे. केवळ महाराष्ट्राचा विचार करता एकूण ज्युनिअर कॉलेजांची संख्या याचे आसपास आहे. प्रत्येक ज्युनियर कॉलेजमधील पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा सामावून घेणे कठीण असा हा आकडा आहे.
*विनाअनुदानित एमबीबीएसचा खर्च
केवळ एका वर्षाची फी 13 लाख ते 28 लाख या दरम्यान आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जायचे असेल तर दुसरी नीट देणे गरजेचे. सरकारी महाविद्यालयातून पास झालेल्यांच्या स्पर्धेतून फारच थोड्या विद्यार्थ्यांचा येथे निभाव लागतो. ही स्पर्धा जीवघेणी असते. हवी ती शाखा मिळण्याकरता पहिल्या पाचशे विद्यार्थ्यात आले तरच निभाव लागतो. सरकारी महाविद्यालयातून पहिल्या नीट मधून 600 पेक्षा जास्त मार्क मिळवलेले अनेक विद्यार्थी तीन-तीनदा ही परीक्षा देताना दिसतात. तरीही अनेकांना हवी ती शाखा मिळत नाही. पदव्युत्तर पदवी साठी (म्हणजेच एमडी किंवा एमएस) सध्या 32 ते 35 विविध शाखा उपलब्ध आहेत. या तीन वर्षांच्या कठीण अभ्यासक्रमांची फी सध्या दीड कोटीच्या घरात जाते.मोठ्या किंवा कार्पोरेट रुग्णालयात इलाजा ला जाणाऱ्या मंडळींना सुपर स्पेशालिटी हा शब्द चांगला माहीत आहे. हार्टचा ,मेंदूचा , लिव्हरचा, किडनीचा डॉक्टर किंवा त्यातील ऑपरेशन करणारा सर्जन यासाठी तिसरी नीट देऊन मोजक्यांना प्रवेश मिळतो.
नुकतेच बायपासचे ऑपरेशन करून झालेल्या आयटी मधील खूप पैसे मिळवणाऱ्या वडिलांना डॉक्टर व्हायची इच्छा असलेल्या मुलीचे संदर्भात ही माहिती सांगितली तर त्यांना कसलीच कल्पना नव्हती. हाच अनुभव म.टा.चा हा लेख वाचणाऱ्या वाचकांनाही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण इतक्या दूरवरचा विचार कोणीच पालक करत नाहीत. दहावीला 80 टक्के मार्क पडले मुलगा मुलगी मेडिकलला जायचे म्हणत आहे, क्लासची जाहिरात पाहून क्लास लावला आहे या पलीकडे या अतीतीव्र स्पर्धेच्या आकड्यांचा विचार केला जात नाही. मग चर्चा सुरू होते ती नीट कठीण आहे, तिथे निगेटिव्ह मार्किंग असते, मग आमच्या मुलांनी मग काय करायचे अशी.ज्या सधन पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यांच्याही आवाक्या बाहेर जाणारे हे सारे आकडे आहेत याचीही कल्पना नसते. एमडीएमएस किंवा सुपर स्पेशलिस्ट बनल्यावर मोठ्या रुग्णालयात लगेच नेमणूक होत नाही. किमान पाच वर्षाचा अनुभव घेतल्यावर तिथे कन्सल्टंट म्हणून नेमणूक होऊ शकते. हे शक्य नसल्यास नवीन सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कामाला लागणे हाच रस्ता राहतो. वयाच्या तिशी नंतर यातील कोणाच्याही रस्त्याची सुरुवात होते थोडक्यात बारावीनंतर किमान दहा ते बारा वर्षे शिकण्यात जातात.
*दुसरे कठीण वास्तव
गेल्या पंधरा वर्षांमध्ये एमबीबीएस झालेला कोणताही डॉक्टर सहसा अनेक वर्षांच्या पद्धतीप्रमाणे दवाखाना टाकून काम करण्यास तयार नसतो. केवळ पुणे शहराचे उदाहरण घेतले तर नवीन एमबीबीएस डॉक्टरने दवाखाना सुरू केला आहे असे उदाहरण सापडत नाही. याचाच दुसरा अर्थ प्रत्येकाला पदव्युत्तर पदवी हवीशी वाटते. ती संधी जेमतेम 40 टक्क्यांना मिळते. असे फक्त पदवीधर डॉक्टर मोठ्या रुग्णालयात नोकरी मागावयाला गेल्यास त्यांना सामान्य पगाराच्या किरकोळ नोकरीत घेतात.त्याही कशाबशा मिळतात. सरकारी नोकरीत जाण्याची तयारी असली तर ती लगेच मिळते असे नाही व कायम बदलीची तयारी ठेवावी लागते. एक प्रकारे मानसिक फरपट करून घेण्याचा हा राजमार्ग ठरत आहे.
बीएएमएस किंवा बीएचएमएस झालेल्या डॉक्टरांना सरकारी नोकरीत दुय्यम पगार दिला जातो. मोठ्या रुग्णालयात त्यांना जेमतेम पगारावर म्हणजे पंधरा ते वीस हजार रुपये महिना राबवून घेतले जाते. या पगारात सहसा वाढ होत नाही. यातील बहुसंख्य खाजगी वैयक्तिक दवाखाने काढतात. मात्र त्याला मोठेच भांडवल लागते.असे असंख्य डॉक्टर शहरातील कोणत्याही गल्लीला तुम्हाला सापडतील.
पण नवीन पास झालेल्या डॉक्टरला आता मोठ्या शहरात जागा मिळणे व त्यानंतर तीन वर्षे वाट पाहून वैद्यकीय व्यवसाय करणे कठीण होत आहे. जुन्या म्हणी प्रमाणे नशिबात असेल तर कोणत्याही रस्त्याने पैसा तुमच्याकडे चालत येतो. पण अशांची संख्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त असतं नाही. मोठे भांडवल वडिलांकडून घेऊन स्वतःचा दवाखाना सुरू केला आणि समोरच्याच नवीन बांधून तयार झालेल्या इमारतीत पुढच्या वर्षी नवीन डॉक्टर आला तर दोघात रुग्ण वाटले जातात.
* नीट चा रस्ता कोणी घ्यावा ?
1)ज्यांच्याकडे भरपूर पैसे पडीक आहेत व कायम 70 टक्के मार्क पडतात.
2) शास्त्र व गणित या दोन विषयात पाचवी ते दहावी वर्गातील पहिले तीनातील क्रमांक ज्यांनी सोडला नाही अशा कोणीही…..
3) पाचवी, आठवी स्कॉलरशिप ज्यांना मिळाली आहे व शास्त्र गणितात 90 पेक्षा जास्त मार्क आहेत.
4) एमटीएस किंवा एनटीएस मधे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी.
5) अकरावी व बारावी मध्ये पी.सी. एम.बी. मध्ये किमान प्रत्येक विषयात 80 मार्काची खात्री असलेल्यांनी.
कारण या साऱ्यांची पुरेशी मानसिक व बौद्धिक मशागत झालेली असते. याचे जोडीला रोज पाच तास स्व- भ्यास करण्याची जिद्द व चिकाटी हवी.गणित हा विषय अजिबात सोडू नये. फिजिक्स मधील अभ्यासाला त्याचा फायदा होतो. शिवाय मेडिकल नाही मिळाले तर इंजिनिअरिंगचे पर्याय उपलब्ध राहतात. गणित सोडून ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या 80 टक्क्यांवर आहे म्हणून हा उल्लेख.
नीट ही परीक्षा मॅरेथॉन रेस आहे असे समजा. त्याची तयारी दहावीच्या आधीच्या पाच वर्षात होते.दहावीला 90 टक्के पडले म्हणून नीट चा क्लास लावणे याचा अर्थ मॅरेथॉन ची जाहिरात पाहून टी-शर्ट व बूट घालून स्पर्धेच्या रांगेत जाऊन उभे राहणे.मग एक ते दीड किलोमीटर पळल्यानंतर यातील सारेच दमछाक होऊन फतकल मारून बसतात.यंदा नीट मध्ये पात्र न झालेले वा 360 च्या आत गुण मिळवणारे या गटात मोडतात.
(सौजन्य म टा)
ReplyForward |