“समाजाला जागृत करणारी नजर म्हणजे – गंपूच्या गोष्टी”
महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर अर्थात जुने नाव अहमदनगर या जिल्ह्याला ऐतिहासिक, पौराणिक साहित्याचा वारसा आहे. या जिल्ह्याने अनेक साहित्यिक घडविले आहेत. दिग्गज साहित्यिकांनी जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात नेले आहे. अशाच दिग्गज साहित्यिकांच्या सहवासाने नव्यादमाची साहित्यिक पिढी तयार होतांना दिसत आहे, चि. गौरव भूकन हा या नव्यादमाचा नवा लेखक जिल्ह्याला परिचित झाला आहे. नुकताच त्यांचा *गंपूच्या गोष्टी* हा बालकथासंग्रह प्रकाशित झाला. अवघ्या सोळा वर्षाच्या मुलाचा हा बालकथासंग्रह साहित्य क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे. यावयात चि. गौरवला आलेली समज आणि त्याने समाजाचे केलेले निरीक्षण आपल्या बाल कथासंग्रहातून मांडले आहेत. अहमदनगरच्या शब्दगंध प्रकाशन या प्रकाशन संस्थेने या मुलाला प्रोत्साहन देवून त्याच्या लेखन कलेतून एका साहित्य कलाकृती नवनिर्मितीसाठी त्याला उभारी दिली आहे.
*गंपूच्या गोष्टी* या कथासंग्रहाचे निरीक्षण केले असता त्यावर काही संदर्भ दिसून आले, या मुखपृष्ठाचा आपण साहित्यिक अंगाने विचार करणार आहोत. या मुखपृष्ठावर पाच मुले एका ग्रामीण भागातील गावाच्या वस्तीतून धावतांना दिसत आहेत. त्यातील एक सर्वात पुढे आहे तर बाकीचे चार त्याच्या पाठीमागे धावत आहेत. मुलांचे डोळे अत्यंत अर्थपूर्ण दाखवले आहेत तसेच त्यांच्या मागे पावलांखाली धुराळा उडालेला दिसतोय. या मुखपृष्ठाची संकल्पना बालसाहित्यिक चि. गौरव भूकन याची असून चित्रकार सतीश कुलकर्णी यांनी या मुखपृष्ठाला सजवले आहे. असे विविध अंगाने सजवलेले मुखपृष्ठ माझ्या पाहण्यात आले आपण या संदर्भाचा विचार करणार आहोत.
*गंपूच्या गोष्टी* या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर पाच मुले एका ग्रामीण भागातील गावाच्या वस्तीतून धावतांना दिसत आहेत मुखपृष्ठचित्रकाराने अतिशय अर्थपूर्ण विचार करून ही पाच मुले दाखवली आहेत. याचा अर्थ असा की – आपल्या हाताची पाच बोटे एकसारखी नाहीत मात्र एका हाताला जोडलेली आहेत तसेच या मुखपृष्ठावरील पाचही मुले एक सारखी नाहीत मात्र एका विचाराने जोडली गेली आहेत हा एकीचा संदेश यातून दिला गेला आहे. ही मुले गावाच्या वस्तीतून धावतांना दिसत आहेत याचा अर्थ मला खूप भावला आहे. ग्रामीण भाग तसा पाहिला तर शैक्षणिकदृष्ट्या मागास असतो.. शेतीव्यवसायाशी निगडीत कामे असल्याने शिक्षणापासून काही मुले वंचित राहतात त्यामुळे आपण समाजात शिकून मोठे व्हावे, गावाला, आपण ज्या वस्तीत राहतो त्या वस्तीला आपला अभिमान वाटावा म्हणून ही मुले एक प्रचंड आशावाद घेऊन मनात शिक्षणाची ओढ, शिक्षण घेऊन काहीतरी करून दाखवायची जिद्द मनात घेऊन गावातून शहराच्या दिशेने ही मुले धावत आहेत असा अर्थ मला यातून अभिप्रेत होतोय..
*गंपूच्या गोष्टी* या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर धावतांना दिसत आहेत त्यांच्या मागे पावलांखाली धुराळा उडालेला दिसतोय यातून असा अर्थ मला जाणवला की, हल्ली मुले मातीत खेळतांना दिसत नाहीत..आपले पालकच मुलांना मातीत खेळण्यापासून दूर ठेवतात, मुले घरातच मोबाईलवर खेळ खेळतात, अभ्यास करतात, व इतरही अनावश्यक माहिती बघत असतात त्यामुळे मोबाईलच्या जमान्यात अंगाला मातीचा वास लागत नाही.. जोवर गावखेड्याच्या मातीचा धुळीकण अंगाला लागत नाही तोवर या मातीचे उपकार कळत नाहीत. ज्याचे अंग मातीच्या वासाने माखलेले असते त्याला शक्यतो शारीरिक व्याधी जडत नाहीत, त्यांच्या अंगात रोगप्रतिकार क्षमता आलेली असते म्हणून मुलांना मातीत खेळू द्यावे हा संदेश देण्यासाठी धावतांना मुलांच्या पावलांखाली धुराळा उडालेला दाखवला आहे असा अर्थ मला जाणवला.
*गंपूच्या गोष्टी* या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर एक मुलगा सर्वात पुढे आहे तर बाकीचे चार त्याच्या पाठीमागे धावत आहेत… याचा अर्थ असा आहे की – समाजात लहान मुलांना कोणीतरी मार्गदर्शक हवा असतो, प्रत्येकाची बौध्दिकक्षमता सारखी नसते.. त्यामुळे पुढच्या मुलाच्या मार्गदर्शनाखाली बाकीचे मुले त्याला साथ देत आहेत.. आपल्याला जो चांगल्या मार्गाने घेऊन जातो त्याला साथ दिली पाहिजे.. हा मोलाचा संदेश यातून दिला गेला आहे.
*गंपूच्या गोष्टी* या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर मुलांचे डोळे अत्यंत अर्थपूर्ण दाखवले आहेत त्याचाही एक गर्भित अर्थ मला जाणवला आहे. मुलांच्या डोळ्यात प्रचंड आशावाद दिसून येतो.. उत्साह दिसून येतो. सर्वांत महत्वाचे म्हणजे या डोळ्यातून असे जाणवते की, लहान मुलांनी नेहमी चौकस रहावे, आपली नजर नवनिर्मितीच्या ध्येयाकडे नेणारी असावी. आपल्या नजरेने समाजातील बारीकसारीक गोष्टीचे निरीक्षण करून झोपेचे सोंग घेतलेल्या समाजाला जागृत करण्याचे काम केले पाहिजे असा गर्भित अर्थ मला यातून जाणवला आहे.
*गंपूच्या गोष्टी* या कथासंग्रहाच्या प्रकाशनच्या निमित्ताने एक चांगली कलाकृती साहित्य क्षेत्रात दाखल झाली आहे. चि. गौरव भूकन यास पुढील साहित्य निर्मितीसाठी शुभेच्छा ..तूर्तास इतकेच…
मुखपृष्ठ परीक्षक –
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क ७७७३९२५००० ( तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृतीचा परिचय
कलाकृतीचे नाव- गंपूच्या गोष्टी
साहित्य प्रकार – बालकथासंग्रह
लेखक – चि. गौरव भूकन
प्रकाशक – मा सुनील गोसावी
प्रकाशन- शब्दगंध प्रकाशन, अहमदनगर
मुखपृष्ठ संकल्पना – चि गौरव भूकन
मुखपृष्ठ सजावट- सतीश कुलकर्णी
स्वागत मूल्य – रु. १००/-