पिंडाला शिवलाय कावळा..
“माझी काळी आई मला द्यायची नाही मला इकायची नाय, मला इकायची नाय” असं जीवाचा आक्रोश करत सखाराम ओरडून ओरडून सांगत होता, हाता पाया पडत होता पण निगरगट अधिकारी मात्र त्याचे ऐकायला तयार नाही, चारी बाजूने शेतात पोलीस तैनात करण्यात आले होते, जसं मयताच्या चारी बाजूने नातेवाईक, मित्र परिवार असतात अगदी तसं, इतर वेळेस जमीन इकायची किंवा खरेदी करायची असल्यास तालुक्याच्या गावी तहसील ऑफिसला जावं लागत होते, पण सखाराम जमीन द्यायला तयार नव्हता बाकी शेतकऱ्यांनी काहींनी मनाने तर काहींनी त्यांच्या मनाविरुद्ध जमिनी सरकारला खरेदी करून दिल्या होत्या, त्यामुळे आज तहसील ऑफिस सखारामच्या शेतात शेती खरेदी करायला आले होते. सखारामची सही घ्यायला आले होते, महामार्गाचे कामही सुरू झाले होते तरीही सखाराम त्याची काळी आई द्यायला अजिबात तयार नव्हता, अख्ख आयुष्य सखारामने जमीन कसली होती त्याचा जीव त्या काळ्या मातीत गुंतला होता. जमीन म्हणजे त्याचं काळीज होतं, घरही त्याचे तिथेच शेतात होते, वय वर्षे सत्तर झाले होते पण सखाराम अजिबात थकलेला नव्हता ज्या घरात आयुष्य काढलं ते घरही जमीनदोस्त आता होणार होतं, कधी कधी निर्जीव वस्तूतही माणसाचा खूप जीव पडतो व तुटता तुटत नाही तसं सखारामचं झाले होते. त्याला पैशाचा मोह अजिबातच नव्हता, त्याला हवी होती फक्त त्याची काळी आई आणि त्याच्या कष्टाने बांधलेलं कौलारू घर.
अधिकाऱ्यांनी दबाव आणला, सखारामला सही करण्यास सांगण्यात आले सखाराम अक्षरशः त्याच्या पाया पडला पण त्यांना दया माया असणार ते अधिकारी कसले! सखाराम पाया पडत होता, अधिकारी मागे सरकत होता, चार पोलीस पुढे आले पेपर सखारामच्या समोर ठेवले गेले, सखारामने अंगठा पुढे केला, बोटाला शाही लावली आणि अंगठा स्टॅम्प पेपर वर ठेवला, बारीक-बारीक असणाऱ्या बोटावरील रेषा कागदावर अलगद उमटल्या गेल्या, त्या रेषा ज्योतिषाला कधी दिसल्याच नाही पण आज त्याच रेषा कागदाला दिसल्या आणि सखारामची काळी आई त्याच्यापासून कायमची तुटली गेली, ज्या बोटाला शाही लावून मतदान केले, सरकार निवडुन दिले त्याच सरकारने त्याच्याच अंगठ्याला आज शाही लावून त्याचीच काळी आई हिसकावून घेतली. जगाच्या मालकाचे सात बारा , खाते उताऱ्यावरून नाव कायमचं कमी झालं होतं, सात बारा कोरा झाला होता, काळ जणू त्याचा वैरी झाला होता, त्याच्या मुक्या भावनांचा जाळ झाला होता, त्याचं काळीज चरकन चिरलं गेलं, डोळ्यातनं अश्रू पेरू लागला. सिन्नर चे कवी जालिंदर डावरे लिहितात,
उभं काळीज चिरलं
घेई समृद्धी वावर
गेला पेरीत आसवं
कळ उठली तोवर.
कमी जमीन असल्याने सखाराम भूमीहिन झाला, त्याच दिवशी त्याच्या खात्यावर सरकारी रक्कमही जमा झाली होती, खरी संपत्ती गेली होती खोटी संपत्ती बँकेत आली होती. पण सरकारी विकास सखारामचा दुष्मन झाला होता, एक महिन्याच्या आत त्याला घरही खाली करण्यास सांगितले गेले आणि सर्व फौज फाटा पोलीस तहसील कर्मचारी निघून गेले, जाताना मात्र ज्या अधिकाऱ्याच्या सखाराम पाया पडत होता त्याचे डोळे मात्र पाणवले गेले काही न बोलता तोही तसाच निघून गेला कदाचित तो एखाद्या शेतकऱ्याचाच मुलगा असावा पण तरीही त्याचे कर्तव्य त्याला पार पाडावयास लागले अगदी कठोर होऊन, वितभर पोट भरण्यासाठी नोकरी करावी लागते आणि नोकरी करताना स्वतःच्या मनाविरुद्ध अनेक कामे करावी लागतात, ज्या काळ्या आईतून आला त्याच काळ्या आईचा व्यवहार त्या शेतकऱ्यांच्या मुलांना अधिकारी झाल्यावर करावा लागतो, मनावर दगड ठेऊन काम करावं लागतं, वर्दीत असताना मनाची दर्दी मात्र गुंडाळून ठेवावी लागते. आयुष्यभर काम करून सखारामचे हात आज रिते झाले होते नांदगावच्या कवयित्री प्रतिभा खैरनार त्यांच्या आभाळ कवितेत लिहितात,
ओढतोय जन्मभर
बाप जीवनाचा रथ
सारे पेरून आयुष्य
त्याचे रिते रिते हात.
जमीन गेल्याची व पैसे खात्यावर आल्याची बातमी शहरात राहणाऱ्या सखारामच्या मुलांना मुलींना वाऱ्यासारखी पोहोचली सखाराम आजारी असताना सुट्टी नाही अशी कारणे देणारे मुले मात्र आता न बोलविता गावी आली घर नातवंडांनी मुलाबाळांनी भरून गेले सगळीकडे आनंदी आनंद होता, सखाराम मात्र शांत होता, अगदी अंधारात बसलेल्या पक्षांसारखा, तो शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसला होता, त्याच्या काळ्या आईकडे, मलमा टाकलेल्या विहिरीकडे बघत होता, दावणीला बांधलेले बैल बघत होता, शेतात सोडलेल्या शेळ्यांचा आवाज घेत होता आणि बघत होता उन्हात चमचमणारे कौलारी घर आता हे सर्व वैभव जाणार होते पैसा होता पण आता जमीन कुठे भेटणार? घर कुठे बांधणार? हा प्रश्न आ वासून सखाराम पुढे उभा होता.
सखाराम घरात आला थोडी कुजबूज त्याला ऐकू आली त्याने विचारले, काय झाले? पोरही शांत मुलगी शांत भाऊबहिनीतच बाचाबाची झाली होती अर्धे अर्धे पैसे वाटून घ्यायचे बोलत होते, भाऊ काही तयार नव्हता, मग भाऊ सखारामला बोलला दादा आपल्या जमिनीचे पैसे आले आहे त्यात अर्धे हिला पाहिजे होते सखाराम कावरा बावरा, झाला सखारामला दुसरीकडे जमीन घेऊन शेती करायची होती नवीन घर बांधायचे होते आणि घरात तर पैसे वाटून घेण्याची भाषा सुरू झाली होती, सखारामने दोघांनाही स्पष्ट सांगितले एकालाही एक दमडीही मिळणार नाही, मी दुसरीकडे कुठे मिळेल तिकडे शेती घेणार आहे तितक्यात मुलगा बाबाला बोलला, बाबा आता तुमचे वय झाले आता तुम्हाला शेतात काम होणार नाही आणि मी नोकरी सोडून शेती करायला येणार नाही मग कशाला हवीय जमीन?
दुसरीकडे जमीन घ्यायची नाही हे ऐकून सखारामला तवर आली, सखाराम शांत घरात असलेल्या मेडीला पाठ लावून बसला, दोघांमध्ये विस्तव पडला सखाराम काळजी करू लागला आठ दिवस निघून गेले, मुलगी तिच्या घरी निघून गेली, महामार्गाने देशाचा विकास होणार होता पण इथे या घराचा विकास कायमचा खुंटला गेला होता, नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला, सखाराम काळजी करून करून सुकू लागला, एक महिन्याची मुदत संपली, घर जमीन खाली करायला अधिकारी आले, सखारामने घरातील सामान काही बाहेर काढले नव्हते मग त्या कर्मचाऱ्यांनीच सर्व सामान घराच्या बाहेर काढून ठेवले, संसार उघड्यावर मांडला, जेसीबी बोलवले जेसीबीचा पंजा घरावर टाकला गेला घर कोसळले भिंती पडू लागल्या तितक्यात सखारामने हंबरडा फोडला सखाराम जागीच कोसळला जोराचा घाम आला एक उलटी झाली आणि सखारामची प्राणज्योत तिथेच माळवली, सखाराम चा निरोप मुलगा व मुलीला गेला दोघेही आले दोघेही धुमसून धुमसून रडले पण एकमेकांबरोबर काहीच बोलले नाही, सखारामला मुलाने शेवटचे पाणी दिले, शेजारी भावाचं घर होते दहा दिवस सर्वजण तिथेच राहिले, अस्ती नदीत नेऊन टाकल्या.
दहावा दिवस उगवला न्हावी नदीवर आले ब्राह्मण आले भाऊबंध खांदेकरी सर्व आले सर्व विधी सुरळीत पार पडला तीन पिंड केले तीन पिंडाचे निशाण बनवले बापाला आवडणारे खाद्यपदार्थ म्हणजे बाजारात मिळणारी भेळ डोंगरची काळी मैना करवंद जांभूळ दुधी भोपळा तिथे ठेवले पिंड ओट्यावर नेऊन ठेवले, सर्वांनी दर्शन घेतले, बाजूला झाले हात जोडून उभे राहिले, पाच सहा कावळे जवळ असलेल्या झाडावर आले एक कावळा पिंडाच्या बाजूला आला आणि न शिवताच परत निघून गेला बाकीचे कावळे झाडावरून उडून गेले बराच वेळ झाला कावळा काही पिंडाला शिवेना, मुलगा पाया पडला मुलगी पाया पडली पुन्हा एकदा हात जोडले पण तरीही कावळा यायचा परत निघून जायचा, शिवत नाही मग एक जाणकार माणूस आला त्या सखारामच्या मुलाला मुलीला बोलला त्या पैशाची तुम्ही जमीन घ्या किंवा घेऊ नका तुमची वाटणी करा किंवा करू नका ते तुमच्या तुम्ही ठरवा पण आज तुम्ही दोघं एकमेकांवर बोला तसा शब्द सखारामला द्या मग मुलगीच पुढे आली हातात पाणी घेतले आणि बोलली बाबा मी आजपासून दादा बरोबर बोलणार आहे कधीही बोलायची बंद होणार नाही आणि जमिनीचे आलेल्या पैशाची दुसरी जमीन घेऊन देईल त्यात दादाला घर बांधायला सांगेल, बाबा ती काळी आई गेली त्या बदल्यात दुसरी काळी आई दादाला मी घेऊन देईल हा माझा शब्द आहे एवढं बोलून हातातले पाणी सोडले दादाला घट्ट मिठी मारली, काळ्या आईला पुन्हा दिलेला शब्द ऐकून पिंडाला कावळा शिवला.
वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ
अध्यक्ष, वृक्षमित्र फाऊंडेशन व
वृक्षमित्र साहित्य परिषद,सिन्नर
(७०२०३०३७३८)