गाव खेड्याच्या मातीचे हंबरणे म्हणजे – हंबरवाटा
नुकताच कवी संतोष आळंजकर यांचा हंबरवाटा नावाचा कवितासंग्रह वाचनात आला. गावखेड्यातील मातीशी जीवनाशी जोडलेली नाळ, या मातीशी ग्रामीण जीवनाचे संदर्भ असलेला हा कविता संग्रह. या कविता संग्रहाला पाहताच या शब्दाचा अर्थ जाणून घेतला पाहिजे म्हणून खूप विचार केला.. आपल्या चुकलेल्या वासरासाठी गाय जशी हंबरते तसे हे ग्रामीण जीवन त्यांच्या मुलभूत प्रश्नासाठी हंबरते आहे. हंबरवाटा हा काव्यसंग्रह वाचत असतांना जणू मातीचे हंबरणे ऐकतो की काय असा भास होतो. ग्रामीण गावखेड्याच्या मातीत या हंबरवाटा हरवल्याचा भास होतो.
मराठवाडा पिढ्यानपिढ्या दुष्काळाला सामोरे जाणारा प्रदेश.. पिण्याच्या पाण्याचे सतत दुर्भिक्ष असलेल्या या भागात केवळ पावसाच्या पाण्यावर होईल तेवढी शेती केली जाते. अनेक भागात पाणी नसल्याने या भागातील बहुतांश लोकं उन्हाळ्यात बाहेरगावी रोजीरोटीसाठी भटकंती करीत असतात. पोटभर पावसाचे स्वप्न नेहमीच बघावे लागते, कधी तरी मुबलक पाऊस पडेल आणि सगळीकडे आबादानी होईल असे दिवा स्वप्न नेहमीच बघत असतात म्हणून कवी संतोष आळंजकर आपल्या ‘पिढ्यानपिढ्या’ कवितेत म्हणतात की “साल दरसाल,डोळ्यात भरून येतय आभाळ, साल दरसाल पडतय आम्हाला पोटभर पावसाचं स्वप्न”. अत्यंत विदारक असलेली परिस्थिती यातून दिसून येते.
पूर्वी गावोगावी नदीवर पाणवठे असायचे, नदी आटली तरी पाणवठे तग धरून असायचे या पाणवठ्यावर गुरे वासरे आपली तहान भागवत . पण हल्ली बारमाही वाहणाऱ्या नद्यांवर मोठ मोठे बंधारे बांधले त्यामुळे पाणी अडवले गेले.. पाणवठे कोरडे पडले. आता फक्त पाणवठ्यांच्या पाउलखुणा उरल्या आहेत. हे पाणवठे पुन्हा भरून येण्यासाठी कवी विठ्ठलाकडे आजर्व करत आहे.. ते आपल्या ‘पाणोठ्याच्या पाउलखुणा’ कवितेत म्हणतात की- “किती युगे सरली , डोंगरवाटा चढत उतरत, ही व्याकूळ वासरे हंबरताहेत तुझ्या ओढीने. बा विठ्ठला, नित्ळू दे हंबर फुटू दे पान्हा , तहानलेल्या वासरांसाठी अखंड ओल्या राहू दे पाणोठ्याच्या पाउलखुणा.
टीचभर पोटाची खळगी भरायला कधीकाळी गाव सोडावे लागते, पण हेच गाव सोडून गेल्यावर या गावाशी, तेथील मातीशी जोडलेली नाळ समाजमनाला गहिवरून टाकते. ज्या मातीला अंगाखाद्यावर घेतले, त्यामातीचा वास कुठेही गेलो तरी जात नाही. म्हणून कवी संतोष आळंजकर आपल्या ‘दिवेलागणीचा शहाडा’ कवितेत म्हणतात की “गाव सोडल्यापासून एकाकी झाल्यासारखं वाटतंय. वाटत जगायचं राहूनच गेलंय.”
नोकरीनिमित्ताने शहराकडे गेलेल्या प्रत्येकाला गावाची ओढ असते, गावमातीत हरवलेले दिवस आठवले की मन सुन्न होत. शहरात जीवनाचा उबग आल्यासारखे वाटते ही वास्तवता नाकारता येणार नाही. शहरात शांतता नाही, त्यामुळे शांत झोप येत नाही जीव तरसून जातो. गाव सोडून सुखाची झोप लागावी म्हणून सुखाच्या शोधात शहराकडे जाऊनही गावाकडची सुखाची झोप येत नाही, या कोलाहलाला कंटाळून जातो म्हणून कवी ‘जीव तरसून जातो’ या कवितेत म्हणतात की “या गजबजलेल्या शहरात मध्यान्ह रात्रीनंतरही ऐकू येतो ढोलताशांचा अन डीजे-डॉल्बीचा जीवघेणा आवाज, तेव्हा सुटत जातो संयम वाढत जाते चिडचिड जीव तरसून जातो घटकाभर झोपेसाठी.”
हंबरवाटा या कविता संग्रहातील कविता माणसाला जगायला आणि जगवायला शिकवतात. ग्रामीण समाजमनाचा आरसा घेऊन आलेल्या कविता विचार करायला लावतात. या संग्रहात एकूण ८४ कविता असून सर्व कविता गावखेड्यातील मातीशी नाळ जोडणाऱ्या आहेत. या संग्रहाला नुकताच नाशिक जिल्ह्यातील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार सरदार जाधव यांनी आपल्या कल्पकतेने मुखपृष्ठ सजवले असून श्रीरामपूर जि अहमदनगर येथील शब्दालय प्रकाशन या संस्थेने ही कलाकृती प्रकाशित केली आहे. या कलाकृतीला वाचकांनी भरभरून दाद दिली आहे. कवी संतोष आळंजकर यांना पुढील साहित्य कलाकृती निर्मितीसाठी खूप खूप शुभेच्छा.
परीक्षक – प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृतीचा परिचय
* कलाकृतीचे नाव – हंबरवाटा
* कवी -संतोष आळंजकर
* प्रकाशक- शब्दालय प्रकाशन
* मुखपृष्ठ – सरदार जाधव