साहित्य आणि संस्कृतीचा परिपाक असणारी कलाकृती – चैतन्याचा जागर
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील लेखक व अभियंता राजेंद्र घावटे यांची १ मे रोजी राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कारात प्रथम क्रमांक मिळालेली ललित लेख संग्रह प्रकारातील “चैतन्याचा जागर” ही साहित्य कलाकृती पाहण्यात आली.. कलाकृतीचे मुखपृष्ठ पाहून क्षणभर धार्मिक विचारात गढून गेलो. अतिशय अर्थपूर्ण असलेले हे मुखपृष्ठ “साहित्य आणि संस्कृतीचा परिपाक असल्याचे जाणवले”., या मुखपृष्ठावर एक उलटा आणि एक सरळ नगारा ठेवला आहे आणि त्याचा शेजारी त्याची पडछाया दाखवली आहे , नगारा वाजवण्यासाठी त्यावर दोन गोल गोळे लावलेल्या काठ्या ठेवल्या आहेत, शेजारी मोरपीस आहे, तर नगाऱ्याच्यावर दोन भगव्या पताका फडकत आहेत तर एका बाजूने उद्गारवाचक चिन्ह आहे तर दुसऱ्या बाजूने स्वल्पविराम दिला आहे, अशा प्रकारचे मुखपृष्ठ असलेली साहित्य कलाकृती शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कारात प्रथम क्रमांकाने निवडली जाते, असे काय आहे या कलाकृतीत याचा आपण मुखपृष्ठावरून अंदाज घेऊ शकतो. या कलाकृतीचे नाव आहे “चैतन्याचा जागर”
या कलाकृतीकडे बारकाईने पाहिले तर यातून लेखकाच्या कलागुणांचा, कदाचित लेखकाने अनुभवलेल्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्य आणि लोककला संकृतीचा काही अंशी परिपाक झालेला दिसून येतो. एखादी साहित्य कलाकृती निर्मिती करायची असेल तर त्यासाठी त्या कलाकृतीच्या निर्मितीमागच्या संदर्भात आत घुसून जावे लागते, तेव्हा त्या कलाकृतीला आशय, विषय, भावना, अर्थ निर्माण होत असतो. लेखक राजेंद्र घावटे यांच्या या कलाकृती निर्मितीमागच्या भावना या मुखपृष्ठावर प्रकट झाल्या असल्याचे मला जाणवले आहे.
नगारा वाजविण्याला एक पौराणिक, ऐतिहासिक वारसा आहे, पूर्वी युद्ध सुरु होण्याआधी सैन्याला इशारा म्हणून नगारा वाजवला जायचा, कधी आनंदोत्सव तर कधी देवदैवतांची आराधना करतांना नगारा, ढोल वाजवला जायचा, पुराणात महादेवाचे तांडव नृत्याच्या वेळी हा नगारा वाजवला जात होता, म्हणजेच याची नृत्यकलेशी सांस्कृतिक जवळीक दिसून येते. मात्र येथे लेखकाने हा नगारा/ढोल साहित्याची आराधना करण्यासाठी वाजवला आहे असा अर्थ मला भावला आहे. यातून चैतन्य निर्माण होऊन नवचेतना जागृत होते. या नगाऱ्याच्या स्पंदनाने नवचैतन्य येते, हे चैतन्य आपल्या कलेला नेहमी स्पंदनाने जागृत ठेवते म्हणून या नगा-यावर दोन गोल गोळे असलेल्या काठ्या दाखवल्या आहेत ज्या नवचैतन्यासाठी सतत जागृत राहण्यासाठी ठोके मारत असतात हा चैतन्याचा जागर आहे हा अर्थ मला येथे भावला आहे आणि म्हणूनच या ठोक्यांच्या स्पंदनाचे तरंग उठावेत तसे या नगाऱ्याचे स्पंदन पडछायाच्या रुपात “चैतन्याचा जागर” या मुखपृष्ठावर दाखवले आहे.
“चैतन्याचा जागर” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर दोन भगव्या पताका दाखवल्या आहेत याचा अर्थ साहित्यिक /कलावंत असो वा वारकरी हा सेवेकरी असतो. जसा वारकरी भक्तीची पताका खांद्यावर घेऊन नियमित वैष्णवांच्या मेळाव्यात वारीला जात असतो तसा कलावंत, साहित्यिक हा साहित्याची पताका खांद्यावर घेऊन साहित्यनगरीत मुशाफिरी करीत असतो. साहित्यिक आपल्या साहित्यातून, तर कलावंत आपल्या सांस्कृतिक लोक कलेतून समाज प्रबोधन करीत असतो. एका अर्थाने समाजाची सेवाच करत असतो. जसा वारकरी भक्तीचा भुकेला असतो तसा कलाउपासक हा कौतुकाचा भुकेला असतो. अशा एका वैश्विक अर्थाने ही पताका मुखपृष्ठावर साकारली असावी असे मला वाटते.
“चैतन्याचा जागर” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर मोरपीस दाखवला आहे, हा मोरपीस एका अर्थाने सुंदरतेचा अर्थ तर सांगतोच मात्र हळूवार स्पर्शाची अनुभूतीदेखील देत असतो. प्रत्येक साहित्य असो वा कला ही मोरपिसासारखी हळूवार स्पर्शाने जपली पाहिजे. थोडक्यात काय तर कला , साहित्य जीवापाड जपले पाहिजे ते मानवी जीवनाचा आधार असते. त्यातूनच माणूस घडत असतो म्हणून ते जपले पाहिजे हा अर्थ मला यातून अभिप्रेत होतो.
“चैतन्याचा जागर” या ललितलेख संग्रह कलाकृतीचे लेखक राजेंद्र घावटे यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतलेली असून यांच्या अभिनव कल्पकतेतून मुखपृष्ठचित्रकार संतोष घोंगडे यांनी मुखपृष्ठाला आपल्या कुंचल्यातून एका वैश्विक अर्थाला गवसणी घालून सजवले आहे. या कलाकृतीला पिंपरी चिंचवड संवेदना प्रकाशन यांनी प्रकाशित करून साहित्य विश्वात चैतन्य आणले आहे. या कलाकृतीचे लेखक राजेंद्र घावटे यांना पुढील कलाकृती निर्मितीसाठी हार्दिक शुभेच्छा
मुखपृष्ठ परिक्षक
– प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
* कलाकृतीचा परिचय
* कलाकृतीचे नाव – “चैतन्याचा जागर”
* लेखक – राजेंद्र घावटे, पिंपरी चिंचवड, पुणे
* साहित्य प्रकार – ललित लेखसंग्रह,
* मुखपृष्ठचित्रकार – संतोष घोंगडे
* प्रकाशक – संवेदना प्रकाशन, पिंपरी चिंचवड, पुणे