साहित्य कलाकृती पुरस्काराच्या अध्यक्षपदी प्रा. शशिकांत शिंदे
गौरव प्रकाशन कोल्हार (प्रतिनिधी) : शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शिर्डी येथे होणाऱ्या शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय तिसऱ्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदी कोल्हार (ता.राहाता)या ग्रामीण भागातील ख्यातनाम कवी प्रा. शशिकांत शिंदे यांची निवड झाली आहे. चार जूनला होणाऱ्या या कार्यक्रमात शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या पुरस्कार प्राप्त सर्व कलाकृतींचा सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी दिली.
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल (ता. येवला) आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून ४७ कविता संग्रह,१७ कथा संग्रह ५ कादंबरी आणि ललित ११ लेखसंग्रह अशा एकूण ८० विविध प्रकारच्या साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी प्राप्त झाल्या होत्या. या कलाकृतीतून प्रत्येक साहित्य प्रकारातील एक कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे नियोजन केले असून त्याही स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण चार विविध साहित्य प्रकारातील कलाकृतींचा व काव्यलेखन स्पर्धेत निवड केलेल्या कवींचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे
प्रा. शिंदे यांची या आधी अनेक ठिकाणी निमंत्रित कवी म्हणून निवड झालेली आहे तसेच त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात पद्मश्री विखे पाटील नवोदित साहित्यिक प्रकाशन पूर्व पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवार्ड ऑफ दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली, कुसुमाग्रज काव्य पुरस्कार असे नामांकित विविध पुरस्कार प्रा. शिंदे यांना मिळालेले आहेत. त्यांच्या साहित्य कलाकृतीची दखल घेऊन शिर्डीत होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रा. शिंदे यांची अध्यक्षस्थानी वर्णी लागली असून त्याबद्दल शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.