Yugpurush Mahatma Basveshwar: युगपुरुष महात्मा बसवेश्वर
आपल्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला संत परंपरेचा वारसा लाभलेला आहे. भारत भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. भारतीय समाजातील अनिष्ट रूढी , परंपरा यांना आव्हान देण्याचे काम या संतांनी केले. या संत परंपरेतील एक संत म्हणजे महात्मा बसवेश्वर होय. बाराव्या शतकातील एक महान मानवतावादी ,समतावादी संदेश देणारे संत म्हणून महात्मा बसवेश्वर यांना ओळखले जाते. बसवेश्वर यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर बागेवाडी या गावी झाला. त्यांच्या वडिलाचे नाव मादरस तर आईचे नाव मादलांबा होते. महात्मा बसवेश्वरांचे वडील विज्ञानाचे अभ्यासक होते. त्यांचे वडील श्रीमंत होते. पण डोळ्यासमोरील समाजातील गरिबी त्यांना पाहवत नव्हती म्हणून त्यांनी समाजातील दारिद्र्य ,अंधश्रद्धा ,स्त्रियांवरील बंधने ,आर्थिक विषमता याच्या विरोधात पाऊल उचलले.
बसवेश्वरांच्या घरीच अनेकदा अंधश्रद्धा ,कर्मकांड यावर आधारित धार्मिक कार्यक्रम होत असत. पण त्यांचा दैवापेक्षा कर्मावर जास्त विश्वास होता. म्हणून त्यांनी समाज परिवर्तनाची सुरुवात ही स्वतःच्या घरापासून केली. स्त्री-पुरुषांमध्ये भेदभाव करणारे रितीरिवाज त्यांना मान्य नव्हते. महात्मा बसवेश्वर वीरशैव संप्रदायाशी संबंधित होते. त्यामुळे अनेक संस्कार हे त्यांच्यावर घरीच घडले. वडिलांचे कार्य समोर नेण्यासाठी मुलांवर उपनयन संस्कार करून त्यांच्यावर जबाबदारी देण्याची प्रथा त्यावेळी होती. पण बसवेश्वरांनी आपली मोठी बहीण नागम्माचा उपनयन विधी करून तिच्यावर जबाबदारी द्यावी असा आग्रह धरून महिला सक्षमीकरणाचा व महिलांना स्वातंत्र्य देण्याचा पहिला प्रयत्न केला. त्यावेळी असे ब्राह्मण परंपरेला आव्हान देणे सोपे काम नव्हते. पण बसवेश्वरांनी हे आव्हान हिमतीने पेलले. बसवेश्वरांनी कमी काळात ज्ञानसाधना करून विषमता, कर्मकांड, अंधश्रद्धेचा विरोध आणि समानतेचा पुरस्कार करत विविध जाती धर्मातील स्त्री पुरुष, दलित ,शोषित यांना एकत्र आणून समाज क्रांतीचे रणशिंग फुंकले. ही एक महान क्रांतीच ठरली.
बसवेश्वरांनी त्याकाळी पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही समान अधिकार मिळावे म्हणून प्रयत्न केलेत. महिलांना प्रतिनिधित्व मिळाल्याने त्यांच्या धर्म कार्याला सामर्थ्य प्राप्त झाले. त्याकाळी बालविवाहाचे समर्थन व विधवा विवाह विवाहाला विरोध होता. पण बसवेश्वरांनी बालविवाह रोखले. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिली. तसेच आंतरजातीय विवाहाला मान्यता देऊन स्त्री स्वतंत्र्याला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त करून दिले. त्यांच्या पत्नी राणी गंगाबिका देवी यांनीही त्यांच्या कार्यात समर्थ साथ दिली. त्यांच्या पत्नीने बहुजन स्त्रियांसाठी उद्योग केंद्र, महिलांमध्ये सुशिक्षित पणा वाढावा म्हणून साक्षरता केंद्रे सुरू केली. दलितप्रेम हे बसवेश्वरांचे जीवनाचे अविभाज्य अंग होते. बुरसटलेल्या विचारामुळे लोक दगडी नागाला दूध पाजतात तर जिवंत नागाला मारून टाकतात. भुकेल्या व्यक्तीस हाकलुन लावतात तर दगडाच्या देवाला पंचपक्वान्न भरवतात, ही मूर्खता बसवेश्वरांना आवडत नव्हती. देवासमोर पशु बळी देण्यासाठी बसवेश्वरांनी विरोध केला.
महाराष्ट्रात बसवेश्वरांनी आपल्या कार्याची सुरुवात मंगळवेढा येथून सुरू केली. त्यांनी जैन ,बौद्ध, इस्लाम इत्यादी सारख्या अनेक धर्माचा अभ्यास केला. त्यातून त्यांनी एक विचार समोर आणला की जोपर्यंत प्रत्येक धर्मात स्त्रियांचा आदर ,भेद-भेदाला मुठमाती ,स्त्री अत्याचाराचे निर्मूलन या गोष्टीचे उच्चाटन होणार नाही तोपर्यंत माणूस माणसाच्या जवळ येणार नाही. तो सुखी व समृद्ध होऊ शकणार नाही. म्हणजेच माणुसकीची पूर्ण दृष्टी असलेले महापुरुष म्हणून बसवेश्वर अग्रगण्य होते. माणसाची योग्यता ही त्याच्या जातीवरून नव्हे तर गुणवत्तेवर ठरते याचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला. आणि समाज व धर्मामध्ये समानता घडविण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले.
बसवेश्वरांच्या काळातही भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जात होते. अधिकाधिक लोक शेतीवर अवलंबून होते. त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालायचा. उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत म्हणून शेतीकडेच पाहिले जायचे. पण त्याकाळी अनेक राजे महाराजे ,सत्ताधीश, सरदार ,जहागीरदार यांनी कृषी क्षेत्रावर आपली मक्तेदारी मिळविली होती. ही व्यक्ती कष्टकरी ,शेतकरी, शेतमजुरी यांचे शोषण करीत होती. कमी मोबदल्यात जास्त कामे करून घेत होती. त्यामुळे मजुरांना पाहिजे त्या प्रमाणात आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नव्हते. त्यातून नैराश्य, न्यूनगंडाची भावना तीव्र होऊ लागली. म्हणून बसवेश्वरांनी लोककल्याणकारी दृष्टिकोन स्वीकारून आपल्या कार्याची दिशा ठरविली. कुणीही उच्च-नीच श्रेष्ठ -कनिष्ठ ,गरीब -श्रीमंत हा भेदभाव करणार नाही, अशी समाज रचना करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. अशा प्रकारे सामाजिक, आर्थिक, राजकीय ,समतावादी, परिवर्तनवादी या सर्व बाबीवर काम करणारा संत म्हणून महात्मा बसवेश्वर यांना ओळखले जाते.
आज अक्षय तृतीयेच्या दिवशी संत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन !!!!!!
अविनाश अशोक गंजीवाले ( स.शि.)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजगाव
पं स. तिवसा जि. अमरावती