शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार जाहीर
गौरव प्रकाशन येवला (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय तिसऱ्या साहित्य कलाकृती पुरस्काराचे निकाल दि. ०१ मे २०२४ रोजी कामगार दिनाच्या दिवशी जाहीर झाले असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ, संपादक प्रशांत वाघ यांनी कळविले आहे.
शिवाबाबावाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल ता.येवला, जि नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातून कविता संग्रह- ४७ , कथा संग्रह-१७, कादंबरी -५ आणि ललित लेखसंग्रह- ११ अशा एकूण ८० विविध प्रकारच्या साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी प्राप्त झाल्या होत्या. या कलाकृतीतून प्रत्येक साहित्य प्रकारातील एक कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. कवितासंग्रहासाठी गंगापूर, जि. छ. संभाजीनगरचे कवी संतोष आळंजकर यांच्या “हंबरवाटा” , कथासंग्रहासाठी टेंभुर्णी, जि सोलापूर येथील हरिश्चंद्र पाटील यांच्या “ओवाळणी, आणि कादंबरीसाठी पुणे येथील लेखक देवा गोपीनाथ झिंजाड यांच्या “एक भाकर तीन चुली” आणि पिंपरी चिंचवडचे लेखक राजेंद्र घावटे यांच्या “चैतन्याचा जागर” या ललित लेख संग्रह या कलाकृतीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहे. सर्व कलाकृती पुरस्कार निवडीसाठी परिक्षक अनुक्रमे कवितासंग्रहासाठी प्रा. अमोल चिने, कोपरगाव, कथासंग्रहासाठी नाट्यकलावंत तथा सिनेकलावंत राम गायकवाड, कोपरगाव, कादंबरीसाठी प्राचार्य संदीप कांबळे, अहमदनगर तर ललित लेखसंग्रहासाठी ग्रामसेवाचे सहसंपादक राजेंद्र फंड, राहता यांनी परीक्षण केले. परिक्षकांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले आहे.
पुरस्कार प्राप्त सर्व कलाकृतींचा सन्मान दि. ४ जून २०२४ रोजी शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात होणार असल्याचे अध्यक्ष संजय वाघ यांनी कळविले आहे.