भेट : एका देव माणसाची
गोष्ट एका प्रवासातली.4-5 दिवसांपूर्वीची.वर्ध्याहून पुढे10 मैलांवर गाडी अचानक बंद पडली. भर दुपारी,रखरखत्या ऊन्हात.दुरुस्तीच्या प्रयासात 1तास गेला.नाही जमले.मग नागपूरहून दुसरी गाडी बोलावली.यात 3 तास गेले.कसे?
…. बाजूला एक शेत होतं.गेटवर वकिलाची पाटी.आत चौकीदार असावा.पाणी मागावं म्हणून आत गेलो.बनियन-पैजामा घातलेला एक गृहस्थ भेटला.त्याला विनवणी केली.बोलताना लक्षात आलं,तो मालकच होता.साधा-सरळ.मीही शेतकरीच.त्यामुळे बोलका झाला तो.त्यानं आपल्या शानदार कुटीत नेलं.झुल्यावर बसवलं.दरम्यान माझी मिसेस वर्षा व मुलगाही आला.थंडगार पाणी मिळालं.जीव तृप्त झाले!
हे कुटुंबच इथं शेती- मातीत राहणारं..राबणारं.त्यानं आपली जीवनयात्रा सांगितली.दरम्यान बाईनं चहा आणला.तीही सुस्वभावी.म्हणाली,घरच्याच गायीच्या दुधाचा.तो बोलत राहिला.मन मोकळं करत राहिला.मग शेतातीलच पपई खायला दिली.वाटलं-आपण कोण, कुठले?पण काही परकेपण नाही.आम्ही जणू पाहुणपणच भोगलं ! तिथल्या चिंचा, कढिपत्ताही सोबत मिळाला.या भल्या माणसाची दोन्ही मुलं नोकरीत.पण इथंच राहतात जंगलात गुण्यागोविंदानं, सुनाबाळांसोबत.
गाडी आली तेव्हा निरोप घेताना का कुणास ठाऊक, तो म्हणाला,आम्ही ब्राह्मण.मी म्हणालो, तुम्ही ब्राह्मण नाही,॓माणूस॑ आहात.कर्माची पुजा करणारा..जातिधर्माच्या व कर्मकांडाच्या पलीकडला.देवमाणूस! आम्ही गाडीत बसलो तेव्हा त्याच्या डोळ्यांत आनंद तरळून आला होता.मी तो हळव्या हृदयानं वाचला.वाटलं,अजूनही माणूसपण जपणारी चांगली माणसं आहेत जगात.निसर्गाच्या व सोज्वळ माणसांच्या सहवासात 3 तास कसे गेले कळलेच नाही.वाळवंटातल्या मुक्कामाचं नंदनवन झालं होतं!अशी माणसंच आपलं जगणं समृद्ध करतात ना?
निघालो तेव्हा रस्त्यानं माझीच कविता आठवली –
मंदिर मंदिर फिरलो नाही स्वर्गासाठी
देवमाणसांसवे काढला जन्म सुखाने..!
…देवमाणसं याहून वेगळी काय असतात ?
– बबन सराडकर
अमरावती