ज्ञानाचा तेजस्वी सूर्य ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर
—————————————-
भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये आपल्या नेत्रदिपक कार्यकर्तुत्वामुळे ज्या विद्वानाचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेले व संपूर्ण विश्वामध्ये ज्यांचे स्थान अग्रस्थानी आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल रोजी संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आपल्या प्रखर वाणी व धारदार लेखणीतून ज्यांनी बहुजनांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळावा, प्रत्येकाला त्याचे मूलभूत अधिकार मिळावे, यासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी खर्ची घातले त्या ज्ञान सूर्याचा आज जन्मदिवस.
भारतीय संविधानाची निर्मिती करून या देशातील लोकांच्या जीवनात असलेल्या अंधाराला प्रकाशाकडे नेण्याचे कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. ज्या महान व्यक्तीने आयुष्यभर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून जनसामान्यांचे जीवन कसे प्रकाशमय होतील याकरिता प्रयत्न केले. भारतातील सर्व स्त्रियांवर आंबेडकरांचे फार उपकार आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी केवळ मागासवर्गीय स्त्रियांसाठीच कार्य केले असे नाही ,तर भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीला समता ,स्वतंत्र बहाल केले. आंबेडकरांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन उदार आणि मानवतावादी होता. स्त्रियांना सुद्धा आर्थिक स्वातंत्र मिळाले पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी पुरस्कार केला. ते म्हणायचे जोपर्यंत स्त्रियांना संपत्तीत वारसा हक्क मिळत नाही, तोपर्यंत गुलामगिरी संपणार नाही. त्यांनी स्त्रियांच्या आरोग्यासाठी सुद्धा अनेक उपाययोजना करून दिल्या, जसे सरकारी नोकरीतील स्त्रियांना प्रसूती रजा हे त्याचे उदाहरण होय. स्त्री व पुरुष ही संसाररूपी रथाची दोन चाके आहेत. त्यामधील एक चाक जर मागे राहिले तर संसाराचा रथ हा व्यवस्थित चालू शकणार नाही म्हणून पुरुषांबरोबर स्त्रियांनाही जागृत झाले पाहिजे अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती. स्त्रिया सुद्धा स्वकर्तृत्वावर सत्ताधिकारी बनू शकते. देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये आपला सहभाग नोंदवू शकते. यासाठी आंबेडकरांनी राजकीय आरक्षणाची तरतूद केली.
डॉक्टर आंबेडकर हे भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सर्वप्रथम घटना परिषदेमध्ये आपण दलित ,शोषित, पीडित, आदिवासी जनतेच्या हक्कासाठी गेलो पाहिजे. अशी भूमिका डॉ. आंबेडकरांची होती. घटना परिषदेमध्ये डॉ. आंबेडकरांचा प्रवेश होऊच नये यासाठी विरोधकांकडून आटोकाट प्रयत्न केल्या गेले. तरीसुद्धा पश्चिम बंगालमधील जोगेंद्र मंडल यांच्या सहकार्यामुळे ते घटना समितीवर निवडून आले. त्यानंतर भारताच्या राज्यघटना निर्मितीची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. आणि ते मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून गेले.
धर्म ही बाब आपल्या देशामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. याची त्यांना जाणीव होती. यासाठीच त्यांनी राज्यघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मपालनाचा, आपल्या देव देवतांवर विश्वास ठेवण्याचा, त्यांचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार राखून ठेवला. प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य दिल्या गेले. फक्त हे स्वातंत्र्य कायदा व सुव्यवस्था ,नीतिमत्ता आणि स्वास्थ यांच्या संदर्भात केलेल्या कल्पनांशी सुसंगत असावे अशी त्यांची धारणा होती. संविधानानुसार भारतीय नागरिकांना सात प्रकारचे मूलभूत हक्क दिले गेले. त्यामध्ये भाषण करणे, विचार व्यक्त करण्याचे स्वतंत्र, संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, शांततापूर्व एकत्र येण्याचे स्वतंत्र्य ,भारतात कोठेही संचार करण्याचे स्वतंत्र ,व्यापार करण्याचे स्वातंत्र्य, संपत्ती मिळवण्याचे स्वातंत्र्य अशा अनेक प्रकारचे स्वातंत्र्य दिल्या गेले.
भारतीय संविधानाने भारतातील सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानले. देशातील प्रत्येक व्यक्तीला आपला सभ्य आणि सुरक्षित जीवन जगता यावा यासाठी संविधानात काही मार्गदर्शक तत्वांचा सुद्धा समावेश करण्यात आला. त्यामध्ये आर्थिक, सामाजिक व राजकीय मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला. भारतामध्ये जर खऱ्या अर्थाने सामाजिक, आर्थिक ,राजकीय न्याय व समता प्रस्थापित करायची असेल तर या मार्गदर्शक तत्वांचा काटेकोरपणे वापर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे डॉ आंबेडकर म्हणायचे. याचा उल्लेख ही त्यांनी राज्यघटनेमध्ये कटाक्षाने केलेला आढळून येतो.
भारत हा मोठा असा खंडप्राय देश आहे. या देशातील प्रत्येकाला माणूसपण देण्याचे काम संविधानाने दिले आहे. आज स्वातंत्र्यानंतर एवढी वर्षे लोटल्यानंतरही भारताची एकता, अखंडता अबाधित असून जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला यशस्वी देश म्हणून भारताकडे पाहिला जाते. याचे सर्व श्रेय डॉ आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला जाते. डॉ. आंबेडकर एक महान लेखक, पत्रकार, संपादक असे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व होते. समाजातील अनिष्ट रूढींना वाचा फोडण्यासाठी त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यासारखे पाक्षिक सुरू केले, यामधून ते आपले विचार समाजासमोर मांडू लागले. महाडचा चवदार पाण्याचा सत्याग्रह म्हणजे डॉ. आंबेडकरांनी सामान्य माणसाला दिलेली जीवनातील सर्वात मोठी नवसंजीवनी होती. डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील अनेक घटनांमधून त्यांच्यातील राष्ट्रवादी नेता आणि महान असा विचारवंत आपणास पहावयास मिळतो. आंबेडकरांचा सामाजिक समतेचा व खऱ्या स्वातंत्र्याचा लढा आयुष्याच्या शेवटपर्यंत चालूच होता. देशातील प्रत्येक माणूस खऱ्या अर्थाने सुखी व्हावा यासाठी ते प्रत्येक चळवळीमध्ये सहभागी होत होते. आपल्या कोट्यावधी अनुयायांना सामाजिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी एक ध्येयवेडा महापुरुष नेहमीच झगडत होता. आजही जेव्हा अन्न, वस्त्र ,निवारा या भौतिक गरजा पूर्ण होत नाहीत. चांगले शिक्षण, रोजगार, आरोग्य मिळत नाही. त्यावेळेस डॉ. आंबेडकरांचे दूरदृष्टी असलेले विचार किती महत्त्वाचे होते याची जाणीव होते. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अशा या महान नेत्यास कोटी कोटी प्रणाम !
– अविनाश अशोक गंजीवाले
(सहा शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजगाव
पं.स.तिवसा जि. अमरावती