एका ‘विशाल’ कवीचा करुण अंत..
आज सकाळी झोपेतून उठताच फोन हाती घेतला. आणि कविमित्र विजय दळवीनी पाठवलेला मेसेज पाहताना काळजात धस्स झालं.. “डॉ. विशाल इंगोले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.” वाचताना डोकं सुन्न झालं.
विशाल इंगोले आणि मी.. आम्हा दोघांची जन्मगावं वेगळी असली तरी त्याचे आणि माझे वडील लोणार (सरोवर) या जगप्रसिध्द खाऱ्या पाण्याच्या सरोवरासाठी प्रसिद्ध असलेल्या गावी नोकरीला होते. माझे वडील येथील सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलवर इंग्रजी विषयाचे माध्यमिक शिक्षक ; तर विशालचे वडील लोणारच्या पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन.
आमच्या दोघांचीही घडण याच मातीत झाली. त्यामुळेच की काय आम्ही दोघेही कवी – चित्रकार झालोत.
आमची शिक्षणं वेगवेगळ्या शाळा – कॉलेजांत झाली. पुढे तो उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करत राहिला. आणि जिथे जिथे विशाल इंगोले नावाचा हा प्रतिभावंत वास्तव्यास राहिला तिथे तिथे त्याने जिव्हाळ्याचा गोतावळा जमवला.
विविध वृत्तपत्रांतून प्रकाशीत त्याच्या कविता मी वाचायचो. त्यात त्याच्या नावापुढे सोसवी असा उल्लेख असे. त्याचा उलगडा मला अद्याप झालेला नाही. काही कविमित्रांकडून डॉ. विशाल इंगोले हा कवी लोणारचाच आहॆ, असं ऐकायला मिळालं. म्हणून एकदा त्याला कॉल करून विचारलं तर तो म्हणाला,
“माझं गाव किन्ही. लोणारपासून पाचेक किलोमिटर असेल. बाबा पोस्टात असतात. त्यामुळं आम्ही लोणारलाच राहतो.”
विशाल माझ्यापेक्षा वयाने 4 – 5 वर्षं मोठा, म्हणून मी त्याला दादा म्हणायचो.
नंतर जिल्हा साहित्य संमेलनांसारख्या साहित्यिक कार्यक्रमांतून आम्ही भेटत राहिलो. तोही आपुलकीने बोलायचा. अनेक कवीसंमेलनांना सोबतच गेलो.
माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला तो आला होता.
पुढे काही दिवसांनी त्याचा ‘माझ्या हयातीचा दाखला’ हा कवितासंग्रह प्रकाशीत झाला. त्यातील कविता आशयसंपृक्त आहेत. या कवितासंग्रहाला अनेक सन्मानांनी गौरविण्यात आलं आहॆ. याच संग्रहातील ‘अतिक्रमण’ ही कविता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बी.ए. भाग १ च्या Sem.1 ला अभ्यासाला आहॆ. विशालदादाची ही कविता मी विद्यार्थ्यांना अनेकदा शिकवली आहॆ.
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळात सदस्य म्हणून त्याची निवड होणं हा त्याच्या प्रतिभेचा सर्वोच्च सन्मान होता. त्याच्या सन्मानार्थ लोणार वासियांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मी हजर होतो.
विशालदादा जसा उत्तम कवी होता तसाच तो एक उत्तम चित्रकारही होता. तो सुंदर रेखाटनं आणि लँडस्केप्स करत असे. सुलेखनही अप्रतिम करीत असे. त्याने नव्याने केलेलं चित्र तो मला अभिप्रायार्थ पाठवत असे.
व्हाट्सअपला नियमीत त्याचे मेसेजेस असत. त्यात बहुतांश त्याच्या कवितांचा आणि चित्रांचा समावेश असे. मध्यंतरी अनेक दिवस त्याचे मेसेज येणं बंद झालं होतं. नंतर तो आजारी असल्याचं समजलं. त्याच्या पत्नीनं विशालदादा आजारी असून त्याच्या उपचारासाठी मदतीचं आवाहन केलं होतं.
नंतर बऱ्याच दिवसांनी त्याचा एक मेसेज आला. आणि अगदी परवा परवाच फेसबुकला त्याची पत्नी सुवर्णा वहिनींच्या वाढदिवसाची त्यानं बनवलेली कलात्मक बॅनर्स पाहून विशाल दादाची तब्येत पूर्वपदावर येतेय असं वाटलं.
6 एप्रिलला मी एका मित्राच्या लग्नासाठी लोणारला गेलो होतो. घरून निघताना विशाल दादाला कॉल केला. तो त्याने उचलला नाही.
तो काही कामात असेल म्हणून पुन्हा कॉल केला नाही .. आणि आज सकाळीच कविमित्र विजय दळवी कडून तो गेल्याची बातमी समजली !
मनात जुन्या आठवणी उचंबळून आल्या..
एका ‘विशाल’ प्रतिभेच्या कवी आणि कलावंतांचा करुण अंत झाला…..
प्रशांतकुमार डोंगरदिवे,
चिखली, जि. बुलडाणा