“स्री जाणीवेचा हुंकार असलेला कवितासंग्रह – माझ्या शब्दांच्या गर्भात”
मानवाची उत्पत्ती ही आईच्या गर्भातून होत असते. ही एक नैसर्गिक निर्मिती आहे. ही निर्मिती घडून येण्यासाठी स्रीला आपल्या गर्भात नऊ महिने हाडामासाचा गोळा सांभाळावा लागतो. त्यानंतर अपत्य जन्माला येत असते. या प्रक्रियेत स्रीचा पुनर्जन्म होत असतो. मानव जन्माला त्यामुळे अनन्यसाधारण महत्व आहे.
साहित्य क्षेत्रातही अशीच प्रक्रिया पहावयास मिळते. कोणतीही साहित्यकृती निर्मिती करावयाची असल्यास त्या साहित्याला आधी साहित्यिकाने आपल्या मनाच्या गर्भात रुजवावे लागते. समाजमनाच्या वातावरणात पोषक असे विचारांचे खत पाणी घालून त्या साहित्याला तावूनसुलाखून घ्यावे लागते. त्यांनतर ती साहित्यकृती निर्मिती होत असते. कोणत्याही साहित्यिकाला आपली पहिली निर्मिती ही परमोच्च आनंद देणारी असते. जसं घरात लग्नानंतर पहिले अपत्य जन्माला येते आणि त्याचा आनंद पूर्ण परिवाराला होतो तसेच साहित्य निर्मितीतील पहिली कलाकृती ही त्या साहित्यिकाचे पहिले अपत्य असते आणि त्यामुळेच त्याचा आंनद काही वेगळाच असतो. अशीच एक साहित्य कलाकृती नुकतीच वाचनात आली. आणि तिच्या निर्मितीच्या शोधात जावे लागले.
कवयित्री सौ. सविता दरेकर यांची “माझ्या शब्दांच्या गर्भात” ही काव्यसंग्रहाची पहिलीच निर्मिती आहे. या काव्यसंग्रहाचे खास वेगळे असे स्वतःचे स्थान आहे. कवयित्री नवोदित असल्याने त्यांनी आपल्या काव्यसंग्रहाला एक वेगळेपणा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. “माझ्या शब्दांच्या गर्भात” या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ हे या कलाकृतीचे खास आकर्षण आहे. ज्या प्रमाणे विश्वाची निर्मिती ही पृथ्वीच्या गर्भातून होते तशीच या काव्यसंग्रहाची निर्मिती शब्दांच्या गर्भातून झालेली दिसून येते. या मुखपृष्ठाची निर्मिती अतिशय कल्पकतेने केलेली आहे. आईच्या गर्भात जसे बाळ वाढत जाते तसे कवितेतील शब्द या विश्वाच्या गर्भातून जन्म घेत असल्याचे दाखवले आहे. आणि ते शब्द एक एक गर्भातून बाहेर येत आहेत. नवनिर्मिती घेत आहेत. आणि हे नवनिर्मितीसाठी बाहेर पडणारे शब्द चढाओढीने कागदावर येत आहे. जणू काही आईच्या गर्भातूनच हे शब्द मुलासारखे जन्म घेत आहेत असे दाखवले आहे. कविता किंवा साहित्य निर्मिती अशीच जन्म घेत असते. शब्दाशब्दातून जन्म घेणाऱ्या या कविता नवनिर्मितीचा परमोच्च आनंद देतात.
माझ्या शब्दांच्या गर्भात या काव्यसंग्रहात एकूण ८० कवितांचा समावेश केला आहे. विविध विषयाला गवसणी घालून कवयित्रीने आपल्या मनाला व्यस्त ठेवून शब्दांना भुरळ घातली आहे. शब्दांच्या गर्भात या शीर्षक कवितेने या काव्यसंग्रहाला सुरुवात करून कवयित्रीने मानवी मनाच्या स्री मनाच्या वेदनांना वाट करून दिली आहे. माणसाच्या मुखात गोडवा असावा, मनात राग लोभ नसावा, माणसाने माणसाला प्रेम द्यावे. पण माणसे तसे करत नाही . स्री वेदनांना समजून घेत नाही. स्रीने कितीही वेदना मांडल्या तरी त्या समजून घेत नाहीत. त्या फक्त कागदावरच राहतात अशी खंत त्यांनी आपल्या शब्दांच्या गर्भात या कवितेत व्यक्त केली आहे. त्या म्हणतात की-
“नको राग नको लोभ, मुखी पेरा शब्द धन. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, माणसाला माणसानं.”
“स्रीमनाच्या वेदनांनी, व्यथा कितीही मांडल्या. शब्दांच्याच गर्भातूनी, कथा कागदी सांडल्या.”
कवयित्री या समाजात वावरणाऱ्या आहेत. लहानपणापासून आईवडिलांच्या छत्रछायेखाली असल्याने सामाजिक सलोखा, रीतीरिवाज, सण समारंभाबद्दल त्यांना गोडी आहे. समाजात विविध सण उत्सव साजरे केले जातात त्यासणांचे महत्व कवयित्री सहज सांगतात. या सणातून प्रेमाचे , एकोप्याचे संदेश त्यांनी समाजाला दिले आहे. रक्षाबंधन या कवितेत त्यां म्हणतात – आयुष्यात जन्मभर, धागा गुंफतो बंधन. झाले मतभेद तरी, जोडते रक्षाबंधन. बहिण भावाच्या मतभेदाला सहज जोडायचे काम रक्षाबंधनाचा धागा करतो ही समजूतदारपणाची दृष्टी या ठिकाणी दिसून येते… तर दिवाळी या कवितेत मायबाप गणगोत, सारे भेटतात जेव्हा. घरोघरी दीपोत्सव , मनी प्रकाशतो तेव्हा. आई बाप हे सर्व सुखाचे आगार आहे. आणि बाप घरात नसतील तर घर स्मशानासारखे वाटते आणि ते घरी असतील तर घरात चैतन्य येते, मन प्रकाशमान होते.
कवयित्री शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतीची आवड आहे.निसर्गावर त्यांचे प्रेम आहे.निसर्गातील झाडे, वेली, शेती, पाखरे यांविषयी त्यांना आस्था आहे. निसर्गात त्यांचे मन रमून जाते. म्हणून त्या निसर्ग या कवितेत म्हणतात की – “निसर्गात रमलेले, मन माझे झाले वेडे. स्वप्नातील प्रीतफुले, कुणा कसे सांगू गडे”. या निसर्गाने वेड लावले आहे. ते कुणाला सांगू असा प्रश्न कवयित्रीला पडला आहे. तर प्राजक्त या कवितेत त्या म्हणतात – “वेड लावती जीवाला, प्राजक्ताची ही फुले. शुभ्र केसरी रंगानी, प्रीत पाकळीही खुले”. या निसर्गाची हिरवाई देखील कवयित्रीला साद घालत आहे. निसर्गातील फुले मनाला मोहित करतात. म्हणून त्या हिरवाई या कवितेत म्हणतात की- जाईजुई रातराणी, लाल गुलाबी फुले. मोह घालती मनाला, झेंडू निशिगंध डुले.”
कवयित्री या देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या आहेत. पांडुरंगाप्रती त्यांच्या मनात अपार श्रद्धा आहे. त्या इतरांविषयी परमेश्वराकडे नेहमी मागणे मागतात की, हे परमेश्वरा , सर्वाना सुखी राहू दे, सर्वांच्या देहात तुझाच वास आहे. तूच या देहात राहतो . परमेश्वराचे गुणगान गाऊन त्याच्या प्रती भाव प्रकट करतांना त्या येरे पांडुरंग या कवितेत म्हणतात की,
किती सांगू तुझी, गोड गुण गाथा. निराधार जना, आहे तूच नाथा.
सुखी राहो सर्व, आहे मनी ध्यास. देहांत नांदतो, तुझाच रे वास.
तर आईबापा विषयी प्रेम व्यक्त करताना पंढरीच्या पांडुरंगाला मायापित्याला पाहण्यासाठी जरा वेळ उभे राहण्याची विनंती कवयित्री करीत आहे. माझे मायबाप हे काशीच्या भगवंताच्या बरोबरीचे आहे. त्यांना पाहण्यासाठी उभा राहा अशी आर्त साद घालत आहे. म्हणून भक्त पुंडलीक या कवितेत त्या म्हणतात कि, “जरा थांब विठ्ठला, विटेवरी उभा रहा. मायबाप माझ्यासाठी, आहे काशीचे रे पहा”.
पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होऊन जातात. हा भक्तीचा पूर पाहून मन प्रसन्न होते. म्हणून कवयित्री वारकरी या कवितेत म्हणतात की, “पूर दिंडीत भक्तांचा, भजनात सारे दंग. वारी सोहळा प्रसन्न, नाम गजर चढे रंग”.
कवयित्री सौ. दरेकर या हळव्या आहेत, भावनाशील आहेत. समाजातील स्री विषयी त्यांच्या मनात आस्था आहे. सामाजिक जाणीव त्यांच्यात दिसून येते. स्रीमनाच्या वेदनांनी त्या व्यथित होतात. जीवनात स्रीवर्गाला होणारी छळणूक पाहून त्या हळव्या होतात. स्रीला दुःख हे जन्मासोबतच येते, आणि हा स्री जन्म म्हणजे तारेवरची कसरत आहे. हे कर्माचे भोग स्रीला छळतात. म्हणून त्या अंतरीच्या वेदना प्रकट करताना म्हणतात की,
“दुःख संघर्षाचे असे, जन्मा येती संगतीला. कसरत तारेवरची, भोग छळती नारीला.”
या छळातून स्रीने मुक्तता करून घेतली पाहिजे. स्रीने परंपरेतून आलेल्या वर्चस्वाला झुगारून लढा दिला पाहिजे. पुढे येणाऱ्या पिढीला ज्ञानी केले पाहिजे. म्हणून कवयित्रीचे मन गुलामी झुगारून देवू पाहत आहे. म्हणून त्या म्हणतात की, तोड गुलामीच्या बेड्या, मोड अज्ञानाच्या रूढी. घालू नको खतपाणी, आता घडो ज्ञानी पिढी. अन्यायाला वाचा फोड, न्यायासाठी दारे खोल. सळसळ वाहे रक्त, नाती जगी झाली फोल.
या कवितासंग्रहातील कुणब्याची लेकरे, हरवलेला झोका, मुखवटा, माहेर, अजूनही मी तरुणच, मनी काहूर दाटले, स्वार्थ, परकी, प्रतिकार, उंबरठा, प्रहार या कविता वाचतांना वेगळीच अनुभूती येते. कवितेच्या प्रांतात कवयित्री नवीनच असल्याने नवखेपणाच्या पाऊलखुणा दिसून येतात. लहान बाळाचे पावले जसे अडखळत पडतात तसे शब्द अडखळत कागदावर पावलांचे ठसे उमटवत जातात . आजचे हे अडखळणे म्हणजे उद्याची भरधाव वेगाने जाणारी एखादी धावपटू होईल यात तिळमात्र शंका नाही. या संग्रहातील सर्वच कविता वाचकाला विचार करायला लावणाऱ्या आहेत. समाजातील स्री वेदना, निसर्ग संवर्धन, आई वडिलांविषयी असलेली आत्मीयता, देवावरची श्रद्धा, मानवसंवर्धन, अशा विविध पैलूंनी हा काव्यसंग्रह नटला आहे.
या काव्यसंग्रहाच्या मलपृष्ठावर कवयित्री सौ. दरेकर यांनी आपलं आयुष्याकडे बघण्याचे दोन शब्द मांडले आहे. हे सामाजिक जीवनात वावरणाऱ्या तमाम मानव वर्गाला एक वेगळा संदेश देतात. त्या म्हणतात की, आयुष्यात स्वप्न तर सारेच बघतात, पण ते पूर्ण करायला किती जण धावतात. अनेक माणसं बालपणीच स्वप्न पाहतात. काही स्वप्न पूर्ण होतात, तर काही अर्ध्यातच वाट सोडून देतात. त्यामुळे मनातली खंत आणि डोळयातले भाव क्षितीज आपली वाट पाहत आहे म्हणून खुणावत असतात. मग जेव्हा शब्दांच्या गर्भात घेऊन जातात ती अर्धवट स्वप्न. शब्दांच्या जोरावर निराशा सोडून चांगलं करण्याची उमेद बाळगून सुंदर जीवन जगणे हेच तर माणूसपणाच लक्षण आहे. त्यासाठी चाल पुढे तू चाल आणि चालत रहा शेवटपर्यंत न थांबता.
“माझ्या शब्दांच्या गर्भात” या पहिल्याच काव्यसंग्रहासाठी नाशिकच्या प्रसिद्ध लेखिका तथा कवयित्री सौ. स्वाती पाचपांडे यांनी प्रस्तावना देवून स्वागत केले आहे. या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे “इथं शब्दांना सत्याचा स्पर्श होतो” या ब्रीदवाक्याने आज महाराष्ट्रातील अनेक लेखक कवींच्या नवनिर्मितीवर मोहोर पडली जाते त्या मा. सुरेश पवार यांच्या गिरणादूत प्रकाशन, नाशिक या प्रकाशन संस्थेने ही कलाकृती वाचकांच्या स्वाधीन केली आहे. या काव्यसंग्रहाच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम प्रशिध्द मुखपृष्ठकार विशाल देशमुख यांनी केले आहे अत्यंत कल्पकतेने या मुखपृष्टावर भाव उतरविले आहे. या संग्रहातील शब्दांना मूर्त रूप देण्याचे महत्त कार्य एम.एस. ग्राफिक्स यांनी केले तर हिऱ्यांना पैलू पाडून कोंदणात बसवावे तसे कुलश्री प्रिंटर्स यांनी शब्दांना पैलू पाडून या कलाकृतीत बसवले आहे.
सौ. दरेकर यांना पुढील दर्जेदार लिखाणासाठी शुभेच्छा देतो.
परीक्षण
प्रशांत एस वाघ
संपर्क – ७७७३९२५०००