विजुभाऊ ची EXIT
आज दिनांक सहा एप्रिल 2024 ला व्हाट्सअप वरील मेसेज पाहत असताना आठवणीतील करजगाव ग्रुप वर विजुभाऊ चा फोटो व भावपूर्ण श्रद्धांजली चा मेसेज वाचला डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. अत्यंत दुर्दैवी दिवस होता आजचा. विजुभाऊ च्या दुःखद निधनाच्या बातमीनं मी हळहळलो.
जवळपास 69 सदस्यांच्या आठवणीतील करजगाव हा आपला ग्रुप पण फारच कमी सदस्य मेसेज, चर्चा च्या माध्यमातून सक्रिय आहेत. त्यापैकीच एक विजू भाऊ होते. 28 एप्रिल पर्यंतचा असा एक सुद्धा दिवस नसेल ज्या दिवशी त्यांचे मेसेज आले नसतील. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक आणि मनोरंजनात्मक अशा सर्वच विषयावरील त्यांचे मेसेज यायचे. त्यांच्या मेसेजला वेळ काळाचे बंधन नव्हते सकाळ दुपार सायंकाळ रात्री कधीही. शिवाय इतरांचे चांगले सुविचार संदेश कविता लेख यांना ते प्रोत्साहन सुद्धा द्यायचे. ग्रुपच्या स्थापनेपासून ग्रुप जिवंत ठेवणारे ते जेष्ठ सदस्य होते. त्यांच्या जाण्यान ग्रुप मध्ये एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या ग्रुप मध्ये कितीही सदस्य असले तरी विजुभाऊ ची कमी पूर्ण होऊ शकत नाही.
करजगाव बद्दलचं विजुभाऊच विलक्षण प्रेम होतं. गावची बातमी, लेख, कविता, माहिती, फोटो, आणि व्हिडिओ यांना ते भरभरून प्रतिसाद द्यायचे. तसेच गावच्या विकासासाठी काहीतरी करावं अशी त्यांची तळमळ होती. म्हणून मंदिरासाठी वर्गणी असो, वाचनालयाला मदत असो, एखाद्या गरजवंताला मदत असो, विजुभाऊ नेहमीच तत्पर असायचे. दोन वर्षांपूर्वी करजगाव वासीयासाठी आम्ही तीन वर्तमानपत्र लावून दिले होते. त्यापैकी एका वर्तमानपत्राची वर्गणी त्यांनी वर्षभर भरली होती. गोरख राठोड या मानसिक रुग्णाच्या वैद्यकीय उपचारासाठी सुद्धा त्यांनी दोन हजार रुपयाची मदत माझ्याकडे पाठविली.( ते आजही माझ्याकडे जमा आहे.) गावच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारं विजुभाऊ एक आदर्श व्यक्तिमत्व होतं. विजुभाऊ च सामाजिक कार्य त्यांचं कर्तृत्व त्यांचं दातृत्व या सर्व गोष्टी अविस्मरणीय आहेत. त्यांचं जाणं कायम दुःख देऊन गेलं.
जाने वाले कभी ना आते जाने वाले की याद आती है! असं दिलं एक मंदिर या चित्रपटात गित होतं. विजुभाऊ ची आठवण म्हणजेच जीवनातील अनमोल अशी साठवण आहे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे असा आदर्श विजुभाऊंनी मागे ठेवला. ईश्वर त्यांच्या पवित्रा आत्म्यास शांती देवो तसेच त्यांच्या आप्तांना हे दुःख पचविण्याचं सामर्थ्य देवो.
– प्रा.रमेश वरघट
करजगाव ता. दारव्हा जि. यवतमाळ