” पहिली बेटी घी की रोटी अन् पहिला बेटा भिकार चोट्या” असं म्हणतात तर ज्या मुलीला आपण तुपाची भाकर म्हणतो तिला तेवढ्या प्रेमाने, आपुलकीने वाढवतो त्याच मुलीला मोठं झाल्यावर तिचं कन्यादान करायचं? कन्यादान म्हणजे ज्या मुलीला आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलो. तिला काही झालं तर डोळ्याला डोळा लागत नसे मग ती मोठं झाल्यानंतर तिला कोणाला तरी दान करायचं?
हा निसर्गाचा जगावेगळा खेळ आहे. स्वतःपेक्षा जास्ती जीव लावतो, आनंदाने प्रेमाने वाढवतो आपल्या काळजाचा तुकडा तिला करतो मग तिलाच का जावं लागतं सासरी? मुलापेक्षा मुलीला आईवडिलांची जास्ती काळजी असते. घरी पाहुणे आले अन् मुलाला म्हंटलं जा! दुध घेऊन ये तेव्हा मुलगा गलासात पैसे टाकून पाहुण्यांसमोर वाजवत जातो. अन् त्याच जागी मुलगी असेल तर ती आपल्या आईवडिलांची इज्जत जाऊ नये म्हणून ओढणीत झाकून ग्लास घेऊन जाते.
अहो! इज्जत धुळीवर आणणारा मुलगा श्रेष्ठ की, आपल्या आईवडिलांची इज्जत जाऊ नये म्हणणारी मुलगी श्रेष्ठ? तरीही मुलगी दान करायची रीत आहे. मुलगा हा वंशाचा दिवा आहे पण त्या दिव्यात तेवणारी वातच नसेल तर काय उपयोग त्या दिव्याचा. प्रत्येक गोष्टीत मुलीला दुय्यम स्थान दिलं जायचं ; पण आता तसं नाही कारण तिच्यातली देखील स्त्रीशक्ती आता जागी झाली आहे. ती कधी कोणत्या काळी दुर्गेचे रूप धारण करेल सांगता येत नाही.
लहापणापासूनच आईवडिलांना सांभाळायला दिलेली ठेव असते मुलगी.पण ती इतकं जीव लावते की,तिला निरोप देणे खूप अवघड जातं काही वर्ष आईवडिलांच्या घरी तर बाकीचं आयुष्य सासरी. मुलीच्या आयुष्यात कायम संकटाला का तोंड का द्यावं लागतं? तीही आनंदाने आपलं जीवन जगू शकते. तिच्यात देखील स्वाभिमान आहे.ती देखील अभिमानाने आपलं नाव सांगू शकते,मग तरीही मुलीलाच दान करावं लागतं.
तिची इच्छा असेल तरीही तिचं लग्न करायचं आणि इच्छ्या नसेल तरीही. सर्वात जास्ती दुःख हे मुलीच्याचं पाठीमागे असतं. जेव्हा मुलगा मोठा होतो त्याच्या संसारात गुंततो तेव्हा मात्र आईवडिलांना त्यांच्या मुलीची आठवण येते.ते लगेच म्हणतात की, ” माझी चिमणी राहायली असती तर मला कोणाचीच गरज पडली नसती”. आधीच म्हणतात लेक माहेराचं लेनं लेक सौख्याचं दान.शिखर्यावराचा कळस तर अंगणातली तुळस असते लेक. मुलगी अशी कोणती वस्तू नाही की, आलं मनात अन् केलं दान.तिला देखील काही भावना असतात. तिची देखील मर्जी असते.पण एक खरं मान खाली घालून नाहीतर ताठमानाने जगते ती म्हणजे बापाची व सर्वांची लाडकी लेक असते.
वंशाला दिवा हवा आहे म्हणून सर्वांना मुलगा हवाहवासा वाटतो.मग जर वंश पुढे चालवायचं असेल तर वंशाला जन्म देणारी पंती तर आपल्याला महत्त्वाची असते.तिचे ते मऊ – मऊ पाऊलं पडताच घर सगळं उसळून जातं.रान सगळं बहरून जातं तिच्या येण्याची चाहूल म्हणजे आनंदाची चाहूल लागते.आणि तिच्या जाण्याची चाहूल लागते तेव्हा मात्र आयुष्य दुःखी होऊन जातं तरीही इतक्या लाडाने वाढवलेल्या कन्येला दान तर करावचं लागतं ना!
- कु:स्नेहा शिवाजी जाधव