तुकाराम बीजच्या निमित्ताने
आज फाल्गून वद्य द्वितीया,संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या दिवशी सदेह वैकुंठाला गेले म्हणून हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून साजरा केला जातो.आपल्या महाराष्ट्रात देहूक्षेत्री अत्यंत भक्तीभावाने हा दिवस वारकरी मंडळी साजरा करत असतात.
देहू येथे ज्या ठिकाणाहून तुकाराम महाराजांनी वैकुठगमन केले तेथील नांदुरकी नावाच्या वृक्षाची पाने त्या वेळी हलत असतात असे आजही समजल्या जाते नव्हे त्याची ग्वाहीही विद्वान मंडळी देतात.
तुकाराम महारांजांची जीवनी वाचतांना त्यांनी भगवद्भक्तीबरोबरच समाजसुधारणेच्या अनुषंगाने आपली परखड मते मांडलेली होती.
मुखे सांगे ब्रह्मज्ञान।जन लोकांची कापतो मान।
ज्ञान सागतो जनांसी।नाही अनुभव आपणाशी।
कथा करतो देवाची।अंतरी आशा बहुमोलाची।
तुका म्हणे तोचि वेडा।त्याचे हाणुनी थोबाड फोडा।
ह्या व अशाच अभंगातून-ओव्यातून त्याची प्रचिती येते.असे नावडते प्रहार त्यावेळच्या कर्मठांना पटणे शक्य नव्हते त्यामुळे महाराजांना आपल्या अभंगाची गाथा इंद्रायणी नदीत बुडवावी लागली.ती बुडविण्यात ह्या कर्मठ प्रवृत्तीचाच हात होता हा इतिहास सर्वश्रुत आहे.
परंतु महाराजांचे अभंगरुपी प्रबोधन हे लोकांच्या हृदयाला भिडत असल्यामुळे ते अनेक लोकांच्या मुखोदगत होऊन अमर झालेले आहे.
जगाच्या इतिहासात मानवजन्म घेऊन सदेह वैकुंठाला गेल्याचे उदाहरण ऐकिवात नाही.राम,श्रीकृष्ण ह्या देवावतारी देहांनाही सदेह वैकुंठी जाणे प्राप्त झाले नाही.
आपल्या भारतात श्रद्धा-अंधश्रद्धा यावर विश्वास ठेवणारी मंडळी अनादिकालापासून आहे.खोटे बोल पण रेटून बोल आणि मग हे खोटेच सत्य कसे आहे ही पटवून देणाऱ्या अंधभक्तांची जमात अनादिकालापासून अस्तित्वात आहे असे सांप्रत काळावरुन तरी वाटते; वारंवारच्या प्रहाराने त्यात मग श्रद्धाळू लोकही गुंतत जातात व काय खरे काय खोटे या संभ्रमात जगत असतात.मानवी मेंदूवर केलेल्या प्रक्रिया अनंतकाल मग त्या देहावर राज्य करीत असतात.
-आबासाहेब कडू,
अमरावती
.