शिक्षक अन कर्तव्य… 

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
शिक्षक अन कर्तव्य… 
       बाजारातल्या कोपऱ्यात बसून उम्या आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता.कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान वर केली.
“अरे ही चप्पल शिवायची आहे”
     समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली.
“तुम्ही चोरगे सर ना?”
त्याने विचारलं.
“हो.तू?”
      “मी उम्या, उमेश कदम.कल्याणी शाळेत दहावी अ च्या वर्गात होतो बघा.तुम्ही आम्हांला इंग्रजी  शिकवायचे.”
      “बरोबर.पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये” चोरगे  सर त्याला निरखत म्हणाले.
      “असू द्या सर.मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन”
“पण तू हा व्यवसाय का…..?”
       “सर हा आमचा पिढीजात व्यवसाय!आजोबा,वडील दोघंही हेच करायचे.दहावी सुटलो.तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये.त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन वर्षे हेच करतोय.”
“काय झालं वडिलांना?
       “सतत दारु पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय.त्यामुळे ते नेहमी आजारीच असतात”
“ओह!आणि तुझे भाऊ?”
“दोन भाऊ आणि एक बहीण तिघंही लहान आहेत.शिकताहेत.आई अशिक्षित.”
      “अच्छा” सर विचारात गढून गेले.गजूनं त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतांनाही त्याच्या हातात दहा रुपये कोंबून निघून गेले.
      काही दिवसांनी ते परत आले.उम्याला म्हणाले “अरे माझ्या मापाचा एक बुट तयार करुन देशील?”
       उम्या तयार झाला.त्याने माप घेऊन दोन दिवसात तयार बुट करुन दिला.सरांना तो आवडला.त्यांनी उम्याला नाही म्हणत असतानाही पाचशे रुपये दिले.उम्याला खुप आनंद झाला.इतके पैसे त्याला आजपर्यंत मिळाले नव्हते.
       आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बुट बनवण्यासाठी ग्राहक येऊ लागले.सगळे चोरगे सरांनी पाठवलंय असं सांगायचे.
        काही दिवसांनी सर आले.उम्या त्यांना ग्राहक पाठविल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला.त्यांनी त्याला थांबवलं. म्हणाले “तुझ्या हातात कला आहे.तू असं का करत नाहीस इथंच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साईजचे डझनभर चपलाबुट ठेवले तर गिर्हाईकांना थांबावं लागणार नाही”
       ” सर कल्पना चांगली आहे पण त्याला दहा पंधरा हजार लागतील.तेवढे पैसे नाहीयेत माझ्याजवळ”
“हरकत नाही.मी देतो तुला.पण मला तू ते सहा महिन्यात परत करायचे.चालेल?”
        तो तयार झाला.आठवड्यातच तो बसायचा तिथं टपरी उभी राहीली.महिन्याभरातच उम्याचे पंधरा हजार वसूल होऊन दहा हजार नफाही हातात पडला. सर आल्यावर त्याने त्यांना पंधरा हजार दिले.त्यांनी ते त्याला परत केले.
      “मी तुला सहा महिन्यांची मुदत दिली होती.सहा महिन्यानंतरच मला परत कर.तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर.”
         उम्याचा आता उत्साह वाढला.त्याने जास्त माल ठेवायला सुरवात केली.उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खुप गर्दी व्हायला लागली.आता त्याला वेळ पुरेनासा झाला.
       सहा महिन्यांनी सर आले.उम्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता.
      “सर खुप चांगलं चाललंय.पण आता पुढं काय करायचं”
      “उम्या आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्याने घ्यायचं.तिथे हे सगळं शिफ्ट करायचं.मी पाहून ठेवलंय दुकान.अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे.आणि हो!स्माँल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ते तुला मिळवून देतो.एम.आय.डी.सी.मध्ये फँक्टरी टाकून दे”
      “काय?फँक्टरी?”उम्या  थरारला”सर मला जमेल का?”
        “सगळं जमेल.मी आहे ना”सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.
      उम्याने खाली वाकून त्यांचे पाय धरले.
“सर खुप करताय माझ्यासाठी”
       “अरे ते माझं कर्तव्यच आहे”त्याला उठवत ते म्हणाले”माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करताहेत.कोणी इथे मोठे अधिकारी आहेत.तूच एकटा मागे रहावा हे मला कसं पटावं?”उम्याच्या डोळ्यात पाणी आलं.
       दोन वर्षात उम्या खुप पुढे गेला.फँक्टरी वाढली.एकाची तीन दुकानं झाली.उम्याचा उमेश शेठ झाला.झोपडपट्टीतून तो थ्री बी.एच.के.फ्लँटमध्ये रहायला गेला.भाऊबहीणी चांगल्या शाळाकाँलेजमध्ये जाऊ लागले. एका वर्षाने त्याचं लग्न झालं.मुलगी पसंत करायला तो चोरगे  सरांनाच घेऊन गेला होता.
      इकडे चोरगे  सरांना निव्रुत्त होऊन पाच वर्षे झाली होती.सर आता थंकले होते.त्यांच्या मुलाने इंग्लंड मध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.मुलगी अगोदरच आँस्ट्रेलियात स्थायिक होती.त्यामुळे सर दुःखी होते.त्यात त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची.
        एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश उम्याला मिळाला.सर्व कामं सोडून तो त्यांच्या घरी धावला.सरांची मुलगा,मुलगी वेळेवर पोहचू शकले नाहीत.ते येण्या अगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला.पण उम्याने सरांना कोणतीच कमतरता तर जाणवू दिली नाहीच शिवाय तेराव्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही त्यानेच केला.
      सगळं आटोपल्यावर सरांच्या मुलाने त्यांना इंग्लंडला चलायचा खुप आग्रह केला पण सरांनी मायदेश सोडायला साफ नकार दिला.सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरु झालं ते उम्याला बघवत नव्हतं पण त्याचाही नाईलाज होता.
       एक दिवस बायकोला घेऊन तो सरांच्या घरी पोहचला.त्याला पाहून सरांना आश्चर्य वाटलं.
” सर तुमचे माझ्यावर खुप उपकार आहेत.आज मला अजून एक मदत कराल.?”
” अरे आता तुला मदतीची काय गरज?तू आता खुप मोठा झालाय.बरं ठिक आहे सांग तुला काय मदत हवी आहे?”
“सर माझे वडील व्हाल?”
सर स्तब्ध झाले.मग म्हणाले”अरे वेड्या मी तर तुला कधीचंच आपला मुलगा मानलंय”
     “तर मग मला मुलाचं कर्तव्य करु द्या.मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलोय.तुमचं उरलेलं आयुष्य तिथंच काढावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे”उम्या  हात जोडत म्हणाला.
“अरे पण तुझ्या बायकोला विचारलं का?”
“सर तिला विचारुनच मी हा निर्णय घेतलाय.तिलाही वडील नाहीयेत.तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही हवेच आहेत.शिवाय पुढे मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की!”
“बघ बुवा.म्हातारपण फार वाईट असतं.मी आजारी पडलो तर तुलाच सर्व करावं लागेल.
“मुलगा म्हंटलं की ते सगळं करणं आलंच.सर तो सारासार विचार करुनच मी आलोय”
       सर विचारात पडले.मग म्हणाले “ठीक आहे येतो मी पण माझी एक अट आहे.मला तू सर म्हणायचं नाही”
       “मी माझ्या वडीलांना अण्णा म्हणायचो तुम्हालाही तेच म्हणेन”
सर मोकळेपणाने हसले.
“अजून एक अट.तुझ्यासारखे अनेक जण आहेत ज्यांना मदतीची गरज आहे.त्यांना उमेशशेठ व्हायला मला मदत करायची”
उम्याला गहिवरुन आलं .त्यानं सरांना मिठी मारली.दोघंही बराच वेळपर्यंत रडत होते.
(संकलीत)