रंगात रंगले रंग सारे
Contents
hide
वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले नव्या पालविने
करी उधळण विविध रंगाची
व्हावी साजरी होळी आनंदाने
शिशिराचे दिवस संपले
न्हावून निघाले रंगात रंग सारे
ओसरला गारवा निसर्गाचा
मनी बहरले आपुलकीचे झरे
अंत झाला हा दृष्ट प्रवृत्तीचा
क्षण ते संपले अधपतनाचे
उधळले गुलाबी रंग सारे
रंगलेले क्षण हे धुळवडीचे
करू दहन ते नैराश्याचे
दारिद्र्य आणि आळसाचे
भरुयात नाविन्याने नात्यात
रंग प्रेमाचे आणि रंग स्नेहाचे
चैतन्याच्या या वाटेवरती
समृद्धीचे शिखर गाठावे
होळीच्या या रंगात रंगुनी
रंगपंचमीच्या सणात चिंब भिजावे
विसरले भेदभाव सारे आता
भिडे आकाशी होळीच्या ज्वाळा
पुरणपोळीच्या एका गोडव्याने
पडे बाहेर इर्षा व लाचारीच्या झळा
-बाबाजी हुले ,
नवी मुंबई