“संस्काराच्या सुगंधाची दरवळ…”मधुगंध” चारोळी संग्रह”
अमरावतीकर नवोदित कवयित्री “सौ.अंजली वारकरी” यांचा “मधुगंध” हा “पहिला मराठी चारोळी संग्रह” नुकताच वाचण्यात आला. महाविद्यालयीन शिक्षिका असलेल्या अंजली ताई यांच्या समृद्ध लेखणीतून अंकुरलेला मधुगंध चारोळी संग्रह साहित्य प्रांतात दरवळत आहे.
मधुगंध चारोळी संग्रह हा २४ डिसेंबर २०२३ ला “प्रथम आवृत्ती” रूपाने प्रकाशित झालेला आहे.या चारोळी संग्रहाला डॉ.मोना चिमोटे यांची आशयसंपन्न “प्रस्तावना” आहे. डॉ. मिना चिमोटे या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती इथे पदव्युत्तर मराठी विभागाच्या “विभाग प्रमुख” आहेत. अमरावती येथिल माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री प्रफुल्ल कचवे यांचे शब्दरूप आशीर्वाद या संग्रहाला लाभलेले आहे. संग्रहाच्या मलपृष्ठावर ऍड. नीता प्रफुल्ल कचवे यांनीही मोजक्या नि सुंदर शब्दांत पाठराखण केलेली आहे.
“मधुगंध” चारोळी संग्रहाचे वाचन केल्यावर असं लक्षात येतं की, अंजली ताई नवोदित असूनही संस्कारक्षम परिपक्व लेखिका आहेत.या संग्रहामध्ये अंतरंगात त्यांनी जवळपास २४ असे विभाग केलेले दिसून येते. त्या त्या विषयाला अनुसरून चारोळीचं लेखन केलेलं जाणवतं.उदा. यात काही नैसर्गिक घटक आहेत. जसं… निसर्ग, सूर्य, क्षितिज,शेती ,पाऊस इ. त्यांनी या विषयावर दमदार चारोळी लेखन केलेलं आहे. काही चारोळ्या खूप अशा संस्कारक्षम आशयाच्या प्रतिनिधित्व करतांना दिसतात. उदा.*”सकारात्मक आशावादाची”* ही चारोळी पहा…..
जीवनात सूर्योदय
वाटे प्रत्येकाच्या व्हावा
झोपडीत जोंधळ्यांना
क्षण सोनियाचा यावा
काही निसर्ग नियम व त्या अनुषंगाने वृत्तीत नि कृतीत होणारे बदल…याला अलगदपणे निसर्गाचा दाखला देऊन… या चारोळीतून कसे उलगडले आहे ते पहा….
वय बदलते हो माणसाचे
पाऊस मात्र बदलत नाही
वाढत्या वयाची परिपक्वता
पावसात कधीच येत नाही
आणखी जीवनाच्या तत्त्वज्ञानावर व्यक्त होणाऱ्या काही चारोळ्या पाहू.
दुःखातून सुखाच्या क्षणांचे, कण शोधता आले पाहिजे, पानावलेल्या पापण्यांतून, मोती टिपता आले पाहिजे
आणखी एक सुंदर अशी चारोळी पहा….
संकटे नेहमीच आल्या-
पावलांनी निघून जातात
जाताना मात्र जगण्याची
त-हा शिकवून जातात
आणखी काही सुंदर असे जीवनमर्म विशद करणाऱ्या आशयसंपन्न चारोळ्या आहेत. काही चारोळ्यांना मन अगदी प्रसन्न होऊन जातं. ही कर्म वादाचे महत्व विशद करणारी चारोळी पहा…
तळहातावरील रेषांना
घामाच्या धारांनी साथ हवी
कर्मानेच उजाडेल बघा
चैतन्याची सुप्रभात नवी
काही चारोळ्या मध्ये संस्कारक्षम असे सूत्र दिलेले आहेत. ही एक चारोळी पहा….
साथ दे मजला अशी की
सोबतीने सामर्थ्य यावे
अंकात शून्य मी अन् तू
माझ्या पुढील एक व्हावे
संग्रहाच्या शेवटी “दिनविशेष” यावर आधारित सुद्धा चारोळ्या आहेत. काही सामाजिक नि शैक्षणिक कार्यक्रमाच्या संचालनासाठी ह्या चारोळ्या खूप उपयोगी येईल असे वाटते. यात एक चारोळी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची आठवण करून देणारी आहे ती खूप आवडली… सुंदर आशय आहे पहा…
अरे संसार संसार
यात तडजोड फार
जोखिमिच्या ओझ्याखाली
होते भावनांची हार
या “मधुगंध” चारोळी संग्रहामध्ये एकूण१०७ पृष्ठे आहेत.आणि एकुण चोवीस विभागात १९४ चारोळ्या आहेत. शेवटी कवयित्रीचा परिचय दिलेला आहे. मानस पब्लिकेशन अमरावती यांनी खूप दर्जेदार असे हे पुस्तक निर्माण केलेले आहे. मुखपृष्ठावरील तीन फुलांची सुंदर डिझाईन आणि एक सुंदर सारगर्भित चारोळी दिलेली आहे ती अशी..
चारोळीत सामावतो
पूर्ण कवितेचा सार
म्हणूनच साहित्यात
तिला महत्त्व अपार
चारोळी संग्रहाचा दर्जा उत्तम आहे आतील चित्र फारचं बोलकी नि आशय प्रेरक आहेत. सौ.अंजलीताईंचा हा पहिलावहिला चारोळी संग्रह आहे. त्यांनी साहित्य क्षेत्रात सिद्धहस्त लेखिका म्हणून श्रीगणेशा केलेला आहे.चारोळी संग्रहाचा आशय नि संस्कार पाहता या लेखिकेचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असे वाटते. सकस, दर्जेदार लेखनीचा आग्रह प्रत्येक साहित्यिकांचा असावा… जेणेकरून साहित्य व समाज यांचं नातं टिकेल. नवोदित म्हणून.. या संग्रहात काही न्यूनतेची स्थळेही संभवतात. उदा. काही कठिण शब्दांचा वापर झालेला दिसतो. उदा. पान नं.६३ मध्ये एका चारोळीत..*”कौशकी”* असा शब्द येतो.
दूसरे म्हणजे… “चारोळी” या काव्यप्रकाराची एक मध्यवर्ती संकल्पना असते ती अशी की,पहिल्या दोन ओळींच्या स्पष्टीकरणार्थ खाली तिसरी व चौथी ओळ येत असते.. *म्हणजे आशयाचा एक गोटीबंदपणा,एक अंतर्गत लय यात बेमालूमपणे जपलेलेली असते… ही लय काही ठीकाणी सापडत नाही….
या चारोळी संग्रहाच्या निमित्ताने मी सौ. अंजलीताईंचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पद्य लेखनासह गद्य लेखनाच्याही भरभरून शुभेच्छा देतो. भविष्यात त्यांच्या हातून अनेक दर्जेदार असे पुस्तक निर्माण होतील आणि साहित्य क्षेत्रातल्या त्या खऱ्या वारकरी होतील …अशा अपेक्षेसह अंजली ताई वारकरी यांना “मधुगंधाच्या” चौफेर दरवळीला अनंत शुभेच्छा देतो आणि थांबतो!
—————————–
* “मधुगंध” चारोळी संग्रह
* कवयित्री…सौ.अंजली वारकरी
* प्रकाशन..मानस पब्लिकेशन, अमरावती
* पृष्ठे….१०७
* किंमत…१००
___________________
परिक्षण…
-श्री. रामहरी पंडित
(चंद्रांशू)
कारंजा(लाड) जि.वाशिम.
संवाद.९७६५०११२५१
_____________________