बुड्याची मज्या
बोला आबा……
हप्ताभर दिसले नाही बॉ …… कुठं गायब झाले होते बावा….का लपले होते बुडीच्या धाकानं…..!
बुडीचा धाक……!
अजुनई थरर भेते मतलं बुडी…..तुमच्या सारखं हाय काय….. बिनकामाचा लाळ….!
मंग गेले कुठं होते थे त सांगा……!
म्हंजे तुले काई माईतच नाई काय….? काय लेका बबन्या…..कोन्या घोरात अस्त तू…..!साऱ्या जमान्याले माइत हाय…..पुरा हप्ता गाजोला म्हतल बाबु…!
बाप्पा आबा ! अस कुठं गेले होते बावा…?
काय लेका ….. टीवी बिवी पायत अस्त का नाई….!
आबा आता सांगता का जाऊ मी….!
म्हंजे आता तुले पुरी हिस्टरी सांगाच लागते……..
अरे बाबु कुकु लावन होत आमच्या नाताच…..!
बापा ! आता कोणता नातू रायला हो लग्नाचा तुमचा….?
आमच्या अंतू च कुकू लावन होत…..!
अंतू म्हंजे तुमच्या पोराचं पोरग का पोरीच पोरग….!
अरे बावा आमच्या मुकेस अंन निता च मोठं पोरग…!
आ ssss…काय गोट करता आबा?….मनजे ते अम्बानी….!!!
काय गोट करता म्हंजे तुमाले हा बुडा गंमत वाटते काय…..! एका फोनात इकळची दुन्या तिकळे करतो मतल बाबु…..!
पन आबा तुमची ओयक कशी…??
हं… हे बर विचारलं …!
अजुनबी थे दिवस आठोले का डोयात पानी येते बाबु…..
धिरू भाऊचे खराब दिवस होते थे…..
कोनी साथ देत नसते बाबु अशा टायमाले….!
उनायाचा टाईम होता तो…. मी धुरे धारे पेटून रायलो होतो वावरात…..कोनितरी मा धुऱ्या धूऱ्यान सायकल घिऊन येवून रायल होत….. मंग म्या पायल मतल हा त आपला धिरु होय….!
जसा जवळ आला तसा पायाच पळला…!
काय गोट करता आबा …!
तूले का मज्याक वाटून रायली काय…..? मोठा दातकळ काळून रायला …..! जाय , मी आता पुळच नाई सांगतं……!
वो आबा.. ! मी राज्या मन लावून आयकुन रायलो….सांगा ना बॉ….!
त मंग धिरूले माया वयकीनं म्या एका पंपावर कामा ले लाऊन देल्ल…..! रोज बसनं उठनं राये आमच…..
मंग मतल अस कर धिरु एखांदा धंदा लाव….. मने भौ मा जोळ च्याराने नाही…. कसं करू….. त्याले म्या धंदया साठी थ्या टाईमाले दिळशे रुपये देल्ले होते बाबु …..!
मी त्याले आयड्या देत जावं अन् तो तस तस करे……!
आज पाय तो कुठच्या कुठं गेला….
पन मले भुल्ला नाई गळ्या….. !
लगन झाल्यावर थो अन् कोकिळा दोघही जोळ्यानं पाया लागाले आले होते….!
तई पासून हे समंध चालु हाय बाबु…..!
मुकेस च्या समंदाची पयली बैठक आपल्याच ओसरीत झाली होती…..!
काय गोट करता …..!पन गावात त आजपरेन कोनी असं सांगतल नाई आबा….!
जयतोळे लोक हायत बाबु सारे…..! माय वैभव तेयले पावल्या जात नाही…..
आबा तुम्ही मंता हप्ताभर तिथंच होते…… टिवीवर त तिथीसा आलेले सारे मानसं दाखोले ….. पन तुमच तोंड त एकखेपई दिसले नाई हो आबा….!
तुले त माईत हाय बाबु मले पुळे पुळे कराले आवळतं नाई ….!
मले सांग बाबु तिथ कोनी मा शिवाय मुरब्बी मानुस होत काय …..?
अंदरचं सार लक्ष मलेच ठेवा लागल ना……साऱ्या च्याब्या मा जोळ देल्ल्या होत्या नितानं…..!
म्या जर अस पुळे पुळे केल असत तं घरात दिवा लावला नसता काय मजुरायनं…..! साशे मजुर रोज कामाले अस्ते मतल बाबु…..!
मनून मी होतो माया कामात ….. मी काई बाबु साऱ्या ले भेटलो नाई….. मा जुना आवळीचा मानुस फक्त अमीताबले भेटलो….! फक्त तेच्या सांग च्या घेतला….!
बाकी च्या नवीन पोराईल त म्या दुरुनच रामराम केला ….!
मंजे आबा तुमी सलमान शारुख ले भेटले नाई का …..?
थे त तक तक करत मा सांग बोलाले…. पन नितां मने मामाजी तुमी हेयच्या मांग लागु नोका… !
जेवाचे त बंब ॲटम होते मनते ….!
खाचे ॲटम त विचारुच नोको….!
लय का लय च होते…..! आता मले त्याचे नावं नाई आठून रायले….!
बाबु, गरीब मानसं जेवाले होते…. अन मोठे मानसं वाळाले होते ….!
तुमी त्याचं पंक्तीत होते काय….?
मले कायचं आवळते रे बावा थे….!
म्या निताले मतल, बई मले काई ते चालत नाई ….. मासाठी दोनक भाकरी टाक…..!
हे आता लय आंगभर झाल राज्या आबा….!
अव काय बयरे झाले काय…..! कईपासून आवाज दिवून रायली मी…..!
आबा हा तं तुमच्या बुढीया आवाज होय…?
मीच हो….! तिकडे घरी बकऱ्या बांधून ठेवल्या ….. अन् इकळे आले काय लंब्या लंब्या गोष्टी कराले ….!
घरी नाई दाना मने मले सायेब मना…..! होत्ता का नाई घरी का येवू तिथ……!
ओ आबा…. ओ आबा….. पुळच कई सांगता…????
लेखक
सुनिल ढोकणे
( शेलुबाजार )
तुलसी नगर, मुर्तिजापूर