“ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे मुखपृष्ठ – काव्यवसा”
सन १९१६ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी “खेडयाकडे चला” ही ग्रामीण जनमाणसांशी, गावखेड्यातील जनजीवनाशी सलग्न चळवळ उभी केली. भारतासारख्या कृषिप्रधान असलेल्या संस्कृतीचे दर्शन खेड्यापाड्यातूनच होते त्यामुळे गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ अशी मोहीम राबवली. गावाकडील खेडेपाडे समृद्धीकरण करणे हा मुळ उद्देश लक्षात घेऊन या अभिनव कल्पनेतून, शहरातील वाढती लोकसंख्या, रोजगाराचा वाढता प्रश्न, वाढती गर्दी यामुळे शहरी जनजीवन विस्कळीत होईल, भविष्यात या सर्व गोष्टींचे निराकरण करण्यासाठी तसेच ग्रामीण कृषी क्षेत्रातील वाढते उत्पादन, त्यासाठी लागणारे भांडवल, त्यातून निर्माण होणारे रोजगार या सर्व गोष्टी लक्षात घेऊन प्रत्येक गावखेडी स्वयंपूर्ण व्हावे, ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी प्रयत्न व्हावे हे महात्मा गांधींनी त्यावेळी विचार मांडले होते.
आज शहरांचा झपाट्याने विकास होत आहे, लोकसंख्या वाढीबरोबरच औद्योगिक विकास होत आहे.. नवनवीन उद्योगधंदे वाढत आहेत मात्र आधुनिकीकारणामुळे रोजगार हद्दपार होतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे. प्रत्येक शहरात व्यवसाय, नोकरी निमित्ताने प्रचंड लोंढे स्थलांतरीत होत आहेत त्यामुळे ग्रामीण भागाचे आता आधुनिकीकरण होत आहे. शहरातील वाढती लोकवस्ती ग्रामीण भागावर अतिक्रमण करून ग्रामीण संस्कृतीवर त्याचा विपरीत परिणाम होतांना दिसत आहे. पूर्वी ग्रामीण भागातील घरे शेणामातीचे सारवलेले असायचे, त्यात जिव्हाळा, प्रेम असायचे.. शेणामातीच्या सुगंधाने माणसाचे मन सुगंधित असायचे… त्या मातीला आपलेपणाचा वास होता, घरापुढे शेती उपयोगी अवजारे असायची, चिमणी पाखरांचा चिवचिवाट असायचा, धान्याची खळे असायची… हल्ली हे सर्व सिमेंटच्या जंगलात हरवून चालले आहे. पूर्वी सारखी सारवलेली घरे आता दिसत नाहीत. ग्रामीण जीवनशैलीत दैनंदिन बदल होतांना आपल्याला दिसत आहे.
ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी नुकतीच एक काव्यसाहित्य कलाकृती पाहण्यात आली. मुख्य संपादिका विजया मारोतकर यांनी “काव्यवसा” या शीर्षकाखाली पुण्याच्या परिस प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित केलेल्या कलाकृतीचे मुखपृष्ठ अत्यंत अर्थपूर्ण आणि सुबक झाले आहे. *या मुखपृष्ठावर एक मातीने सारवलेली भीत दाखवली आहे, त्यावर छपराची सावली पडलेली आहे, भिंतीला एक खिडकी दाखवली आहे तिला चार (४) लाकडी कांबी लावलेल्या आहेत. तसेच भिंतीला एक बैलगाडीचे चाक उभे करून ठेवले आहे, या चाकाला सहा पाटे, बारा आऱ्या, एक नाई दाखवल्या आहेत तर शेजारी एक धान्याची पाटी दाखवली आहे त्यात धान्य भरलेले असून त्यावर एक पुस्तके ठेवली आहेत तर त्या पुस्तकावर दोन चिमण्या दाखवल्या आहेत तर या मुखपृष्ठावर एकूण बारा चिमण्या दाखवल्या आहेत. या मुखपृष्ठाचे शीर्षक “काव्यवसा” हे देखील पांढऱ्या शुभ्र अक्षरात दाखवले आहे. या मुखपृष्ठाचा बारकाईने अभ्यास केला तर त्यातून ग्रामीण जीवनशैलीतले काही संदर्भ दडलेले दिसून येतात.* प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी आपल्या कुंचल्याने अतिशय अर्थपूर्ण आणि कलाकृतीला साजेसे, शीर्षकाला अनुरूप असे मुखपृष्ठ दिलेले आहे आपण आज या मुखपृष्ठावरून , ग्रामीण साहित्याच्या जीवनशैलीचा अभ्यास करणार आहोत.
“काव्यवसा” कलाकृती संपादकीय असल्याने महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या कवितांचे संकलन यात दिसून येते. मुखपृष्ठावर जी भिंत दाखवली आहे ती म्हणजे एक संकलन केंद्र म्हणूया पाहिजे तर.. या संकलन केंद्राने ज्या कविता संकलित केल्या आहेत त्या कवितांची छाया या भिंतीवर पडली आहे. *“काव्य म्हणजे कविता आणि वसा म्हणजे छाया, पडछाया, सावली” म्हणून या कलाकृतीचे शीर्षक ‘काव्यवसा’ असे दिले असावे.* या भिंतीला मातीने सारवलेले आहे.. ही माती ग्रामणी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. या ग्रामीण मातीचा सुगंध घेत घेत महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून या मातीचा सुगंध संपूर्ण राज्यात दरवळला आहे तसेच या भिंतीला एक खिडकी असून तिला *चार लाकडी कांबी* लावलेल्या दाखवल्या आहेत.. त्या चारच का लावल्या..? तर याचा अर्थ असा की, *या “काव्यवसा” कलाकृतीसाठी “पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर”* अशा चारही दिशेने आलेल्या साहित्यिकांच्या कविता यात समाविष्ठ केलेल्या आहेत. याचाच अर्थ संपूर्ण राज्यातील कवींच्या कविता यात समावेश केलेल्या आहेत इतका गहन अर्थ मला इथे भावला आहे.
“काव्यवसा” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर भिंतीला लागुनच एक बैलगाडीचे चाक दाखवले आहे *या चाकाला, बारा आऱ्या, सहा पाटे,* दाखवले आहेत याचा अर्थ असा की, साहित्यिक हा आपले लेखन करतांना काळ, वेळ, स्थळ, याचा विचार करत नाही. जेव्हा मनात येईल तेव्हा तो लिहित असतो… आणि म्हणूनच ही कलाकृती मराठी भाषिक असल्याने मराठी *“चैत्र, वैशाख, जेष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन”* अशा बारा महिन्यांचे प्रतिक म्हणून बारा आऱ्या आहेत. कवी असो व लेखक हा कधी ऋतूंचाही विचार करत नाही म्हणून या बारा महिन्यात *सहा ऋतू “वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर”* यातही लेखन चालू असते म्हणून या चाकाला *सहा पाटे* दिले असावे असा अर्थ मला जाणवला आहे.
“काव्यवसा” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर एकूण बारा चिमण्या दाखवल्या आहेत… काही खिडकीत बसल्या आहेत तर काही उडतांना दाखवल्या आहेत.. यात बाराच चिमण्या का दाखवल्या असतील? याचा मी बारकाईने विचार केला तर मला असे जाणवले की, प्रत्येक माणसाच्या अंगी काही गुणावगुण असतात.. आपण नकारात्मकता न पाहता सकारात्मकता विचारात घेऊन फक्त चांगल्या गुणांचे कौतुक करू.. कारण चांगलेपणा हा व्यक्तीच्या सुंदरतेचे उत्तम लक्षण असते म्हणून चागल्या गुणांची कदर केली पाहिजे. या बारा चांगल्या गुणात पहिला गुण *प्रामाणिकपणा, उत्साहीपणा, आशावाद, परमार्थवाद, विश्वासार्ह्यता, प्रेमळपणा, सुशीलता, मोहकता, आपले वक्तव्य, आपली निष्ठा, आपली सभ्यता, आणि आपला एकांतपणा* अशा बारा गुणाचे कवी, लेखक, साहित्यकांचे प्रतिक म्हणून या *बारा चिमण्या* दाखवल्या असाव्यात. आणि म्हणूनच असे बारा चांगले गुण असणाऱ्या कवींच्या दर्जेदार कविता “काव्यवसा” या कलाकृतीत घेतल्या असाव्यात असा अर्थ मला इथे भावला आहे.
“काव्यवसा” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर एक धान्याची पाटी दाखवली आहे..या पाटीत धान्य दाखवले असून त्यावर पुस्तक ठेवले आहे आणि या पुस्तकावर चिमण्या दाखवल्या आहे याचा अर्थ काय हे आपण जाणून घेणार आहोत. *युगानुयुगापासून भारत देश शेती व्यवसाय करत आला आहे, शेतीत कष्ट केल्याशिवाय धान्य पिकत नाही.. देश शेतीप्रधान असल्याने शेतीला पूरक व्यवसाय निर्माण झाले.. मानव समाज आर्थिक समृद्ध होत आहे .. कष्टाबरोबरच शिक्षण देखील तितकेच गरजेचे आहे म्हणून शेतीत राबता राबता घरोघरी शिक्षणाची गंगा आली आणि समाज सुशिक्षित झाला.. शेतीतील कष्टाचे फळ म्हणून धान्य दाखवले आहे तर हे कष्ट करता करता शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करणे, शिक्षण घेणे आणि त्यातून विचार समृद्ध करणे यासाठीच या चिमण्या प्रातिनिधिक स्वरुपात पुस्तक वाचण्यासाठी धडपडत आहेत, या चिमण्या म्हणजेच कवी, लेखक , साहित्यिक आहेत म्हणून या धान्यावर पुस्तक आणि चिमण्या दाखवल्या आहेत आणि म्हणूनच या समृद्ध विचारांच्या कविता या “काव्यवसा” या कलाकृतीत घेतल्या असाव्यात असा अर्थ मला भावला आहे.
“काव्यवसा” या कलाकृतीच्या मुख्य *संपादिका विजया मारोतकर* यांनी संपादित केलेल्या या कलाकृतीचे मुखपृष्ठ अतिशय अर्थपूर्ण आणि कलाकृतीच्या शीर्षकाला साजेसे असे सजवले गेले आहे. *मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार, पुण्याचे परिस प्रकाशन* यांना पुढील दर्जेदार साहित्य कलाकृती निर्मितीसाठी हार्दिक शुभेच्छा….
मुखपृष्ठ परीक्षण
-प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० *(तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)*