जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू;अमरावती लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिलला मतदान
नागरिकांना तक्रारीसाठी ‘सी व्हिजिल’ अँप
गौरव प्रकाशन अमरावती, (प्रतिनिधी): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाची तयारी सुरू असून मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मिळालेल्या प्रतिसादावर मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी होणार असून नागरिकांना सुद्धा आचारसंहितेचा भंग होत असल्यास सी-व्हिजिल अँप वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा निवडणूक 2024 चे अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उप जिल्हा निवडणुक अधिकारी शिवाजी शिंदे, स्विपचे सहायक नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके तसेच पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये आज पासून आचारसंहिता लागू झाली असून त्याअनुषंगाने जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्यात लावण्यात आलेल्या बॅनर, जाहिराती आदी प्रसिद्धी विषयक साहित्य तात्काळ काढण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच जिल्हाच्या सीमेवरील चेकपोस्ट व सुरक्षा यंत्रणा अधिक चोख ठेवण्यासाठी दोन्ही राज्याच्या पोलिस प्रशासनाचे संयुक्त बैठक घेऊन सूचना देण्यात आले आहे. नागरीकांना व मतदारांना आचार संहिता भंगाच्या तक्रारी, मतदार यादी विषयक व मतदान केंद्राविषयी माहितीसाठी जिल्हा संपर्क क्रमांक टोल फ्री.1950 या क्रमांकावर संपर्क साधून करता येणार आहे. तसेच लोकसभा निवडणूकीत C-VIGIL नावाचे मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून त्याव्दारे मतदारांना आचार संहिता भंगाविषयीच्या तक्रारी करता येईल. उमेदवारांसाठी विविध परवानग्या प्राप्त करून घेण्यासाठी (मिरवणूक, प्रचार सभा, वाहनांची परवानगी तात्पुरत्या प्रचार कार्यालयाची परवानगी इत्यादी) या निवडणूकीत सिंगल विंडो सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी दिली.
अमरावती लोकसभा मतदार संघात बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर अशा 6 विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. अमरावती लोकसभा मतदार संघात एकूण 18 लक्ष 28 हजार 970 मतदार असून यामध्ये पुरुष 9 लक्ष 40 हजार 850, महिला 8 लक्ष 88 हजार 034 तर तृतीयपंथी 86 मतदार आहेत. आयोगाच्या निर्देशानुसार कोणीही मतदार वंचित राहता कामा नये यासाठी जास्तीत जास्त मतदारांची मतदार नोंदणी करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीकरीता एकूण 2 हजार 682 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, अपंगांसाठी रॅम्पची सुविधा, विजेची सुविधा, मदतकक्ष, प्रसाधनगृह, फर्नीचर, दिशादर्शक फलक, सावलीसाठी शेड व मंडप या सर्व सुविधाचा समावेश असणार आहे.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात राज्यातील एकूण ५ लोकसभा मतदार संघांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. दुस-या टप्प्यात २६ एप्रिल रोजी राज्यातील ८ मतदार संघांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. ७ मे रोजी तिस-या टप्प्यात राज्यातील एकूण ११ मतदार संघांसाठी, १३ मे रोजी चौथ्या टप्प्यात तर २० मे रोजी राज्यातील उर्वरित १३ मतदार संघांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.