-महाशिवरात्री विशेष-
तीर्थक्षेत्र पंचधारा श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार
शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.
शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त्यांच्या हाती लागल्यात ज्या काशी येथील ज्योतिर्लिंगाशी जुळत्या मिळत्या आहेत.तसे महत्त्व त्यांनी भक्तांना आणि त्यांच्या स्वरचित साहित्यात उल्लेख केलेला आहे.
विखुरलेल्या सर्व पिंडी श्रीसंत अच्युत महाराजांनी एकत्रित केल्यात आणि सन १९४६-४७ च्या दरम्यान प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून तीर्थक्षेत्र पंचधारा येथे महाशिवरात्री महोत्सव/वन महोत्सव साजरा केला जातो. तत्कालीन वेळी या ठिकाणी सलग तीन दिवस कार्यक्रम ज्यात नाट्य शिबिर शंकरपट किर्तन, दहीहंडी,असे कार्यक्रम होत असे.तीच परंपरा १९८५ पासून श्री संत अच्युत महाराज संस्थानने आजतागायत सुरू ठेवली आहे.सदर शिवालय हे मोझरी गावातील श्रीमंत रावसाहेब ठाकूर यांच्या शिवारात आहे.या मंदिराला त्यांच्या वारसदार माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांचे सुद्धा विशेष असे सहकार्य असते.ही संपूर्ण माहिती शेंदूरजना बाजार येथील गोपाल देवळे आणि प्रमोद निमकर यांनी दिली आहे.या मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास निधीतून विकास व्हावा आणि शिवभक्तासाठी सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात अशी शिवभक्तांची अपेक्षा आहे.
-प्रा.डॉ. नरेश इंगळे