भूसंपादनाच्या नावानं कोट्यावधी रुपयांची लूट.!
राज्यात अनेक सरकारी प्रकल्प आहेत, जिथं प्रकल्प बाधितांना एका पैशाचाही मोबदला मिळत नाही. तिथे माञ सरकारी अधिकारी मलिदा लाटतात.काही भ्रष्ट अधिकारी नियम, कायदे खुंटीला टांगून, बोगस लाभार्थी दाखवून, स्वतःच्या तुंबड्या भरताना दिसतायत.
शासकीय प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्या जात असतो. त्याची जबाबदारी संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांची असते.अधिकारी स्वतःच्या तुंबड्या भरत असल्याचे अनेकदा निदर्शनात आले असताना देखील कठोर कारवाई अभावी अधिकारी जमीन घोटाळे मोठ्या प्रमाणात करत शासनाला चुना लावत आहे.एकूणच काय, तर महाराष्ट्रात सतत होणारे भूसंपादन घोटाळे हा प्रकार चिंताजनक आहे.या आधी देखील राज्यात अनेक ठिकाणी भूसंपादन घोटाळे झालेले आहेत.समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात झालेल्या भ्रष्टाचार हा चांगलाच गाजला होता.समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनात झालेली आहे. समृद्धी प्रमाणेच धुळे-सोलापूर या ३ हजार कोटी रुपयांच्या रस्ता चौपदरीकरणाच्या भूसंपादनातही असाच घोटाळा करुन अधिकारी व दलालांनी संगनमत करुन करोडो रुपयांची लूट केली होती.
सध्या वर्धा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भूसंपादन घोटाळा झाल्याची बातमी समोर आली आहे. उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वर्धेच्या एका महिला अधिकारीने २ कोटी ६४ लाख रुपयाचा अपहार केल्याचे समोरं आले आहे. त्यांच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हे दाखल झाले आहे.ती महिला अधिकारी १७ फेब्रुवारी २०२२ रोजी रुजू झाल्यानंतर १२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत लघु सिंचन कालवे प्रकल्पच्या उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
समुद्रपूर तालुक्यातील २५ वर्षांपूर्वी वाटप झालेल्या १६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रकरण पुढे आले. त्यांच्या नावे २ कोटी १३ लाख ३११ रुपये बनावट कागदपत्रे सादर करीत काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तर कोषागार कार्यालयातील शासकीय खात्यातून ५ लोकांच्या नावे ५० लाख ८५ हजार ४२४ रुपये दोन पतसंस्थेत खोटे खाते उघडून वळते केल्याचे दिसून आले.
चौकशीत अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या.२५ वर्षांपूर्वी निवड झालेल्या शेतकऱ्यांचे नाव निवाड्यात नव्हते. मोबदला मिळावा म्हणून ज्यांनी अर्ज सुद्धा सादर केला नाही, अश्याही लोकांच्या नावाने पैसे उकलण्यात आले. या प्रकरणात शेतकरी महिला नागरी सहकारी पतसंस्था व हिंगणघाट येथील आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था यांच्याशी स सांगनमत करीत बनावटी कागदपत्रे देत खोटे खाते काढले. त्यात पैसे जमा करीत नंतर ते काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकरण महसूल खात्यात चांगलेच खळबळ उडविणारे ठरत आहे. महिला उपजिल्हाधिकारी यांच्यावर पूर्वी काही प्रकरणात पण कारवाई झाली असल्याची बाब आता पुढे आली आहे. हा मोठा भ्रष्टाचार असल्याचे सिद्ध झाल्यावर वर्धा जिल्हाधिकारी यांनी पोलीस तक्रार दाखल केली. शहर पोलिसांनी विविध कलमन्वये गुन्हे दाखल केले आहे. पोलीस पुढील कारवाई काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार व कोणाला कोणाला अटक करणार? हे येत्या काळात कळेल. यातील मुख्य आरोपी सध्या परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी सामान्य या पदावर कार्यरत आहेत.मात्र त्या नॉट रीचेबल असल्याची बातमी समोर आली आहे.
– प्रा डॉ सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६