जगणं देखण करता आलं पाहिजे.!
आजकाल माणसाचं सरासरी आयुष्य किती हा प्रश्न मला जसा पडतो तसा तुम्हाला ही पडत असेलच नाही का ? विज्ञान नवनवीन शोध’ यामुळे आयुर्मान वाढल हे खर जरी असले तरी अकाली जाणाऱ्यांचं प्रमाण देखील लक्षणीय वाढलंय हे दुर्लक्षून कसे चालेल. पूर्वी ची पिढी अगदी शतक पार करायची परंतु आता मात्र साठी पार केल म्हणजे दिव्य अस म्हणावं लागेल . कारण मृत्य कोणत्या आणि कश्या मार्गाने येईल हे काहीच सांगू शकत नाही इतकं माणसाचं जीवन बेभरवशाच होऊन बसलय. हे वाचून तुम्हाला हसू येत असेल नाही का ? हे आमच्या लक्षात आहे आणि माहीत ही आहे हा उगाच का ज्ञान पाजळतोय अस तुम्हाला वाटत असेल नाही का ?
परंतु मित्रानो जगणं म्हणजे नेमकं काय ?
चाळीशी ओलांडली की लक्षात ठेवा परतीच्या पावसासारखा आपला ही परतीचा प्रवास चालू होतो. परतीचा पाऊस काही पिकांना जीवदान तर काही पिकांची दाणादाण करून सोडत असतो. तसच ह्या चाळीशी नंतरच्या आयुष्यात घडायला सुरुवात होते.कर्ज मुलांचं ,शिक्षण, गाडीचे, हप्ते, भरता भरता जीव अगदी मेटाकुटीला येतो. बर ह्यातील काहीच बरोबर येणार नसत बर का तरी ही आपण मात्र धावत नव्हे सुसाट सुटतो.
खर तर चाळीशी च्या नंतर काही स्वप्नांच्या पाठी न धावता वास्तवात जगणं शिकल पाहिजे जे आहे ते उत्तम जे नाही त्याची खंत न करता उर्वरित प्रवास कसा आनंददायी असेल ह्या कडे लक्ष देणे गरजेचे असत..बर आनंदी रहायला फक्त पैसा लागतो का ? तर मुळीच नाही. प्रत्येक व्यक्ती मध्ये काही छंद, काही आवडी असतात , धावपळीत आपण त्या कडे कधीच लक्ष देत नाही. त्या कडे थोडं लक्ष द्या ,हे छंद तुमचं पुढील आयुष्य समृद्ध तर करतीलच परंतु जगणं देखण केल्या शिवाय राहणार नाही. आणि देखणी बाब सगळ्यांना आकर्षित करत असते बर का…मग ते तुमचं जगणं असो अथवा तुमचं सौंदर्य असो.
तूर्तास थांबतो…
– अशोक पवार
गटेवाडी पारनेर