सेवालाल : एक क्रांतीकारी संत 

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

सेवालाल : एक क्रांतीकारी संत 

देश म्हणजे देशातील माणसं.मग देशात विविध जाती आहेत. जमाती आहेत. येथे अनेक वंश आहेत, येथे अनेक वर्ग आहेत. येथील विविध जाती विविध धर्मात वाटल्या गेलेल्या आहेत. एकाच धर्मात अनेक जाती जमाती आहेत. धर्म एकच पण जातीची भली मोठी उंच उंच उतरंड आहे. पुन्हा त्यात उपजाती.नारा देताना हम सब एक है. पण बोलणारे नेते, तथाकथीत समाजसुधारक जात पाहून, सोयरे धायरे पाहून, गणगोत पाहूनच व्यवहार करतात.

काम पडलं की जातपात धर्म संगळ विसरून आपण एक आसल्याचं नाटक करतात. काम संपलं की गरज सरो वैद्य मरो. आसं पूर्वीपासून चालू आहे. कदाचीत पुढेही चालू राहील. आता तर आपण एकाच धर्माचे आहोत.हा आमचा धर्म आहे म्हणणारे आम्ही सर्व स्पष्टपणे जाती वाटून घेतल्या आहेत.जातीत जन्मलेल्या महापुरुषाला जातीच्या वर्तूळातच बंदी बनवत आहोत. हा आमचा.तो तूमचा.असं चालू आहे.
अखील मानवजातीच्या कल्यानासाठी देह झिजविलेल्या साधू संताना जातीनी वाटून घेतलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले , छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जातपात धर्म यांच्या पलिकडे जावून कार्य कलेले आहे.कोणत्या जातीत जन्म घ्यावा हे त्यांच्या हातात नव्हतं. त्यांच्या ध्यानी मनी जात हा विषारी शब्द नव्हता . त्यांचा विशिष्ठ धर्म ही नव्हता. मानवता हाच त्यांचा धर्म होता. पण आज आपण थोर व्यक्ती साधू संत यांना जात नामक कुपीत बंद करुन डिंगोरा पिटत फिरतोय. त्या कुपीवर आपण जात लिहून ठेवलेली आहे.आता ते कुपीतून बाहेर निघणार नाहीत याची काळजी आपले ढोंगी नेते समाजसुधारक घेत आहेत.

आता प्रत्येक जातीनी आपला नेता व संत यांना पुढे करुन त्यांचा जय जयकार करणे सुरु केले आहे. आता यासाठी जाती जातीत स्पर्धा सुरु झालेली आहे. कोणाची जयंती दणक्यात साजरा झाली त्यापेक्षा आपल्याची जयंती कशी दणक्यात होईल हे पाहिले जाते. ज्यांणी जात निर्मुलन करण्याचे प्रयत्न केले त्यांच्याच नावावर आम्ही जात धर्म निर्मान केलेलं आहे. करत आहोत.

जातीची वाटणी झाली. धर्माची वाटणी झाली. आता रंगाचीही वाटणी झालेली .कोणाचा लाल रंग आहे. तर कोणाचा भगवा रंग, तर कोणाचा हिरवा रंग, कोणाचा निळा. आता या रंगाचे वादळही उठत आहेत. या वादळात किती बल आहे ते किती विनाशकारी आहे हे सध्या तरी काळाच्या पोटात दडलय. या रंगात आता पांढरा रंगही सामील झालेलं आहे. आता पांढरा वादळही तयार होतोय. हा पांढरा वादळ सध्या वावटळच्या रुपात आहे. तेही चक्रीवादाळात रुपांतर होईल. हे वादळ काय करेल याचाच विचार आता सेवालालही करत असतील.

भगवा, पांढरा व हिरवा हा तर आपल्या तिरंग्याचा रंग आहे. येथे प्रत्येक रंगाला अर्थ आहे. महत्त्व आहे. अभिमान आहे. बंजारा व इतर भटक्या जाती जमाती तीस चाळीस वर्षापूर्वी त्यांच्याच समाजातील कोणत्याही थोर व्यक्तीची जयंती पुण्यतिथी साजरी करत नव्हता पण आज हा समाज इतर समाजाकडे पाहून जयंती पुण्यतिथी साजरी करत आहे.यामुळे समाज एकत्र येतोय हे निश्चित.

बंजारा समाज सेवालाल महाराजांची जयंती धुमधडाक्यात साजरी करत आहे.सेवालाल महाराजाविषयी लिखीत माहिती फारशी उपलब्ध नाही. बंजारा समाजाचा इतिहास त्यांच्या गीतात आहे.त्याच्या कथेत आहे. सगळा इतिहास तोंडी. सेवालाल महाराज गोर समाजाचे केवळ संत नव्हते तर ते क्रांतीकारी संत होते. ते शुर योद्धा होते.चाणाक्ष राजकारणी होते.धुरंदर समाजकारणी होते. ते श्रधाळू होते ; पण अंधश्रद्धाळू नव्हते. ते मानवी कल्यानाचे शक्तीपीठ होते. उर्जास्त्रोत होते. संत सेवालाल हे स्वतःच एक विचारधारा होते.

सेवालाल प्रचलतीत व्यवस्थेविरुद्ध दंड थोपटून समाजाला एकत्र एक जीव करण्याचा प्रयत्न केला.श्रीमंत गरीब असा भेदाभेद नको, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक या सर्व पातळीवर त्यांनी लढा दिलेला आहे.सेवालाल महाराज प्रार्थना करतात : “से जीव जनगांणीन साई वेस. किडी मुंगीनं साई वेस. कोर गोरे न साई वेस ” थोडक्यात या सजीवसृष्टीला सुखी ठेव अशी प्रार्थना ते करतात. ते शिकवण देतात : निती धर्माने वागा. हिंसा करू नका.चोरी करू नका, व्याभीचार करु नका. खोटं बोलू नका.दारू पिऊ नका. पाच पारा ते सांगतात. पारा म्हणजे ज्ञान असा अर्थ असावा. पण समाजातील दिडशहाण्यांनी पारा कंबरेला बांधायला सांगितले ! असे करणाऱ्यालाच महाराज प्रसन्न होतील असी आफवा पसरवली जाते.

महाराज म्हणतात : तुम्हच्या जीवनात तुम्हीच ज्योत पेटवू शकता.तुम्ही कोणालाही भजू नका. कोणालाही पुजू नका.आपण सगळे समान आहोत. येथे कोणी लहान नाही.येथे कोणी मोठा नाही. भटक्या समाजाला प्रेरणा देण्यासाठी ते म्हणतात ऊठा. कामाला लागा. डल्याने,त्रागा केल्याने तुम्हाला कोणी गादीवर राजा म्हणून बसवणार नाही.राजा करणार नाही. तुम्ही कितीही जोर लावून चपळाईने पळालात तरी निसर्ग आपले नियम सोडत नाही. दिवस मावळायच्या वेळी मावळतो. उगवायचा वेळी उगवतो.

तुम्हाला राज करायच असेल तर विचाराची क्रांती करा.समाजाला एका विचार धाग्यात बांधा. उन्हातही पळसाची फुलं अग्नीसारखी पेटलेली दिसतात.पळस हा माळरानात खडकावर व पाणी नसलेल्या ठिकानी मोहरत राहतो.तसे तुम्ही परिस्थितीशी मुकाबला करुन फुलत रहा. समाज कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो त्यातील ढोंगी भगत,भोप्या हे नेहमीच थोर विभूतीला चमत्कारीक व्यक्ती होते. ते वेगवेगळे चमत्कार करत होते असे सांगून त्या थोर व्यक्तीच्या महानतेला ते थिट्टं करतात. व स्वतःला ज्ञानी व मोठं बनवतात. येथे ज्ञानेश्वर असो की संत शिरोमणी तुका असो हे चमत्कार करत होते असे ठासून सांगणारे आपल्याला पावलो पावली भेटणारच.

सेवालाल महाराजाला लडी गीत गाणारे, भजन करणारे काही ठग लोकांनी चमत्कारीक ठरविले. ते चमत्कार करत होते असे ते आजही सांगतात. ते चमत्कार काल्पनिक व चाणाक्षपणे ते स्वतःच तयार करतात व सांगतात. व ऐकणारी भोळी, अज्ञानी,निरक्षर मंडळी त्यावर विश्वास ठेवतात. लडी गीत गाणारे किंवा भजनी मंडळी सांगतात : महाराजांनी मातीचं भोजन तयार केलं, वाळलेल्या झाडाला जिवंत हिरवं केलं,झाडाच्या पानांच्या पराती बनवल्या, झांज बनविले, दगडाचा नंगारा बनविला, विषारी मिठाई खाऊनही विषबाधा झाली नाही. नदीच्या पुरातून ओलांडून जाण्यासाठी चिमूठभर भस्म टाकून रस्ता तयार केला, चिंगऱ्याचं चिंगरी बनवले. देवीमाते सोबत स्वर्गात गेले असे कित्येक चमत्कार सेवांनी केले म्हणून हे समाजकंटक ढोंगी लोक समाजातीत लोकांना सांगतात.

महाराज शिकवण देतात जे गरीबाला दांडून खाईल. व्याज बट्टी लावून जादा पैसा गरीबाकडून घेतील त्या सावकाराच्या सात पिढया नरकात जातील. महाराजाना चमत्कारीक समजणारे हे अंधश्रध्दा पसरविणारे आहेत. ते समाजाला बौध्दीक दृष्टया पंगू,अपंग बनविणारे आहेत. या लोकांना सेवादास बुध्दीवादी होते.तर्कनिष्ठ होते. विज्ञानवादी होते.समतावादी होते. शुर यौध्दा होते. क्रांतीकारी विचाराचे होते. मानवतावादी होते. स्त्री समानतेचे पुरस्कार करणारे होते. समाजातील वाईट रुढी परम्परा नष्ट करण्यासाठी ते लढा देत होते. समाजातील गुंडाना धडा शिकवत होते. सावकारी नष्ट करण्यासाठी ते धडपडत होते. हे या लोकांना दिसत नाही का ?

सेवादास क्रांतीकारी संत होते तसेच ते शुर ही होते.त्यांनी निजामाला नमवल. दिल्लीचा बादशाहा गुलाबखान यांना हरवलं. सेवादास महाराज यांनी केवळ ९०० सैनिक घेवून २५००० हजार सैनिकाला पाणी पाजवलं. त्यापैकी ९००० हजार सैनिकाला ठार केले. महाराजानी जे केलं ते देवीमुळं असा विचार ढोंगीबुवाच्या सडक्या डोक्यातून बाहेर येतात व ते समाजाला सांगतात. महाराजानी कधीच चमत्कार केलाला नाही जे काही ते चमत्कार सांगतात ते सर्व ज्ञान व विज्ञानाच्या कसोटीवर महाराजांनी केलेलं आहे.

बंजाराचा पांढरा ध्वज आहे. ते कोणी निवडलं कधी निवडलं याची माहिती माझ्याकडे नाही पण पांढरा रंग का निवडला याचं कारण मला सांगता येईल व्यापार करण्यासाठी. युद्धात शांततेचं प्रतिक म्हणून. पांढरा रंग हा रंग नाही. तर ते सात रंगाचे ते मिश्रण आहे. ते शांततेच प्रतिक आहे. बंजारा समाजाच्या स्वभावाला शोभेल असाच हा रंग आहे. बंजारा समाज शांती प्रिय आहे. बंजारा स्वभावाने शांत व सर्वात मिळून मिसळून वागतो. तो स्पष्ट व सरळ मतवादी आहे. हा समाज स्वतःच्या आचार विचारावर नियंत्रन ठेवतो. यांना नाटकीपणा जमत नाही. ही जमात निसर्गाच्या नियमाचे पालन करणारी आहे. वचन पाळणारी जात आहे. त्यासाठी जीव देणारी आहे व बिघडली तर जीव घेणारी जात आहे. स्वाभिमानी आहे. त्याला गुलामी आवडत नाही तो कुणाला गुलाम ही करत नाही. मानी समाज आहे. दास म्हनून जगत नाही.भिक मागणारी जात नाही. जयंती साजरी करताना धुमधडाक्यात करा. पण अनावश्यक खर्चाना फाटा द्या. जमलेल्या पैशातून समाजातीत शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी काही करता येते का पहा. दारूपासून दुर रहा. पांढऱ्या रंगाचा अर्थ समजून घ्या.

थोडक्यात पांढरा रंग म्हणजे निरागस्ता, शुद्धता, शांत, सौम्य, शितल व पावित्र्य याचं प्रतिक आहे.बंजारा समाजही ॥ अवघा रंग एक झाला, रंगि रंगला श्रीरंग ॥ असा आहे. बंजारा संस्कृति मध्ये सत्य व स्पष्टवक्तेपणा दाखविण्यासाठी, शांततेच प्रतिक युध्दाच्या काळात व्यापर करताना या ध्वजाचा उपयोग बंजारानी केलेला आहे यात काही शंका नसावी.

राठोड मोतीराम रुपसिंग
विष्णुपूरी , नांदेड -६
९९२२६५२४०७ .

Leave a comment