मुंबई, : कापसासाठी ७,२०० रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला. खुल्या बाजारात मात्र ६,३०० रुपयांचा दर मिळत आहे. हमीभावापेक्षा तब्बल ९०० रुपयांनी कमी. बरं हमी भाव मिळणार तरी कसा? कापूस पणन महासंघाचे केंद्र अजूनही उघडलेले नाहीत. सीसीआयने मोजकी केंद्रे उघडली. शेतकरी या केंद्रांवर गेले तर अटींची यादी दाखविली जाते. मग कापूस विकायचा तरी कुठे? या व्यस्थेला कंटाळून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याने गाडी भरून नेलेला कापूस पेटवून दिला. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची मोदी सरकारची गॅरंटी कुठे हरविली, असा संतापजनक सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री. विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. श्री.वडेट्टीवार म्हणाले, पांढरे सोने पिकविणारा प्रदेश म्हणून विदर्भाची ओळख आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी कापसाला १४ हजार रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला. अधिक दराच्या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची अधिक लागवड केली. मागील वर्षी दर कोसळल्याने अनेकांनी घरातच कापूस साठवून ठेवला. दरवाढीच्या आशेवर दुसरा हंगाम संपण्याची वेळ आली तरी १४ हजार तर दूरच साधा हमीभावही मिळणे कठीण झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे निर्देश दिले होते. पण, शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल अशी व्यवस्था उभारली नाही. बाजारात ७,२०० रुपयांचा भाव देणे शक्य नसल्याचे व्यापारी सांगतात. उद्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केल्यास गुन्हे दाखल होणार म्हणून व्यापाऱ्यांनी युक्ती काढली. कापूस विक्रीला आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून हमीपत्र लिहून घेत आहेत. कमी दरात कापूसविक्री आपल्याला मान्य असल्याचे लिहून देत आहेत. व्यापाऱ्यांनी कापूस घेतला नाही तर विकायचा कुठे म्हणून हतबल झालेला शेतकरीही हे लिहून देत असल्याचेही श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले. सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कापूस पणन महासंघाची केंद्रे तातडीने सुरू करावी, ७,२०० प्रती क्विंटलच्या हमीभावाने कापूस खरेदी करावा, खरेदी केलेल्या कापसाचे धनादेश तातडीने देण्यात यावे, सीसीआयच्या जाचक अटी रद्द कराव्या, असेही श्री. वडेट्टीवार यांनी सरकारला खडसावले आहे. गाडीसह कापूस पेटविला तरी सरकार गप्पच वर्धा जिल्ह्यातील रोठा येथील शेतकरी अमोल ठाकरे यांचे जिवंत उदाहरण पहा. खुल्या बाजारात दर कोसळल्याने त्यांनी सीसीआयच्या केंद्रावर कापूस नेला. लहान मुलाला घेऊन दिवसभर आपल्या कापसाच्या विक्रीसाठी प्रयत्न केले. पण, सात-बारावर पेरणीची नोंदणी नसल्याने त्यांचा कापूस घेण्यात आला नाही. खुल्या बाजारात विक्री केला तरी खर्च निघणेही कठीण आहे. संताप अनावर झाला. रक्ताचे पाणी करूनही कापसाला भाव मिळत नाही म्हणून पोटच्या लेकराप्रमाणे जपून वाढविलेला, पिकविलेला कापूस क्षणात गाडीसह पेटवून दिला. यासंदर्भातील व्हिडीओ वेदनादायी आहे. या निष्ठूर सरकारला शेतकऱ्यांशी घेणेदेणेच उरलेले नाही, त्यांच्या संवेदना संपल्या आहेत, असा आरोपही श्री. वडेट्टीवार यांनी केला आहे.
|