गझल स्पंदन
सुप्रसिद्ध गझलकार, कवी, लेखक, गायक, सिनेकलावंत, अशा बहूआयामी व्यक्तिमत्वाचे धनी मा. अजय बिरारी, नाशिक.
गझल संग्रह प्रकाशक मुद्रक- तानाजी खोडे,
ज्ञानसिंधु प्रकाशन, अशोकनगर सातपूर. नाशिक.
पिन- ४४२०१२
संहिता
अजय बिरारी
३ गीत नारायण नगर, पटेल कॉलनी,
त्र्यंबकरोड, नाशिक, पिन-४२२००२
मुखपृष्ठ संकल्पना- सौ. मयुरी बिरारी खैरनार.
प्रथम आवृत्ती- ३ आॉगष्ट २०२३
प्रस्तवना- सुप्रसिद्ध गझलकार
बदीऊज्जमा बिराजदार
(सबिर सोलापुरी)
अजयदादा बिरारी आणि माझा परिचय माझ्या परिमल साहित्य कला मंच या संस्थेच्या इ.सन २०१७-१८ साली आयोजिलेल्या पहिल्या राज्यस्तरीय बहूभाषिक कवी संमेलनाच्या उद्घाटनीय कार्यक्रमापासूनचा. त्यांना प्रमुखअतिथी म्हणून आम्ही निमंत्रित केले होते, पण एवढा नावाजलेला अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा माणूस आपल्या या पहिल्याच कार्यक्रमात सहभागी होईल का? अशी मला शंका होती. पण अजयदादा आले आणि त्यांनी या कार्यक्रमांतर्गत आपली एक गझलही सादर केली. तेंव्हापासून ते *परिमल परिवाराचे* व माझ्या *साळुंके* परिवाराचे एक अभिन्न अंग झालेत. त्यांच्या प्रेमापोटी मलाही नाशिक येथील खान्देश महोत्सवात वेळोवेळी सहभागी होता आले. अजयदादांचे आणि साहित्याचे नाते जरी त्यांच्या वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षापासून ख-या अर्थाने सुरु झालेले असले तरी त्याचा अल्पशा प्रमाणात प्रारंभ मात्र शालेय व महाविद्यालयिन जीवनात शिक्षण घेत असतानाच झालेला असल्याचे ते नमूद करतात.
आयुष्य जगत असताना सांसारिक तसेच कौटुंबिक व सामाजिक जवाबदा-यांच्या रामरगाड्यात माणसाला आपल्या आयुष्याचा स्वतःसाठी म्हणावा तसा उपभोग करवून घेता येत नाही. अजयदादांच्या मुली सौ. मयुरी आणि सौ. प्रांजली सोबतच त्यांची अर्धांगिणी सौ. सुवर्णाताई आणि सन्मित्र परिवारजनांच्या आग्रहाखातर का होईना अजयदादा काव्यलेखन व गझललेखनाकडे वळले. सोबतच नाट्य, सिनेमा व दूरदर्शनवरील मालिकांमधूनही काम करण्याची संधि त्यांना वेळोवेळी मिळत गेली. जवळपास सहा फुट उंचीचा गोरागोमटा शिवाय नखशिखांत देखणा राजबिंडा असलेला हा माणूस प्रथमदर्शनीच डोळ्यात भरतो व आपल्या विनम्र आणि सौजन्यशील स्वभावाने कधी मनात शिरतो हे आपल्याला कळत देखील नाही.
एखाद्या गोष्टीची आवड असणं हे आपण समजू शकतो, परंतु त्या आवडी निवडी जोपासताना जिवापाड मेहनत करुन ईतरांनाही त्यात सहभागी करुन घेण्यासठी सतत धडपडणं हे सर्वसाधारण माणसाला जमूच शकत नाही. अजयदादांनी गझलकार्यशाळेच्या व सौ. ऊर्मिलाताई बांदिवडेकरांच्या सुयोग्य मार्गदर्शनात गझलेचे रितसर शिक्षण घेऊन पुढे स्वतःच्या *शब्दमाळ* समुहतील नवोदितांसाठी मृणालताई गिते व सचिन बागूल यांच्या सहकार्याने आॕनलाईन कार्यशाळेचे सुनियोजितपणे आयोजन करुन नवोदितांना गझलेचे तंत्र-मंत्र शिकवायचा ध्यास घेतला व तो आजतागायत टिकवला देखील! मराठी मायबोलीसाठी योगदान देत असताना अजयदादाने आपल्या मायबोली अहिराणीलाही तितकाच लळा लावला. त्यासाठी वेबसाईटवर एक *मायबोली अहारानी* नावाचं स्वतंत्र दालनंच उघडलं व तिथे फक्त आणि फक्त अहिरानीलाच महत्व दिलं आणि आश्चर्य म्हणजे आजतागायत टिकवलेलंही आहे.
अजयदादांनी मराठीप्रमाणेच अहिराणीत देखील गझल लेखन, बोधकथा व ईतर वाङमय सेवा देण्याचा जणू विडाच उचललेला आहे.
असं हे आगळंवेगळं व्यक्तिमत्व वागण्या-बोलण्यात कितीही सालंस अन् सुसंस्कृत वाटत असलं तरी चुका करणाऱ्यांसाठी ते ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी! नाठाळाच्या माथी देवू धोंडा!’ उगारयला देखील मागेपुढे पाहत नाहीत, याची मला स्वतःला अनेकदा प्रचिती आलेली आहे.
आता आपण अजयदादा यांच्या गझल स्पंदन*या गझल संग्रहाकडे वळूया! एकूण चौपन्न गझलांचा समावेश असलेल्या या गझलसंग्रहात नेहमीच्या शिरस्त्यानुसार सुरुवातीला ईशवंदना असतेच तो पायंडा अजयदादाने गणेश वंदना या रचनेच्यामाध्यमातून साकारलेला आहे.
शेती-माती, शेतकरी व त्याच्या व्यथा-वेदना, बलात्कार, जातिभेद, शृंगार, विरह, गरिबी, बेकारी, पर्यावरणाचा नाश, व्यसनाधिनता, भरकटलेलं समाजमन, निसर्गाचा ध्यास तर एका हजलचाही या संग्रहात समावेश आहे! अशा वैविध्यपूर्ण विषयांवर भावपूर्ण गझला लिहून गझलकाराने रसिकांना समर्पित केलेल्या आहेत.’भास आभास’ शिर्षकाच्या या गझलेत ते काय म्हणतात?
धनीच्या घरी रोज पक्वान्न आहे!
बळीच्या गळ्याभोवती फास आहे!!
अशी विचित्र सामाजिक अवस्था गझलकार जेंव्हा बघतो तेंव्हा तो आतून पेटून उठतो. आपल्या कळले का हो* या गझलेतील हा शेर बघा, कुपोषितांचा मृत्यूदर तर वाढत आहे!
धनिकाघरचे श्वान उपाशी निजले का हो?
पुढे *खेळलो मी डाव नाही या गझलेतील हा विद्रोही पण तितकाच समंजस वाटणारा भाव बघा, हार मी मानू कशी जर
खेळलो मी डाव नाही!!
गझलकार आपल्या प्रत्येक शेरात वेगवेगळे विषय कां हातळतो याचा छंद या शायरीचा मधून प्रत्यय येतो.
तडपतो जलाच्या अभावात मासा!
सुखाच्या अभावात तसा राहतो मी!!
कधी कधी तर या गझलसंग्रहातील गझलांमधून उत्कृष्ट शेर निवडताना नेमका कोणता शेर निवडावा असा प्रश्न पडतो. काळजाचे कान केले या गझलेतील हे दोन शेर बघूया,
जोडण्या संसार माझा मी जिवाचे रान केले!
तोडण्या हे बंध अपुले तू मला हैराण केले!!
वायदा होता तुझा मज एकटीने भेटण्याचा!
यार बघता सोबतीला प्रेम ते कुरबान केले!!
अशा अनेकानेक सामाजिक समस्यांचे अवलोकन तर आपणही करतो पण आपली दृष्टी तितकी प्रगल्भ नसते म्हणा किंवा त्या विषमतेला आपण गांभिर्याने घेत नाही असं म्हणा हवं तर!
आक्रोषल्या मनाला रिझवायला तरी ये!
गाऊन गीत मजला निजवायला तरी ये!!
विरह शिर्षकाच्या या गझलेचा हा मक्त्याचा शेर किती विदारक सत्य मांडतोय,
विरहात आज तुझिया प्राणास त्यागतो मी!
निष्प्राण देह माझा सजवायला तरी ये!!
तनाची राख झाल्यावर गझलेतला हा शेर अंतर्मनावर सरळ सरळ आघात करतो,
किती मी पाहिले होते मनाशी स्वप्न जगण्याचे!
मनाचे काय झाले पण तनाची राख झाल्यावर?
व्यर्थ केले रान मी यात गझलकार काय वास्तव मांडतोय बघा,
पाळला तो शब्द माझा सोडले दुर्गुण मी!
आज झालो सांब भोळा कालचा हैवान मी!!
अंतरीचा श्वास या गझलेचा मतला किती बोलका आहे बघूया…
वाटले होते मला ती अंतरीचा श्वास होता!
पण तिला ना ओढ होती नाटकी सहवास होता!!
अजय आहे यातील हा मतला व मक्त्याचा शेर हे जितके मार्मिक तितकेच उद्बोधकही आहेत….
डाव जिंकण्याची मज नेहमी सवय आहे!
कालही अजय होतो आजही अजय आहे!
रक्षिण्यास भक्तांना भूतलावरी येतो! तोच सिद्ध गणनायक पार्वती तनय आहे!!
संकेत नाही* मधे गझलकार म्हणतोय….
भेटल्यावरही तुझा संकेत नाही!
वाटते की तू अता मौजेत नाही!!
जीवनाचे ध्येय ज्याला ज्ञात आहे!
तो खरा माणूस आहे प्रेत नाही!!
स्वतःच्या वैयक्तिक अडीअडचणींवर मात करुन आपल्या चिल्यापिल्यांना अर्थातच आपल्या लाडक्या निलू आणि प्रांजली या मुलींच्या उत्कर्षासाठी प्रसंगी खस्ता भोगायची जीद्द बाळगणारा व त्यांच्या आवडीनिवडी जपताना तारेवरची कसरत करीत असताना कराव्या लागणाऱ्या द्राविडी प्राणायमाला आपल्या जीवनाचे जणू एक अभिन्न असे अंगच समजतो, इतकेच नव्हे तर त्या उपसलेल्या कष्टाचा एका शब्दानेही कुठे उल्लेख करीत नसला, तरी आपली मायबोली अहिरानी व माय मराठीच्या आराधनेत रमता रमता सभोवतालच्या जगासोबतच आपल्या मात-पित्यांना, पत्निला व मायभूमिला मात्र क्षणभरही विसरत नाही हे *भारत माता की जय!* या गझलेतून व्यक्त होतांना दिसते…..
धारातिर्थी पडले सैनिक रचले त्यांनी इतिहास!
श्वास सोडता अखेर वदले भारत माता की जय!!
असा हा पूर्णतः भारतमय झालेला जन्मतःच बहूआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेला, जवळजवळ सगळेच छंद जोपासणारा हळवा कवी आणि पूर्णतः परिपक्व झालेला बावन्नकशी गझलकार कधी तुम्हाला नाना पाटेकर सारख्या मुरब्बी कलाकाराने तितक्याच ताकतीने व आरोहावरोहांचे तंत्र सांभाळीत म्हटलेले *नटसम्राट* चित्रपटातील संवाद मराठी सोबतच अहिराणी सारख्या आपल्या मायबोलीतून जेंव्हा लिलया सादर करतो तेंव्हा तो प्रति नाना पाटेकर भासल्याशिवाय राहत नाही, हे आम्ही खान्देशवासी अनुभवतो तेंव्हा हा माणूस कवी, लेखक, गायक, संगीताची आवड असणारा, एक परिपूर्ण नट, बोधप्रद कथा सांगणारा कथाकार आहे की यातील नेमका कोण आहे हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही! गझल स्पंदन मधील काही शेर हळुवारपणे प्रेमस्पर्श करुन शृंगार रसाचेही या गझलकाराला वावडे नसल्याची खात्री पटवून देतात……
चालताना बघ मुरडते मान तिरकी!
वाटते ही नार नखरेबाज आहे!!
एखाद्या जीवनमूल्याचे मोल जर सर्वसामान्य माणसाला पटवून द्यायचे असेल तर ते अगदी साध्या सरळ व सोप्या भाषेत व्यक्त करण्याचे कसबही या गझलकाराच्या अंगोपांगी भिणलेले असल्याचे जाणवते. *आईशप्पथ* मध्ये ते काय म्हणतात…..?
कराल सेवा मातपित्याची घडेल काशीयात्रा!
पाप सरोनी पुण्यच पदरी पडते आईशप्पथ!!
शोधू नकोस देवाला तू मंदिर-मशिदीमध्ये!
हृदयी नक्की दर्शन त्याचे घडते आईशप्पथ!!
आपल्या या गझलछंदाची ख-या अर्थाने जोपासना व उपासना करतांना सांभाळाव्या लागणाऱ्या गझलतंत्रा विषयी गझलसुंदरी या गझलेतून अजयदादा कसे व्यक्त होतात ते अतिशय उल्लेखनीय आहे…..
गझलेच्या मी प्रेमामध्ये पडलो होतो!
मुशीमधे मी तिच्याच आणिक घडलो होतो!!
वेड लागले म्हणे लोक मज गालगालचे!
अजय म्हणे मी गझलेसाठी रडलो होतो!!
अजून काही शेरांचा उल्लेख करायला मला आवडेल कारण ते देखील शेरास तितकेच सव्वाशेर आहेत!
टाचत गेलो मनास माझ्या अनेक वेळी!
कुविचारांच्या ओझ्याने ते फाटत गेले!!
कशी माणसे वागती दोन तंत्री!
मुखवटा किती आत भेसूर आहे!!
विचार नव्हता लज्जेचाही मृत्यूसमयी!
पण जीवनभर जगली होती लाजतकाजत!!
ते दिन होते दुःखाचे तू किती भोगले आई!
कितीक आले वादळवारे तरी सोसले आई!!
तेल ओतुनी काडी लावे नकोत जवळी!
शिवाय त्यांच्या वणवा कुठला भडकत नाही!!
खेळ कला वा जीवनातल्या स्पर्धेमध्ये लढता लढता!
अपयश आले कधी तरीही ना हिरमुसल्या निलू प्रांजली!!
चितेमध्येही पडू लागल्या प्रेतांच्या राशी!
जिवितांचीही जळून गेली माणुसकी सारी!!
पापामध्ये वाटा नाही म्हणू लागली मुलेबायको!
पापखड्यांनी साती रांजण भरावयाचे कोणासाठी!!
याद येते सांज वेळी शोधतो मी बार ठेले!
अन् विसरण्या दुःख माझे रोज घेतो चार पेले!!
खरे पाहू जाता ह्या *गझलस्पंदन* नावाच्या गझलसंग्रहातील गझलांचे चिंतन- मनन व्हायला हवे व त्याची स्पंदने घराघरातून जाणवायला हवीत ईतका मौलिक ठेवा आहे हा! मला जरी गझलस्पंदन च्या प्रकाशन समारंभात प्रत्यक्षात हजर राहता आले नाही तरीही मी अजयदादाच्या घरी जावून हा गझल संग्रह विकत घेतला, व आज मी तो आपणासमोर सार्वजनिकरित्या प्रसारित करीत आहे. असा हा गझलविधा शिकायला धडपडणारा गझलकार गझलेसाठी रडला देखील असू शकतो हे रसिकांना पटल्याशिवाय कसे बरे राहील?
दिवसा रात्री दिसू लागली गझलसुंदरी!
लगावलीही झोपेतच बडबडलो होतो!!
अठ्ठाववन्न वर्षे वय झाल्यावरदेखील कच न खाता अथक परिश्रम व कमालिचा जिज्ञासूपणा रक्ताच्या थेंबाथेंबातून व रंध्रारंध्रातून ओसंडून वाहणाऱ्या अशा या केवळ दहा बारा वर्षाच्या अत्यंत अल्पावधित एखाद्या तपस्व्याला शोभेल असा व्रतस्थ व झपाटलेल्या गझलवेड्या आवलियाला माझा मानाचा मुजरा!
मित्रहो!
जिथे कविता लिहिणे हे देखील अत्यंत अवघड असे काम असते, तिथे गझल लिहिण्यापर्यंतची मजल गाठणारा अजयदादा हा मला अत्यंत जिज्ञासू, सापेक्षपणे वाचन कराणारा सुज्ञ वाचक, कुठेही न अडखळता विचलित न होता अगदी सहजपणे साभिनय संवाद फेकीत प्रभावीपणे अभिनय करणारा जातिवंत अभिनेता माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाच्या सन्मित्रांच्या मांदियाळीतला मुकुटमणी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आपुल्याशी ठावे ते ते……… अशा निस्वार्थ मनोवृत्तिचा निःस्पृह माणूस या आभासी जगतात गझल शिकायला धडपडणा-या नवोदितांसाठी गझलगुरु म्हणूनही नावारुपाला आलेला बघताना आम्हाला कृतकृतार्थ झाल्याचे समाधान लाभते.
कधीकाळी रामायण महाभारत या आपल्या धर्मग्रंथातील देवभाषा संस्कृत हिचा सांगोपांग अभ्यास करुन तिचे प्राकृत भाषेतून भाषांतर करणाऱ्या संत वाङमयातील ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ व सोपानदेव,संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत तुकाराम महाराज, संत रामदासस्वामी, संत सावता माळी, संत नरहरी सोनार अशा एकाहून एक महान संतांनी महाराष्ट्रच नव्हे तर आपल्या भारतभूमित ईथल्या कणाकणात या अतिशय क्लिष्ट वाटणाऱ्या भाषेतील सांस्कृतिक व साहित्यिक मुल्यांचं निव्वळ जतनच केलेलं नसून ते मराठी मायबोलीच्या माध्यमातून संपूर्ण देशातील घराघरात नेऊन ठेवलं रुजवलं वाढवलं व समृद्वही केलं!. गझल हा काव्यप्रकार कुठून आला व पुढे तो कसा विकसित झाला ही गझलसम्राट स्व. सुरेश भट साहेबांच्या अथक परिश्रमांची फलश्रुति आहे हे निर्विवादपणे सत्य असले तरी, आजची गझलविधा या संगणकीय युगात जशी बाळसे धरते आहे, कलेकलेने वाढते आहे वृद्धींगत होत आहे व नवोदितंसाठी संजिवनी ठरत आहे, तितकी ती याअगोदर खचितच नव्हती हे मी छहात्तरी आलोंडलेला पण अजूनही ही विधा जाणून घेण्यासाठी धडपडणारा एक नवोदित छातीठोकपणे सांगू ईच्छितो!
स्व. खावर, ए. के. शेख, सौ. ऊर्मिलाताई बांदिवडेकर, बेफिकिर, संजय गोरडे, अनिलदादा कांबळे, जयवंत वानखडे सर,भरत माळी सर, विष्णू जोंधळे, देवदत्त बोरसे, सदाशिव सूर्यवंशी,अभिजीत काळे सर डॉ.शरयू शहा, मृणाल गिते, हेमलता पाटील सारख्या माझ्या अनेक माता-भगिनी आणि त्यांचे असंख्य सहकारी या गझलक्षेत्रात जिवापाड परिश्रम घेऊन हा गझलयज्ञ अविरतपणे धगधगता ठेवत आहेत ही अत्यंत महत्वाची तितकीच अभिमानाची बाब आहे.
ही ज्ञानगंगा अशीच खळखळत वाहत राहो व घराघरातून असे असंख्य अजय बिरारी घडवत राहो! अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो व थांबतो!
शिवाजी साळुंके, ‘किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.
खूप छान