नात्यांचे मोल शब्दातून व्यक्त करणारा कविता संग्रह ‘पेरण’
किशोर जऱ्हाड यांचा पेरण हा कविता संग्रह ग्रामीण जीवनाचा,शेती आणि शेतकरी तसेच मोलमजूर यांचे आयुष्य, त्यांच्या जीवनातील घडामोडीचे रितसर आपल्या कवितेतून चित्रण घडवणारा आहे.
कवी आणि कविता यांच्यातील मध्यबिंदू म्हणजे त्यांची शब्दसंपदा.काही कविता येतात त्या कल्पनेतून,ज्यांची कल्पना शक्ती जेवढी तो कवितेला तेवढ्याच उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत असतो त्याला वास्तवतेची किनार फार कमी असते, याउलट काही कविता प्रत्यक्षदर्शी अनुभवातून आलेल्या असतात. त्यामुळे त्या वाचकांना चिंतन करायला किंवा काही अंशी सामाजिक परिवर्तनाचे कारण बनतात.
कवी किशोर जऱ्हाड यांच्याही कविता प्रत्यक्ष अनुभवातून शब्दांकित झालेल्या आहेत. कवी स्वतः हा राजस्व विभागात कार्यरत असल्यामुळे शेती, शेतकरी,नापिकी यांचा अगदी जवळून ते अभ्यास करतात.
यातून आलेल्या बऱ्या वाईट अनुभवातून ‘वखवखलेल्या डोळ्यानं’ अशी कविता जन्माला येते …
मनाचा हळवेपणा त्यांना स्वस्थ बसू देत नाही.
वखवखलेल्या डोळ्यानं
आभाळाकडं पाहत
बोटभर वाढलेली
पिकलेली दाढी खाजवत
रामभाऊ सांगत होता
बहात्तरच्या दुष्काळचे हाल
तराटी, अंबाडीच्या
भाकरी खाऊन दिवस ढकललेत,
तव्हा
पिठात पाणी घालून जगवले लेकरं
अन् बराशी खणून जगलो,वाचलो
दुष्काळाची कहाणी
डोळ्यातून ओघळत वाहत होती
कविता वाचतांच मन सुन्न होऊन ती परिस्थिती,ते चित्र डोळ्यासमोर उभे राहते आणि एक विचार सारखा अस्वस्थ करतो की आज आपण सर्व असूनही रडतोय.
संघर्ष म्हणजे काय हे अजून पूर्णपणे आपल्याला कळलेच नाही, खरेतर जे मिळाले त्याची किंमत आपल्याला करताच येत नाही. असे म्हणतात की, संकटं ही शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेली असतात. दुष्काळ,पूर, नापिकी या सर्वांशी संघर्ष करून करून संसाराचा गाडा तो खंबीरपणे ओढत असतो.या अस्मानी संकटातून वाचला तर सुल्तानी संकट त्याचा जीव घ्यायला आ वासून समोर उभेच असते.या देशाचे पोट भरणारा शेतकरी मात्र आपल्या बायको पोरांचे व्यवस्थित संगोपन सुद्धा करू शकत नाही,ही शोकांतिका आहे.
कवी किशोर जऱ्हाड यांचा ‘पेरण’ हा कविता संग्रह फक्त शेती आणि शेतकरी याच विषयावर बोलतो असे नाही,तर यापुढेही जाऊन बाप आणि मुलीचे नाते यावर मनाच्या ओतपोत पाझर फोडणाऱ्या कवितेचा सुद्धा समावेश आहे. सरांचा पहिला कवितासंग्रह ‘गंध रानमातीचा’ आणि दुसरा ‘पेरण’ हे दोन्ही संग्रह माय मातीला समर्पित आहे.
मुलीचे आणि बापाचे नाते किती नाजूक असते, आत्मियतेने भरलेले असते हे लक्षात येते सरांची ‘ती’ ही कविता वाचतांना. मुलगी म्हणजे बापाच्या डोक्यावरचे ओझे,मुलगी म्हणजे जबाबदारी, दुसऱ्यांची अमानत ही धारणा समाजात पसरलेली असताना कवी म्हणतो ती माझा मित्र आहे याहूनही पुढे जाऊन ती वेळोवेळी माझी माय सुद्धा होत असते. खरं पाहता प्रत्येक बापासाठी मुलगी ही त्याच सर्वस्व असते,तो तिला जिवापाड जपत असतो. परंतु परिस्थितीमुळे किंवा समाजातील अनिष्ट चालीरीती मुळे मुलीचे अस्तित्व नाकारण्यात येत असावे. किशोरजी जऱ्हाड आपल्या ‘पेरण’ या आपल्या कविता संग्रहात जेवढ्या ताकतीने बाप-मुलगी रेखाटतात तेवढ्याच ताकतीने ते प्रेमावर ही अलगद नाजूक फुंकर घालतांना ते म्हणतात..
“चित्र बनवावे,की लिहावी कविता तुझ्यावर,
रंग छंदात सामावून घ्यावे आरस्पानी सौंदर्य तुझे..”
सौंदर्याची प्रशंसा करणे हा कवीचा हक्क असतो.ते निसर्ग सौंदर्य असो अथवा स्त्री सौंदर्य. मनात घर करून बसलेला प्रेमाचा ओलावा कवितेतून शब्दबद्ध होत असताना कवी मनाने रिता होत जातो.आठवणींचा गुलमोहर मोहरत जातो आणि शब्दांचा पिसारा फुलायला लागतो.
ग्रामीण जीवनाचा लेखाजोखा मांडणारा ‘पेरण’ या कविता संग्रहाला प्रा.सुखदेव ढाणके यांची प्रस्तावना लाभली आहे.कवी स्वतः शेतकरी कुटुंबात जन्मलेले असल्यामुळे शेतकऱ्यांची व्यथा आणि कथा त्यांनी या संग्रहातून नेमके पणाने मांडलेली आहे.
पाणोठ्यावर
एकमेकांच्या पोहऱ्याने
घ्यावी भरून
आपापली पाण्याची घागर
इतकं निर्मळ होतं सारं..
भूतकाळातील मानवी प्रवृत्ती आणि वर्तमानातील मानवी जीवन पद्धतीत झालेला कमालीचा बदल, या बदलातून “लोप पावत चाललेली माणूसकी, मी बरा माझे काम बरे ” ही खंत कवी आपल्या संग्रहातून नेमके पणाने मांडण्याचा प्रयत्न करतात.
जग सपाट्याने धावत असताना माणसाचे आयुष्य ही गतिशील झालेले आहे. एवढेच नाहीतर राहणीमानातील बदला बरोबरच भाषेतील बदलही प्रकर्षाने जाणवतो. अनुकरणाच्या नादात शिक्षण प्रणालीत होणाऱ्या बदलाने मातृभाषेला जाणीव पूर्वक टाळल्या जात आहे. इंग्रजी शाळा हा प्रतिष्ठेचा विषय समजल्या जात आहे. अशातच कवी ‘पेरण’ या आपल्या संग्रहात ग्रामीण बोलीतील अशा शब्दांचा वापर करतात जे बोली भाषेतून गहाळ झालेले आहे. वळहाई,वैरण,कोयता,पाट,खांदे वळणी,इसनने,कोया, हुरडा…असे बरेच शब्द या संग्रहात वाचतांना मन सुखावून जाते. यासाठी कविचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.
“पेरण” हा संग्रह बाह्य अंगाने जेवढा सुंदर आहे तेवढाच आंतरीक शब्दसंपदेने ओतपोत आहे.
मित्र,सखा, मार्गदर्शक याहीपेक्षा खूप काही असणाऱ्या या जीवलग मित्राच्या संग्रहास मनापासून खूप खूप शुभेच्छा..!
– शरद बाबाराव काळे
धामणगांव रेल्वे
९८९०४०२१३५
पेरण (कविता संग्रह)
किशोर जऱ्हाड
मूल्य .. १६०
शब्दजा प्रकाशन, अमरावती