मोर्शी तालुक्यातील शेकडो सिमेंट बंधारे नामशेष होण्याच्या मार्गावर !
मोर्शी तालुक्यातील शेकडो सिमेंट बंधारे नामशेष होण्याच्या मार्गावर !
सिमेंट बंधारे दुरुस्तीचा अटल भूजल, जल युक्त शिवार योजनेला पडला विसर !
भूगर्भातील पाण्याची पातळी घटली ; शेतकरी संकटात ; संत्रा उत्पादकांना फटका !
रुपेश वाळके दापोरी (प्रतिनिधी):
मोर्शी तालुक्यात जल युक्त शिवार, अटल भूजल योजनेसह इतर योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामावर कोट्यावधी रुपये खर्च करूनही मोर्शी तालुक्याला लागलेला ड्रायझोनचा कलंक मिटू शकला नाही, ड्राय झोन मोर्शी तालुक्यात शासनाच्या अटल भूजल योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या कामांचे नियोजन करून, अटल भूजल, जलयुक्त शिवार योजनेद्वारे जलसंधारनाची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात म्हणून अटल भूजल, जलयुक्त शिवार योजनेकडे मोठ्या आशेने पाहिले जाते. कोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने तालुक्यातील विवीध गावांचा समावेश अटल भूजल व जलयुक्त शिवार योजनेसाठी करण्यात आला. परंतु मोर्शी तालुक्यात अटल भूजल व जलयुक्त शिवारातून पाण्याच्या नैसर्गिक साठय़ांचे बळकटीकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न होतांना दिसत नाही. याशिवाय कृत्रीम तलाव निर्मितीलाही संधी आहे. तालुक्यात सूक्ष्म नियोजनाची व अत्यावश्यक जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याची गरज आहे. मोर्शी तालुक्यात काही वर्षाआधी शासनाने तयार केलेले शेकाडो सिमेंट प्लग बंधारे व कोल्हापुरी बंधारे शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे जीर्णावस्थेत असून ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे , त्या शेकडो सिमेंट प्लग बंधाऱ्याच्या दुरुस्तीकरिता अटल भूजल, जलयुक्त शिवर योजनेच्या माध्यमातून मोर्शी तालुक्यात निधी उपलब्ध होत नसल्याची शोकांतिका आहे. तालुक्यात अस्तित्वात असलेल्या सर्व सिमेंट प्लग बंधाऱ्यांचे व कोल्हापुरी बंधाऱ्यांचे खोलीकरण त्याची दुरुस्ती अटल भूजल, जल युक्त शिवार योजनेच्या माध्यमातून केल्यास त्या शेकडो बंधाऱ्याच्या माध्यमातून मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होऊन त्याचा फायदा हजारो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
अटल भूजल, जल युक्त शिवार योजनेतील रखडलेली व नवीन मंजूर झालेली कामे तत्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. सिमेंट प्लग बंधारे, कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती करणे, खोलीकरण करणे, शेततळे, तालुक्यातील सिंचन प्रकल्पांचे अपूर्ण कामे इत्यादी कामांना उशिर का होत आहे, याचा जाब शासन प्रशासनाला विचारण्याची व त्यासाठी कठोर भुमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मोर्शी तालुक्यातील अटल भूजल, जलयुक्त शिवार योजनेतील कामे थंडबस्त्यात पडली आहे . त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व सिंचनाच्या सोई उपलब्ध होईल अशी कोणतीही उपाय योजना संबंधित यंत्रणा राबवतांना दिसत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे कमी पडणाऱ्या पावसाचा फटका आता सर्वांना सहन करावा लागत आहे. तलाव, सिंचन प्रकल्प, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग बंधारे, शेततळे, सुरुवातीलाच कोरडे पडत आहे. शेतातील विहिरीबरोबर गावातील विहिरीची लेवल खालावत आहे. मोर्शी तालुक्यात ५०० ते १००० फुटापर्यंत खोदल्या गेलेल्या बोअरवेल मुळे पाण्याच्या उपशामुळे परिस्थिती भिषण झाली आहे. यावर्षी तर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने घटत आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांवर त्याचा परिणाम जाणवत आहे. मोर्शी तालुक्यातील शेतातील काही विहिरी जानेवारी महिन्यातच कोरड्या पडत आहेत. शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येण्याची चिन्हे दिसत आहे. त्यावर अटल भूजल योजना, जलयुक्त शिवार योजना यासह विवीध योजनांच्या माध्यमातून अस्तित्वात आलेले शेकडो शिकस्त बंधाऱ्यांची दुरुस्ती करून विवीध प्रकारची जलसंसाधनाची कामे पूर्ण न झाल्यास ड्रायझोन मोर्शी तालुक्याची परिस्थितीत गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे.