दूध उत्पादक शेतकऱ्यांकरिता अनुदान योजना
योजनेचा लाभासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ, खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र व फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) आदींनी आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास विभाग, मुंबई यांच्याकडे दि. 20 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास विभागाव्दारे करण्यात आले आहे.
शासनाने जाहिर केलेल्या दूधास प्रतिलीटर पाच रुपये अनुदान योजनेत सहभागी होण्यासाठी सहकारी संघ, खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र व फार्मर प्रोड्यसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) आदींनी विहीत नमुन्यातील अर्ज आयुक्त, दुग्धव्यसाय विकास विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे दि. 20 जानेवारी 2024 पर्यंत सादर करणे बंधनकारक असून तीच तारीख अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत आहे.
अनुदान योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र व फार्मर प्रोड्यसर कंपनी (दूग्धव्यवसायाशी संबंधित) यांनी डी.बी.टी. करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांचा आधारकार्डशी व पशुधनाच्या कानातील बिल्ल्याशी संलग्न (लिंक) करणे आवश्यक आहे. या योजनेत दूध उत्पादक शेतकरी दूध संघास किंवा खाजगी प्रकल्पास दूध पुरवठा करतात ते शेतकरी, सहकारी संघ किंवा खाजगी प्रकल्पांमार्फत तसेच दूध शितकरण केंद्र व फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) योजनेत सहभागी होवू शकतात.
योजनेचा कालावधी दि. 11 जानेवारी ते दि. 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत राबविण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. या याजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी संघ/ खाजगी प्रकल्पांमार्फत तसेच दूध शितकरण केंद्र व फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) आपले स्वतंत्र अर्ज माहितीस्तव ddcmaharashtra@gmail.com या ई-मेल आयडीवर सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.