नायलॉन मांजाचा ठरतोय फास.!
निर्बंधाकडे दुर्लक्ष करून मांजा विकणे अयोग्य
‘चढा ओढीत चढवीत होते..बाई मी पतंग उडवीत होते..’आई मी पतंग उडवीत होते. ही लावणी ऐकताना आपण मंत्रमुक्त होतो मात्र हाच मंत्रमुक्तपणा मुक्या पक्षांच्या प्राण्यांच्या तसेच मनुष्याच्या गळ्याचा फास होतो,याचा विचार कोणीच करताना दिसत नाही प्रत्यक्षात पतंग उडविण्याचा आनंद साध्या मांज्याने घ्यावा असे असतानाही सर्व विभागांच्या नाकावर टिच्चून चिनी नायलॉन मांजाची खुलेआम विक्री होत आहे. यातूनच पक्षी तसेच वाहन चालक जखमी होत असल्याच्या घटना घडत आहेत.नायलॉनच्या मांजामुळे गळा कापल्याने दर वर्षी लोक गंभीर जखमी होतात; तर शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होतो आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) नायलॉन मांजावर चार वर्षांपूर्वीच बंदी घातली आहे. औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशांमध्ये पुन्हा एकदा नायलॉन मांजांवरील बंदी कायम केली आहे. मात्र, संक्रात जवळ आल्याने सर्व आदेश धाब्यावर बसवून उत्पादकांकडून नायलॉन मांजाचा पुरवठा आणि विक्रीही सुरू झाली आहे. नागरिकांनी सिंथेटक आणि नायलॉन मांजाची खरेदी करू नये, असे आवाहन पक्षीप्रेमींनी केले आहे.मात्र सर्व नियम व न्यायालयीन आदेश पायदडी तुडवून खुलेआम नायलॉन मांजा ची विक्री होत आहे.
मागील काही वर्षात पतंगोत्सवात पारंपरिक मांजाऐवजी नायलॉन व काचेचा वापर करून तयार केलेल्या प्रतिबंधित मांजाचा वापर वाढला आहे. या प्रतिबंधित मांजाची विक्री काही जणांकडून छुप्या पध्दतीने केली जात असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. पतंग उडवताना घर्षणाने मांजा तुटतो. इमारती, तारा, झाडे, व रस्त्यांवर अडकतो. अशा तुटलेल्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवितास धोका निर्माण होऊन नागरिकांसह पक्षी, प्राणी यांचे जखमी होण्याचे अथवा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा मांजामुळे शाळकरी मुले व दुचाकीस्वारांचा अपघात होऊन जखमी अथवा मृत्यू झाले आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तारांमध्ये अडकून काही ठिकाणी आगीही लागतात. नायलॉन मांजाचे विघटन होत नसल्याने कित्येक दिवस तो झाडे आणि तारांमध्ये तसाच अडकून असतो. पक्ष्यांसाठी तो जिवघेणा ठरतो.
केवळ लहान मुलेच नव्हे तर सर्वांनाच वर्षानुवर्षे पतंगबाजीची आवड आहे. पूर्वीच्या काळी मांजा रसापासून तयार केला जात असे. मात्र गेल्या काही वर्षांत चायनीज मांजा बाजारात आला आहे. या मांजामुळे अपघात होत असल्याने चायनीज मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही, विक्री जोरात सुरू आहे. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पूर्वीच्या काळी तांदूळ किंवा तांदळापासून साधा धागा घेऊन मांजा बनवला जात होता, ज्या धाग्यावर बारीक तुटलेली काच लावली जायची, ज्याचा उपयोग दोन पतंग उडवण्यासाठी केला जात असे, मात्र गेल्या काही वर्षांत चायनीज मांजाची लोकप्रियता वाढली आहे. आता पतंगबाजीसाठी मांजा बनवणे बंद झाले आहे. फक्त चायनीज मांजा धावू लागला आहे त्यामुळे रस्त्यावरील अपघातात मांजामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून हा चायनीज मांजा नायलॉन धाग्यात येऊ लागला आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा जीवघेणा फटका बसत आहे. या चायनीज मांजामुळे अनेक मृत्यू आणि मोठे अपघात झाले आहेत. ज्यावर सरकारने बंदी घातली आहे. मात्र कमाई पाहून हा घातक मांजा शहरात खुलेआम विकला जात आहे. आगामी मकर संक्रांतीच्या निमित्ताने लहान मुलांचा पतंग उडवण्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे दुकानदारांनी आपल्या दुकानात हा घातक मांजा मोठ्या प्रमाणात साठा केला आहे. शासनाने घातलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून मांजा खुलेआम विकला जात आहे. नगर परिषद प्रशासन व पोलीस विभाग याकडे लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात शहरात पावसामुळे अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही.
– प्रा. डॉ.सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६