बेरोजगारी वाढतेय मात्र कामाला माणसं नाहीत !
खुशियों का कल ढूंढना होगा,
बेरोजगारी का हल ढूंढना होगा,
संसदेत २ तरुणांनी घुसखोरी केल्याची घटना मागील आठवड्यात घडली. घडलेला प्रकार खूप विचित्र, दहशत पसरविणारा असाच होता. घटना कोणतीही असो, दोनही बाजूने अर्थात घटनेचे समर्थन करणारे आणि घटनेच्या विरोधात बोलणारे, प्रतिक्रिया देणारे असतात. संसदेतील घुसखोरी प्रकरणातील आरोपी तरुण-तरुणी यांचे बाबतीत बोलतांना काँग्रेस नेते माजी खासदार मा. राहुलजी गांधी यांनी ‘देशात बेरोजगारी हा मोठा मुद्दा असून बेरोजगारीतून या तरुण-तरुणींनी असे कृत्य केले’, असे म्हटले. मात्र हा राजकीय भाग झाला. सरकार विरुध्द कोणत्याही घटना व प्रकाराचे, आंदोलनाचे सरासरी समर्थन करणे, हीच विरोधी पक्षाची भूमिका असते, असो..
भारतातील बेरोजगारीचा दर जानेवारी २०२३ मध्ये ७.१४ टक्के होता, तो पेâब्रुवारी २०२३ मध्ये ७.४५ टक्के तर जुलै २०२३ मध्ये ७.९५ टक्के तसेच पुढे १० टक्के पर्यंत वाढ झाल्याची नोंद सापडते. म्हणजेच देशातील बेरोजगारांची संख्या लाखोने वाढल्याचे यावरुन स्पष्ट होते. बेरोजगारी हा शब्द अशा स्थितीला सूचित करतो ज्यामध्ये एखादी व्यक्ती सक्रियपणे रोजगार शोधते परंतु तो मिळत नसल्याने अयशस्वी ठरते. तसेच देशाच्या बेरोजगारीचा दर अर्थव्यवस्थेची कमजोरी अधोरेखित करतो. मात्र देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचा सरकारी आकडा व तसा सरकारचा दावा असतांना अनेक प्रकारच्या कामांसाठी प्रत्यक्षात माणसं, मजूर, चपराशी, लिपीक व इतरही ‘माणसे भेटत नाही’, ही ओरड का आहे? हा मुख्य प्रश्न आहे.
शेतकरी म्हणतो शेतात मजूर भेटत नाही, उद्योजक व रस्ते ठेकेदार म्हणतात महाराष्ट्रातमजूर भेटत नाही म्हणून छत्तीसगडी, बंगाली व इतर प्रांतातून मजूर आणावे लागतात, अनेक खासगी कार्यालयात व लहान-मोठ्या दुकानात काम करण्यासाठी माणूस भेटत नाही. हॉटेलमध्ये वेटर व कारागीरची कमतरता आढळते. तेव्हा याचाच दुसरा अर्थ बेरोजगारी नाही, कामाचा अभाव नाही, तर बाजारात गरज असलेल्या कामांसाठी काम करणा-यांची कमतरता आहे, तसेच भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेत अर्ध शिक्षित किंवा जास्त शिकल्यामुळे उपरोक्त कामे व व्यवसाय कमी दर्जाचे वाटतात. उपाशी तर राहत नाही, मायबाप सरकार अत्यल्प दरात किंवा फुकटात धान्य देत आहे, मग काम तरी कशासाठी करावे? असा विचार केल्या जातो काय? कारण ज्यांना प्रत्यक्षात काम करण्याची गरज आहे, त्यांना बाजारात काम उपलब्ध आहे. मात्र काम करण्याची मानसिकता व इच्छाच नसेल तर काम कसे मिळणार?
भारतात बेरोजगारांची नोंद तसेच नावे नोंदविण्याची व्यवस्था आहे, प्रत्येक सुशिक्षीत हा सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नाव नोंदवू शकतो, या उलट काम करणा-यांची बेरोजगार नसलेल्यांची नावे नोंदवा, त्यांना बक्षीस द्या, त्यांना भत्ता देण्याची व्यवस्था केली तर जास्त नावे नोंदविली जातील, आणि खरेच किती बेरोजगार आहेत. हे स्पष्ट होईल. तसेही मुद्दाम रिकामे राहणे, वरली, मटका जुगार व मोबाईल खेळणे, रिकामे बसून राजकारणावर गप्पा करणे, टाईमपास करणे, असा आळसीपणा बहुतांश तरुणांना आवडतो, हा प्रकार ग्रामीण बेरोजगारांमध्ये जास्त तर शहरी व शैक्षणिक बेरोजगारांमध्ये कमी आढळतो. ही पण एक समस्या आहे.
देशात बेरोजगारी ही समस्या काल होती व आजही आहे. यासाठी राजकीय पक्ष व नेते आश्वासने देतात तर सरकारी पातळीवर उपाय शोधले जातात. तज्ञांच्या मते त्यासाठी औद्योगिक तंत्रात बदल करुन श्रम केंद्रित तंत्रज्ञानाला चालना दिली पाहिजे, हंगामी बेरोजगारी हाताळण्यासाठी बहुपीक, पशुसंवर्धन, फलोत्पादन, वृक्षारोपन, कापूस उद्योगाला चालना देणे तसेच स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणे, आदी उपाय सांगितले आहेत. तर हे सर्व करण्यासाठी सरकारचेप्रयत्न तोकडे पडत असतीलही मात्र स्वत:ची समस्या स्वत: सोडविणे हे जास्त महत्त्वाचे ठरत नाही का?
शेवटी श्रमाला प्रतिष्ठा असते हे समजून न घेता कामाची लाज वाटून घेणे, किंवा कामचुकारपणा करुन आळशीपणाने छोटी कामे किंवा लहान व्यवसाय न करणा-या तरुणांची सत्य परिस्थिती कशी आहे, हे दर्शविणा-या दोन ओळी आठवतात…
*बहुत ढूंढा नही दिखाई दिया अपना विकास,*
*देखा बेरोजगार खेल रहे हैं स्मार्ट फोन पर ताश।*
-राजेश राजोरे
9822593903
खामगाव, जि. बुलडाणा
(लेखक हे दैनिक देशोन्नतीच्या बुलडाणा आवृत्तीचे संपादक आहेत.)