भारत राष्ट्र निर्माणासाठी खेळाडूंनी सज्ज रहावे-सुरज कदम
आर्वी (प्रतिनिधी) : पंचायत समिती आर्वी अंतर्गत रोहणा बिटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दि.२० आणि २१ डिसेंबर २०२३ ला जि. प. प्राथ. शाळा, सालफळ शाळेच्या मैदानावर संपन्न झाल्या.
मा. गटविकास अधिकारी सुनिताताई मरसकोल्हे यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. किशोर ढाणके तसेच गावचे सरपंच मा. सुरज कदम उपस्थित होते. ते म्हणाले की, १९५० ला आपण राष्ट्र ही संकल्पना स्विकारली असून मानवी मूल्यांवर ती अधिष्ठित होण्यासाठी आपल्या सर्वांना जागृत नागरिक व्हावे लागेल. ही संकल्पना जोपासून जाणीवपूर्वक पुढल्या पिढीकडे हस्तांतरित करावी लागेल. आजचे हे विद्यार्थी खेळाडू भारत राष्ट्राचे भक्कम आधार व्हावे हाच अशा स्पर्धांचा उद्देश असला पाहिजे.
यावेळी शाळेची माजी विद्यार्थिनी अश्विनी राजेंद्र ढाणके हिचा भारतीय सैन्यदलातील सेवेसाठी शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. उद्घाटकीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी मा. सुरेशजी पारडे यांनी केले तर आभार मा. केंद्रप्रमुख विलास तराळे यांनी मानले. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये कबड्डी, खो खो, लंगडी वैयक्तिक स्पर्धा तसेच सांस्कृतिक स्पर्धांमध्ये समरगीत, नाटिका, नाट्यछटा आणि नृत्य सादरीकरण करण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमात मा. पिपरी, रोहणा, विरुळ आणि सोरटा केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीत सर्व विजेत्या चमुंना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सर्व विजेत्या चमू तालुकास्तरावर रोहणा बिटचे प्रतिनिधीत्व करणार आहेत त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा व्यवस्थित होण्यासाठी सबंध सालफळ गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.